Manipur Unrest Escalates : मणीपूरमधील संघर्ष चिघळला !

  • ५ जिल्‍ह्यांत इंटरनेट बंद !

  • ३ जिल्‍ह्यांत संचारबंदी !

  • ५० हून अधिक जण घायाळ !

  • सुरक्षा कर्मचार्‍यांवर दगडफेक !

  • केंद्राने पाठवले सी.आर्.पी.एफ्.चे २ सहस्र सैनिक !

इंफाळ – मणीपूरमध्‍ये पुन्‍हा एकदा परिस्‍थिती गंभीर झाली आहे. राज्‍यातील कायदा आणि सुव्‍यवस्‍थेच्‍या सूत्राच्‍या संदर्भात आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्‍यांनी १० सप्‍टेंबरला राजभवनावर मोर्चा काढला. या वेळी विद्यार्थी आणि सुरक्षादलांचे सैनिक यांच्‍यामध्‍ये झालेल्‍या धूमश्‍चक्रीत ५० हून अधिक जण घायाळ झाले. गेल्‍या ५ दिवसांपासून राज्‍यभरात अनेक सेवा बंद ठेवण्‍यात आल्‍या आहेत. ३ जिल्‍ह्यांमध्‍ये संचारबंदी लागू करण्‍यात आली आहे. केंद्र सरकारने संपूर्ण मणीपूरमध्‍ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्‍या (‘सी.आर्.पी.एफ्.’च्‍या) तुकड्या तैनात करण्‍याचा आदेश दिला आहे. या तुकड्यांत जवळपास २ सहस्र सैनिकांचा समावेश आहे.

राज्‍यातील बिघडलेल्‍या कायदा आणि सुव्‍यवस्‍थेचा सामना करण्‍यात राज्‍याचे पोलीस महासंचालक, उपमहासंचालक आणि सुरक्षा सल्लागार अपयशी ठरले असल्‍याचा आरोप करत त्‍यांना पदावरून हटवण्‍यात यावे, अशी विद्यार्थ्‍यांची आग्रही मागणी आहे. ही मागणी घेऊन ते राजभवनाकडे जात होते. या वेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्‍याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच आंदोलकांनी सुरक्षा कर्मचार्‍यांवर दगड फेकले, जमावाला पांगवण्‍यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्‍या नळकांड्यांचा वापर करावा लागला.

मणीपूर सरकारने मंगळवारी संध्‍याकाळी एक सुधारित आदेश प्रसारित करत विद्यार्थ्‍यांच्‍या आंदोलनाच्‍या पार्श्‍वभूमीवर ५ जिल्‍ह्यांमध्‍ये सेवा बंद करण्‍यात आल्‍याचे सांगितले. यासह राज्‍य सरकारने राज्‍यभरात ५ दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्‍याची अधिसूचना प्रसारित केली आहे.

एका महिलेचा मृत्‍यू !

दुसरीकडे कंगपोकी जिल्‍ह्यात २ सशस्‍त्र गटांमधील गोळीबारात एका महिलेचा मृत्‍यू झाल्‍याचे समोर आल्‍याने तणावात भर पडली आहे. थंगबू या दुर्गम खेड्यात जमावाने काही घरे जाळल्‍याने ग्रामस्‍थांनी गावाबाहेर पळ काढावा लागला आहे.

शाळा आणि महाविद्यालये २ दिवस बंद !

मणीपूरमधील सर्व शाळा आणि महाविद्यालये २ दिवस बंद ठेवण्‍याचा निर्णय राज्‍याच्‍या शिक्षण विभागाने घेतला आहे. या वेळच्‍या आंदोलनात विद्यार्थीही मोठ्या संख्‍येने सहभागी झाल्‍याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर शाळा, महाविद्यालये तसेच विद्यापीठांत कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी २ दिवस सर्व शैक्षणिक संस्‍था बंद ठेवण्‍यात येणार आहेत.

अत्‍याधुनिक शस्‍त्रांच्‍या वापराचे पुरावे ! – पोलीस महासंचालक

मणीपूरमध्‍ये कुकी आणि मैतेई संघर्षाचा नवा अध्‍याय सुरू झाला असून यावेळी ड्रोन, अत्‍याधुनिक क्षेपणास्‍त्रे आदी वापरून आक्रमणे करण्‍यात येत आहेत. पोलिसांनीही क्षेपणास्‍त्रांचे काही तुकडे सापडल्‍याचे मान्‍य केले आहे. ‘आसाम रायफल्‍स’चे निवृत्त महासंचालक जनरल पी.सी. नायर यांनी आक्रमणात रॉकेट किंवा ड्रोनचा वापर केला  नसल्‍याचे म्‍हटले आहे, तर मणिपूरचे पोलीस महासंचालक (प्रशासन) के. जयंत सिंह यांनी हा दावा फेटाळत अत्‍याधुनिक शस्‍त्रांच्‍या वापराचे पुरावे मिळाल्‍याचे म्‍हटले आहे.

संपादकीय भूमिका

मणीपूरमध्‍ये जोपर्यंत ख्रिस्‍ती कुकी आतंकवाद्यांना धडा शिकवला जात नाही, तोपर्यंत तेथे शांतता नांदणार नाही, हे सरकारच्‍या कधी लक्षात येणार ?