Kirtankar H.B.P. Charudatta Aphale : राष्‍ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांच्‍या ‘आयआयटी मुंबई’ येथील कार्यक्रमाला विरोध !

‘आयआयटी बाँबे फॉर जस्‍टिस’ या पुरोगामी विद्यार्थी संघटनेने विरोध

ह.भ.प. चारुदत्त आफळे

मुंबई – प्रतिथयश राष्‍ट्रीय कीर्तनकार आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ ह.भ.प. चारुदत्त आफळे यांचा २७ ऑगस्‍ट या दिवशी ‘आयआयटी मुंबई’ येथे कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला होता. या कार्यक्रमाला ‘आयआयटी बाँबे फॉर जस्‍टिस’ या विद्यार्थी संघटनेने विरोध करून त्‍या संदर्भातील पत्र त्‍यांच्‍या व्‍यवस्‍थापनाला दिले. हे वृत्त इंडियन एक्‍सप्रेस या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. यानंतर हा कार्यक्रम झाला कि नाही, हे मात्र समजू शकले नाही.

या पुरोगामी विद्यार्थी संघटनेने महाविद्यालयाच्‍या व्‍यवस्‍थापनाला दिलेल्‍या निवेदनात म्‍हटले होते, ‘चारुदत्त आफळे हे हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांशी संबंधित आहेत. ते नथुराम गोडसे आणि गांधी हत्‍या या विचारांचे समर्थन करतात. अशा व्‍यक्‍तीला आमच्‍या ‘कॅम्‍पस’मध्‍ये (प्रांगणामध्‍ये) बोलण्‍याची अनुमती दिल्‍याने मुसलमान, दलित आणि इतर उपेक्षित पार्श्‍वभूमीतील विद्यार्थ्‍यांना हानीकारक संदेश जातो. त्‍यामुळे त्‍यांची सुरक्षितता आणि सर्वसमावेशाची भावना न्‍यून होते. या कार्यक्रमामुळे जातीय द्वेष आणि असहिष्‍णुता वाढेल. आयआयटी बाँबेे सर्व विद्यार्थ्‍यांसाठी एक स्‍वागतार्ह आणि सुरक्षित वातावरण राहील याची खात्री करण्‍यासाठी आफळे यांचा कार्यक्रम त्‍वरित रहित करावा.’ या संदर्भात ह.भ.प. चारुदत्त आफळे यांच्‍याशी संपर्क होऊ शकला नाही.

संपादकीय भूमिका

महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्‍था यांमध्‍ये शहरी नक्षलवाद बोकाळत आहे, याचे हे उदाहरण होय. राष्‍ट्र आणि हिंदु धर्म यांच्‍या विरोधात सातत्‍याने कार्य करणार्‍या अशांचा वैचारिक प्रतिवाद करणे आवश्‍यक !