४ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण श्री. भूषण कुलकर्णी यांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे, त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती आणि त्यांची जाणवलेली महानता, यांविषयी सूत्रे पाहिली. आज त्यापुढील भाग पाहुया. (भाग २)
याच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/831242.html
३. सद्गुरु गाडगीळकाकांच्या देहामध्ये जाणवलेले पालट
अ. सद्गुरु गाडगीळकाकांची हातापायांची त्वचा लोण्यासारखी मऊ झाली आहे.
आ. सध्या ते साधकांना सूक्ष्मातील विविध प्रयोग करून दाखवतात. त्या वेळी त्यांचा चेहरा आणि हाताचा तळवा हे पूर्णपणे गुलाबी झालेले दिसतात. त्यांच्या तळहाताला एक वेगळी चकाकी आहे. काही वेळा ते पूर्णपणे केवळ पांढर्या गोळ्याप्रमाणे, म्हणजेच तेजाच्या गोळ्याप्रमाणे दिसतात.
इ. काही वेळा ते समष्टीसाठी वा संतांसाठी नामजपादी उपाय करत असतात. तेव्हा त्यांचे डोळे आणि चेहरा लालबुंद होतो.
ई. त्यांच्या देहाभोवती ६ फुटांपर्यंत सूक्ष्म सुगंध दरवळत असतो. काही वेळा त्यांच्या खोलीच्या बाहेरही १६ फुटांपर्यंत सूक्ष्म सुगंध दरवळतो.
सद्गुरु गाडगीळकाका आणि पू. वामन राजंदेकर (सनातनचे दुसरे बालसंत, वय ५ वर्षे) यांचे एकमेकांशी असलेले आध्यात्मिक नाते
‘सद्गुरु गाडगीळकाका आणि पू. वामन राजंदेकर यांचे एकमेकांशी आंतरिक आध्यात्मिक नाते आहे. पू. वामन यांना सद्गुरु गाडगीळकाका जेव्हा केव्हा भेटायला जाणार असतील, तेव्हा पू. वामन त्यांच्या आईला (सौ. मानसी राजंदेकर यांना) आधीच सांगतात, ‘‘आज सद्गुरु काकांची भेट होईल कि नाही ?’’ याचसमवेत ते सद्गुरु काकांनी केलेल्या अग्निहोत्राची विभूती त्यांच्याकडे
आपणहून मागून घेऊन ग्रहण करतात, तसेच ते प्रत्येक वेळी सद्गुरु काकांशी बोलतांना श्रीमन्नारायण स्वरूप परात्पर गुरुदेवांप्रमाणे आदरभाव ठेवतात.’
– श्री. भूषण कुलकर्णी
४. सद्गुरु गाडगीळकाकांनी साधनेविषयी केलेले मार्गदर्शन
४ अ. मनमोकळेपणाने बोलण्याचे महत्त्व : आपण नेहमीच मनमोकळेपणाने बोलले पाहिजे, म्हणजे मनात काही न राहिल्याने नामजप अधिक होऊ शकतो आणि मन सकारात्मक रहाते.
४ आ. प्रतिदिन सारणी लिखाण करण्याचे महत्त्व : ‘प्रतिदिन सारणी लिखाण करणे’, हा स्वतःच स्वतःशी आणि देवाशी मनमोकळेपणाने बोलण्याचाच एक भाग आहे. त्यामुळे प्रतिदिन ते करायला हवे.
४ इ. सेवा करतांना लक्षात घ्यावयाची साधनेची अंगे : सेवा करतांना ‘माझी अष्टांग साधना होत आहे ना ? माझे लक्ष सेवा परिपूर्ण करण्याकडे आहे ना ? मनाप्रमाणे सेवा न करता विचारून सेवा करत आहे ना ? गुरूंशी वा ईश्वराशी अनुसंधान ठेवत आहे ना ?’, अशा पद्धतीने साधना करायला हवी.
४ ई. कोणतीही कृती करतांना गुरूंना अपेक्षित अशी करणे आवश्यक : कोणतीही कृती घाईने न करता अथवा सेवा उरकून अन्य दुसरी सेवा करायची आहे; म्हणून लवकर उरकण्यापेक्षा ‘ती गुरूंना अपेक्षित आणि त्यातून माझी अखंड साधना होईल’, अशा पद्धतीने करावी.
४ उ. ‘प्रत्येक कृती करतांना आपण अष्टांग साधना करत आहोत ना ?’, हे पहाणे : ‘प्रत्येक क्षणी प्रत्येक कृतीत आपण अष्टांग साधना करत आहोत ना ?’, हे बघायला हवे, उदा. आपण महाप्रसाद ग्रहण करायला गेल्यापासून ते महाप्रसाद झाल्यावर हात धुण्याची कृती करीपर्यंत आपली अष्टांग साधना व्हायला हवी. महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी गेल्यावर ताटे-वाट्या संपल्या असतील, तर ती आणून ठेवणे; स्वतःला ताट वाढून घेत असतांना वयस्कर साधकांना ताट सत्सेवा आणि प्रेमभाव यांनी वाढून देणे किंवा पुसलेले ताट त्यांना देणे (त्याग), जेवण वाढून घेत असतांना ‘तो गुरूंचा प्रसाद आहे’, या भावाने तो घेणे (भावजागृती); प्रसाद ग्रहण करत असतांना तो नामजपासहित ग्रहण करणे (नामजप) किंवा सहसाधकांशी बोलतांना त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे जाणून घेणे आणि नंतर ती लिहून ठेवणे (सत्संग), त्या वेळी स्वतःच्या चुकांचे चिंतन वा ‘आज मी काय प्रयत्न करायचे ?’, याचे चिंतन करू शकतो; तसेच स्वतःकडून झालेल्या चुका त्यांना सांगून ‘त्यातून काय शिकलो ?’ ते सांगून आत्मनिवेदन करू शकतो; प्रसाद ग्रहण करतांना ‘भूलोकातील वैकुंठातील प्रसाद आहे’ वा ‘श्रीकृष्णाशी संवाद साधून प्रसाद ग्रहण करत आहे’, हा भाव ठेवणे, स्वतःला पाणी वा अन्य पदार्थ घेण्यासाठी जात असतांना आपल्या समवेत बसलेल्या साधकांना ‘काही हवे का ?’, ते विचारून ते आणणे (प्रेमभाव); ताट, वाटी आणि पाण्याचा पेला व्यवस्थित धुवून तो त्यांच्या योग्य जागी ठेवणे (परिपूर्ण सेवा करणे) आदी कृती अष्टांग साधना; म्हणून व्हायला हव्यात. अष्टांग साधनेचा हा प्रयत्न प्रत्येक क्षणाक्षणाला व्हायला हवा, तरच त्यातून आपली साधना होईल. याचसमवेत इतरांचा विचारून घेऊन, नियोजनबद्ध कृती आणि गुरूंना अपेक्षित परिपूर्ण सेवा केल्यास साधनेत आपली प्रगती नक्कीच होते.
४ ऊ. आपली सेवा सत्यम्, शिवम्, सुंदरम् अशी कौशल्यपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणे : जेवण झाल्यावर भांडी ठेवतांना ती योग्य त्या ठिकाणी आणि एका रांगेत ठेवायला हवीत, तसेच ती व्यवस्थित मांडून ठेवायला हवीत, जेणेकरून त्यांच्यातून चांगली स्पंदने येतील आणि आपली सेवा सत्यम्, शिवम् अन् सुंदरम् अशी कौशल्यपूर्ण होईल.
४ ए. एका प्रसंगात चिमण्यांकडून शिकण्यास सांगणे
४ ए १. सद्गुरु गाडगीळकाकांच्या खोलीच्या बाहेर चिमण्यांनी बांधलेले घरटे ३ वेळा काढूनही परत चिमण्यांनी नवे घरटे बांधणे : आपण प्रत्येक वस्तू आणि व्यक्ती यांच्याकडून शिकले पाहिजे, उदा. सद्गुरु गाडगीळकाकांच्या खोलीच्या बाहेर चिमण्यांनी घरटे केले होते. एका साधकाने ते काढले. त्यानंतर पुन्हा २ दिवसांनी चिमण्यांनी घरटे केले. पुन्हा एका साधकाने ते घरटे काढले. यानंतर चिमण्यांनी पुन्हा त्याच दिवशी घरटे बांधले. ते पाहून सद्गुरु गाडगीळकाका म्हणाले, ‘‘आता घरटे काढायला नको. त्यांना आपल्या आश्रमात पिल्लाला जन्म देण्यास आणि रहाण्यास सुरक्षित वाटत आहे. त्यामुळे त्यांना घरटे करू दे.’’
४ ए २. चिमण्यांकडून साधनेचे प्रयत्न चिकाटीने आणि सकारात्मकतेने करण्यास शिकण्यास सांगणे : त्यानंतर ते पुढे म्हणाले, ‘‘चिमण्यांकडून आपण त्यांची चिकाटी, कुशलता आणि कष्ट घेऊन जिद्दीने सतत सकारात्मकतेने प्रयत्न करत रहाण्याविषयी शिकू शकतो. त्यांचे घरटे मोडले, तरी त्या थांबल्या नाहीत. त्यांनी पुन्हा लगेचच घरटे नव्या साहित्याने बांधण्यास घेतले. घरटे बांधतांना त्यांनी ते कुशलतेने आणि बारकाईने नियोजन करून बांधले. जर आपले बांधलेले घर तोडले किंवा मोडले असते, तर तो माणूस कंटाळून पुन्हा ते बांधण्यास नकार देईल किंवा निराश होईल; पण चिमण्यांनी तसे केले नाही, तर त्या सतत सकारात्मकतेने प्रयत्न करत राहिल्या आणि त्यांनी यश मिळवले. आपणही त्यांच्याकडून शिकून साधनेचे प्रयत्न चिकाटीने आणि सकारात्मकतेने करू शकतो.’’
५. कृतज्ञता आणि प्रार्थना
सद्गुरु गाडगीळकाका यांचे समष्टी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयीचे सूक्ष्मातील कार्य अद्वितीय अन् अफाट आहे. या लेखात त्यांच्या कार्याविषयी लिहिलेली ईश्वरी व्याप्ती अपुरीच आहे. सद्गुरु काकांची सेवा करण्याची संधी परात्पर गुरुदेव आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या कृपेमुळेच मला मिळाली. त्यामुळे सद्गुरु गाडगीळकाका आणि परात्पर गुरुदेव तुमच्याविषयी सदैव असे वाटते, ‘अशक्य ते शक्य करतील स्वामी !’ आज माझ्यासह सनातनच्या सर्व साधकांना उगवणारा प्रत्येक दिवस परात्पर गुरुदेव, भगवान श्रीकृष्ण, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु गाडगीळकाका यांच्यामुळेच दिसत आहे. ‘सद्गुरु काकांचे अद्वितीय ईश्वरी गुण आत्मसात करण्यासह त्यांच्या समष्टी कार्यात त्यांच्याशी लवकरात लवकर एकरूपता साधली जावी’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना !’ (समाप्त)
– श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा. (९.९.२०२३)
|