‘मला सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या खोली स्वच्छतेची आणि त्यांच्या अन्य सेवा करण्याची संधी श्रीकृष्णकृपेने मिळाली. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची सेवा करतांना मला श्रीकृष्णकृपेने शिकायला मिळालेली सूत्रे, त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती आणि त्यांची महानता यांविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत. (भाग १)
१. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांची गुणवैशिष्ट्ये
१ अ. सद्गुरु गाडगीळकाका यांनी त्यांच्या आई-वडिलांची सेवा विनम्रतेने करणे : सद्गुरु गाडगीळकाका यांच्याकडे ‘संत आणि साधक यांच्यासाठी उपाय शोधणे, त्यांच्यासाठी उपाय करणे, संशोधन करणे, ग्रंथ लिखाण’, अशा अनेकविध सेवा आहेत. ते या सेवांच्या व्यस्ततेतही त्यांच्या आई-वडिलांसाठी वेळ काढतात. त्यांचे आई-वडील, (आई (सौ. माधुरी गाडगीळ [आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ७९ वर्षे]) आणि वडील (श्री. माधव गाडगीळ [आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ८६ वर्षे])) हे नागेशी येथे रहातात. सद्गुरु गाडगीळकाका आठवड्यातून ३ दिवस त्यांना भेटण्यासाठी आपणहून जातात. त्यांना भेटायला जातांना त्यांना हव्या असलेल्या गोष्टी आवर्जून घेऊन जातात, तसेच तेथे गेल्यावरही सद्गुरु गाडगीळकाका ‘आई-वडिलांच्या खोलीतील टेबल पुसणे, औषधे आणि खाऊ तपासणे, चादरी पालटणे’, अशा काही सेवा करतात. याचसमवेत तेथे असतांना आई आणि वडील यांच्यासाठी नामजपादी उपाय करणे आदी गोष्टीही करत असतात. एवढेच नव्हे, तर सण-उत्सवांच्या दिवशी सद्गुरु गाडगीळकाका आई-वडिलांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासह जेवण्यासाठीही जातात, तसेच त्यांचे वाढदिवस असतात, त्या वेळीही वेळात वेळ काढून जातात.
खरेतर सद्गुरु गाडगीळकाका आध्यात्मिकदृष्ट्या उच्च स्तरावर आहेत. असे असले, तरी ते त्यांच्या आई-वडिलांची सेवा तितक्याच विनम्रतेने आणि त्यांना अपेक्षित अशी करतात.
१ आ. वेळप्रसंगी वडिलांना गुरु म्हणून आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे सद्गुरु डॉ. गाडगीळ ! : एकदा सद्गुरु गाडगीळकाकांच्या वडिलांना एका कारणासाठी २ – ३ ओढण्या हव्या होत्या. त्यांना जशा ओढण्या हव्या होत्या, त्या तशा मिळत नव्हत्या; म्हणून त्यांनी सद्गुरु गाडगीळकाकांना तसे कळवले. या वेळी श्री. गाडगीळआजोबांनी त्यांना दाखवण्यात आलेल्या ओढण्या परत केल्याचेही त्यांना सांगितले होते. त्या प्रसंगी सद्गुरु गाडगीळकाकांनी मला रामनाथी आश्रमात त्यांना पाहिजे असलेल्या ओढण्या बघण्यास सांगितले, तसेच त्यांनी श्री. गाडगीळआजोबांना सांगितले, ‘‘सध्या आपत्काळ चालू आहे. त्यामुळे साधकांनी आणून दिलेल्या ओढण्या वापरण्यास घ्यायला हव्या होत्या. नंतर त्यांना तुम्हाला पाहिजे असलेल्या ओढण्या मिळाल्यावर त्या परत करता आल्या असत्या. आपल्याला आपत्काळाच्या दृष्टीने रहाण्याची सवय करायला हवी. अन्यथा आपली प्रगती होणार नाही. आपल्याला आपली आध्यात्मिक पातळी वाढवायची आहे.’’
या प्रसंगात मला असे लक्षात आले, ‘सद्गुरु गाडगीळकाकांनी त्यांच्या वडिलांना (श्री. गाडगीळआजोबांना) एखाद्या मोठ्या माणसाने लहान मुलाला समजावून सांगावे तसेच; पण पूर्णपणे आध्यात्मिक स्तरावर एक गुरु म्हणूनच हाताळले.’
१ इ. भाव
१ इ १. सद्गुरु गाडगीळकाका यांचा संतांप्रती आदरभाव : सद्गुरु नंदकुमार जाधव, पू. अशोक पात्रीकर (सनातन संस्थेचे ४२ वे (समष्टी) संत, वय ७३ वर्षे), सद्गुरु राजेंद्र शिंदे, पू. सदाशिव परांजपे (सनातन संस्थेचे ८९ वे (व्यष्टी) संत, वय ८० वर्षे) आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे (सनातनच्या ९० व्या (व्यष्टी) संत, वय ७४ वर्षे) यांच्यासह अन्य कोणतेही संत रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात येतात, तेव्हा ते सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना भेटतात. त्या वेळी सद्गुरु गाडगीळकाका संतांना बसण्यासाठी आवश्यक तशी आसंदी (खुर्ची) आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यास सांगतात, तसेच ‘तशी व्यवस्था झाली आहे कि नाही ?’, हेही ते बघतात.
१ इ २. आश्रम आणि प्रसारातील अनेक बालसाधकांप्रती प्रेमभाव असणे : सद्गुरु गाडगीळकाकांना आश्रम आणि प्रसारातील अनेक बालसाधक आवडतात, तसेच अनेक बालसाधकांनाही त्यांच्याकडे जाण्यास वा त्यांच्याशी बोलण्यास आवडते.
१ इ ३. साधकाला ताप आल्यानंतर त्याला बर्याचदा संपर्क करून त्याची विचारपूस करणे : गेल्या मासात मला अचानक काही घंट्यांसाठी ताप आला होता. त्या वेळी मी त्यांना ताप आल्यामुळे सेवेला येऊ शकत नसल्याविषयी कळवले. त्यानंतर अंदाजे ६ घंट्यांतच माझा ताप गेला. त्या दिवशी त्यांनी दिवसातून ३ वेळा मला संपर्क करून ‘‘बरे वाटत आहे का ? ताप नाही ना ? थकवा आहे का ? कोण जेवण आणून देत आहे ? भूक आहे का ?’’ इत्यादी प्रश्न विचारून माझी चौकशी केली. त्यांच्या प्रेमभावामुळे आणि विचारण्यातून निर्माण झालेल्या अस्तित्वामुळे मला त्याच दिवशी पूर्ण बरे वाटले. ‘जणू काही त्यांनीच माझ्यासाठी नामजपादी उपाय करून माझा ताप घालवला’, असे मला वाटले. त्यानंतर दुसर्या दिवशीही चौकशी करून ‘‘आणखी एक दिवस आराम करून मगच सेवेला ये’’, असेही प्रेमाने सुचवले.
१ इ ४. परात्पर गुरुदेवांसमोर सदैव शरणागतभावात असलेले सद्गुरु गाडगीळकाका ! : सद्गुरु गाडगीळकाकांचे परात्पर गुरुदेव नेहमीच कौतुक करत असतात. त्यांची साधक, अन्य संत किंवा अन्य कुणाशीही ओळख करून देतांना ‘जगात कुठेही शोधून सापडणार नाहीत, असे उच्चकोटीचे प.पू. डॉ. गाडगीळ’ किंवा ‘सूक्ष्मातील जाणण्याची अफाट क्षमता, साधनेचे अफाट अन् अद्वितीय सामर्थ्य असलेले आणि साधकांच्या नामजपादी उपायांविषयी मला काहीच बघावे न लागणारे असे प.पू. डॉ. गाडगीळ’, अशा आशयाचे कौतुक करत असतात. परात्पर गुरुदेव त्यांचे कौतुक करत असतांना सद्गुरु गाडगीळकाका सदैव परात्पर गुरुदेवांच्या चरणांकडे बघत शरणागत असतात. सद्गुरु गाडगीळकाका नेहमी म्हणतात, ‘‘या सामर्थ्यामध्ये आपले असे काहीच नाही. जे काही आहे, ते परात्पर गुरुदेवांचेच आहे. त्यांच्या पुढ्यात मी अत्यल्पच आहे. परात्पर गुरुदेव जेव्हा माझे कौतुक करतात, तेव्हा ते त्यांचेच असते. त्या वेळी मला स्वतःला पुष्कळ लाजायला होते. त्यांच्या संकल्पामुळेच संशोधन करणे आणि उपाय शोधणे इत्यादी मला करता येते.’’
१ ई. आध्यात्मिक उपायांवरील अमूल्य असे सूक्ष्म संशोधन
१ ई १. साधकांचे आध्यात्मिक त्रास आणि शारीरिक त्रास दूर व्हावेत, यांसाठी नवनवीन नामजपादी उपाय आणि मुद्रा शोधणारे सद्गुरु डॉ. गाडगीळकाका ! : सद्गुरु गाडगीळकाका दिवसभरात साधकांना प्राणशक्तीवहन उपायपद्धतीनुसार नामजप शोधून देतात. त्या वेळी त्यांना जप शोधून देत असतांना ‘साधकांना होणारा आध्यात्मिक त्रास लवकरात लवकर न्यून कसा होईल ?’, यासाठी सद्गुरुकाका सतत संशोधन करत असतात. यामध्ये त्यांनी ‘मनोरा (टॉवर) मुद्रा, वाईट शक्तींची आक्रमणे रोखण्यासाठी दोन्ही तळहातांची एकत्रित मुद्रा करणे, श्वासावर लक्ष केंद्रित करून वाईट शक्तींचा जोर तात्काळ न्यून करणे इत्यादी अनेक मुद्रा शोधून काढण्यासह नामजपादी उपाय शोधून काढले आहेत आणि ते शोधणे अविरत चालू आहे. काही वेळा साधकांना शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासांमुळे त्रासदायक आवरण काढणे शक्य नसते. तेव्हा सद्गुरुकाका ‘त्या साधकांना त्रास होत असलेल्या षट्चक्रांवर ध्यान लावून आवरण काढणे’, असे अनेकविध उपाय सांगतात.
१ उ. सद्गुरु गाडगीळकाका यांनी साधकाकडून सूक्ष्मातील प्रयोग करवून घेऊन स्पंदनांचा अभ्यास करण्यास शिकवणे
१ उ १. संगणकीय धारिकेचे वाचन करतांना तिच्यातील स्पंदनांवरून शुद्धलेखन आणि व्याकरण यांच्या चुका अभ्यासण्यास सांगणे : एकदा सद्गुरु गाडगीळकाका एका धारिकेचे वाचन करत होते. ते करत असतांना मी त्यांच्याकडे एका सेवेसाठी गेलो होतो. तेव्हा त्यांनी मला ‘त्या धारिकेकडे पाहून स्पंदनांचा अभ्यास करून कोणत्या भागात शुद्धलेखन आणि व्याकरण यांच्या चुका आहेत ?’, ते बघण्यास सांगितले. त्याप्रमाणे प्रयोग केल्यानंतर मला ज्या ज्या ठिकाणी चुका लक्षात आल्या, त्या त्या मी त्यांना सांगितल्या. त्यानंतर त्यांनी माझे उत्तर बरोबर असल्याचे सांगितले. त्या दुरुस्त्या केल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा प्रयोग करण्यास सांगितले आणि पुन्हा २ – ३ दुरुस्त्या केल्या. असे केल्यानंतर धारिकेतील स्पंदने चांगली झाल्यावर मला ती धारिका स्थूलदृष्ट्या वाचन करण्यास सांगून ‘काही दुरुस्त्या आहेत का ?’, ते बघण्यास सांगितले. नंतर त्या धारिकेत एकही चूक नव्हती. यातून ‘स्पंदनांचा अभ्यास कसा करायचा ?’, ते मला शिकता आले.
२. सद्गुरु गाडगीळकाकांविषयी आलेल्या अनुभूती
२ अ. सद्गुरु काकांच्या पायांना तेल लावतांना पायांच्या जागी नेहमी शिवाच्या नागांचे दर्शन होणे : सद्गुरु काकांच्या पायांच्या बोटांपासून ते गुडघ्यापर्यंत तेल लावत असतांना सद्गुरु काका पाय समोर करून पायजमा वर सरकवतात. त्या वेळी त्यांचे दोन्ही पाय हे माझ्या समोर असतांना मला त्या पायांच्या जागी नेहमी शिवाच्या नागांचे दर्शन होते.
२ आ. सद्गुरु गाडगीळकाकांच्या कपड्यांना प्रत्यक्षात आणि सूक्ष्मातून सुगंध येणे : सद्गुरु गाडगीळकाकांच्या कपड्यांना इस्त्री करत असतांना मध्यम आणि तीव्र अशा स्वरूपाचा प्रत्यक्ष सुगंध येतो. हा प्रत्यक्ष सुगंध २ फुटांपर्यंत जाणवतो. त्यांचे कपडे इस्त्री केल्यानंतर तो सुगंध अंदाजे १ घंटा तरी मला स्वतःला अनुभवायला येत असतो, तसेच त्यांचे जे नित्य वापरातील कपडे आहेत, त्यांना मध्यम सूक्ष्म सुगंधही येतो. या स्थूल आणि सूक्ष्म सुगंधांमुळेही साधकांवर आलेले त्रासदायक (काळ्या) शक्तीचे आवरण लवकर दूर होण्यास साहाय्य होते. (क्रमशः)
– श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा. (९.९.२०२३)
याच्या नंतरचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/831512.html
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते, याची चाचणी करतात. याला सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग म्हणतात. या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |