बांगलादेशातील हिंदु आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत !

पुणे येथे ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या आंदोलनातील मागणी

हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ

पुणे, ३० ऑगस्ट (वार्ता.) – बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार, अमानुष हत्या यांच्या निषेधार्थ २८ ऑगस्टला येथे ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजप व्यापारी संघटनेचे वरिष्ठ अध्यक्ष श्री. विजय नरेला, हिंदु राष्ट्र समन्वयक समितीचे समन्वयक श्री. सचिन घुले, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचचे डॉ. नीलेश लोणकर, कडेपठार जेजुरी मंदिराचे विश्वस्त अधिवक्ता जेजुरीकर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुणे जिल्हा संयोजक ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, वीर देवस्थान पुजारी श्री. प्रसाद गुरुजी, प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. हनुमंत जाधव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या प्रसंगी श्री. सचिन घुले म्हणाले, ‘‘बांगलादेशने हिंदूंच्या रक्षणाचे आश्वासन दिले, तरी भारत सरकारने हिंदु समाजाच्या आणि मंदिरांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत.’’

श्री. विजय नरेला म्हणाले, ‘‘केवळ माझे घर आणि चाकरी यांपुरते मर्यादित न रहाता हिंदु धर्मासाठी आंदोलनात सहभागी व्हा.’’

देव, देश आणि धर्म यांसाठी एक व्हा ! प्रसाद गुरुजी

आज बांगलादेशातील हिंदूंवर ओढावलेली दयनीय स्थिती उद्या भारतातील हिंदूंवरही ओढावेल, यासाठी गप्प बसून पहात न रहाता देव, देश आणि धर्म यांसाठी सर्वांनी एक झाले पाहिजे.

पुजारी आणि साधू-संत यांना होणारी मारहाण थांबली पाहिजे !ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज

पुणे येथे हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या आंदोलनात मनोगत व्यक्त करतांना ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज

जेव्हा १९७१ मध्ये बांगलादेशाची निर्मिती झाली, तेव्हापासूनच तेथील हिंदूंवर अत्याचार होत आहेत आणि मंदिरांची तोडफोड केली जात आहे. बांगलादेशात लाखभर हिंदू मंदिरे आणि २ कोटींहून अधिक हिंदू बांधव असूनही ते सुरक्षित नाहीत. मंदिरे ही आमची श्रद्धाकेंद्रे आहेत. त्यांची तोडफोड करणे आणि मंदिरातील पुजारी, साधू-संत यांना मारहाण करणे, हे अतिशय निंदनीय असून ते थांबले पाहिजे.

देशभर अशी आंदोलने व्हावीत !अधिवक्ता जेजुरीकर

पुणे येथे हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या आंदोलनात मनोगत व्यक्त करतांना कडेपठार जेजुरी मंदिराचे विश्वस्त अधिवक्ता जेजुरीकर

आज बांगलादेशात उद्रेक होऊन त्यांच्या पंतप्रधानांना भारतात आश्रय घ्यावा लागला. त्यांना मुसलमान देशात नव्हे, तर हिंदूबहुल देशात सुरक्षित वाटत आहे; पण तिकडे हिंदू बांधव, महिला, मंदिरे यांच्यावर अत्याचार होत आहेत. त्यांचे रक्षण करण्यासाठी देशभर अशी आंदोलने करून संपूर्ण जगाचे लक्ष याकडे वेधले पाहिजे.

हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने बांगलादेश सरकारवर दबाव टाकावा ! डॉ. नीलेश लोणकर

पुणे येथे हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या आंदोलनात मनोगत व्यक्त करतांना स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचचे डॉ. नीलेश लोणकर

आज ‘बांगलादेशी हिंदु’ रक्षणासाठी भारत सरकारकडे मोठ्या आशेने पहात आहेत. त्यांचे रक्षण व्हावे आणि त्यांच्या मालमत्तेची हानीभरपाई त्यांना मिळावी यासाठी भारत सरकारने बांगलादेश सरकारवर दबाव टाकावा. ज्या बांगलादेशी हिंदूंना भारतात आश्रय घ्यायचा आहे, त्यांना अनुमती द्यावी आणि बांगलादेशी घुसखोरांची हकालपट्टी करावी, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत.

घुसखोर बांगलादेशींना हाकलून लावणे हाच यावर उपाय आहे ! – हनुमंत जाधव

मानवता हा धर्म मानला, तर तो बांगलादेशी हिंदूंच्या संदर्भात लागू होत नाही का ? भारतात जनगणना होऊन घुसखोर बांगलादेशींना हाकलून लावणे, हाच यावर उपाय आहे.

संपादकीय भूमिका 

बांगलादेशात २ कोटीहून अधिक हिंदू असूनही तेथील मंदिरे असुरक्षित असणे लज्जास्पद !