पुणे जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ चळवळ !

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी पोलीस, प्रशासन, शिक्षण विभाग आदी सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद !

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांना निवेदन देतांना समितीचे साधक

पुणे – १५ ऑगस्टला राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती गेल्या २१ वर्षांपासून ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ या चळवळीद्वारे प्रबोधन करत आहे. या चळवळीच्या अंतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवड, जुन्नर, भोर, शिरवळ, राजगुरुनगर, थेरगाव, पारगाव, कोथरूड, कात्रज येथील ४७ हून अधिक शाळांमध्ये निवेदन देण्यात आले, तसेच ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ याविषयी व्याख्याने घेण्यात आली.

यासमवेत हस्तपत्रके वितरित करणे, भित्तीपत्रके-फ्लेक्स लावणे, स्थानिक केबल वाहिन्यांवर राष्ट्रजागृतीपर ध्वनीचकत्या (सीडी) दाखवणे, विविध ठिकाणी प्रबोधन कक्ष लावून राष्ट्रध्वजाचे महत्त्व विषद करण्यात आले. याशिवाय फलक लिखाण, सामाजिक माध्यमांद्वारे जनप्रबोधन करणे आदी गोष्टी करण्यात आल्या, तसेच जिल्हाधिकारी, पोलीस, स्थानिक लोकप्रतिनिधी, शिक्षण विभाग आदी ठिकाणीही निवेदने देण्यात आली. विद्यार्थ्यांकडून शाळा-महाविद्यालयामध्ये प्रतिज्ञा घेण्यात आली. मुलांमध्ये राष्ट्रप्रेमाचे स्फुलिंग जागृत करण्यासाठी विविध शाळांमध्ये क्रांतीकारकांच्या चित्रांचे प्रदर्शन लावण्यात आले. पुणे जिल्ह्यात ही चळवळ यशस्वी होण्यासाठी जिज्ञासू, धर्मशिक्षणवर्गातील आणि शाखेतील धर्मप्रेमी अन् हिंदु जनजागृती समितीचे साधक यांचा सहभाग लाभला. या चळवळीला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून १५ ऑगस्टपर्यंत हे उपक्रम चालू असणार आहेत.

सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालय, जुन्नर येथे निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते

जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन यांनी ‘राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी आवश्यक कार्यवाही नक्की करू’, असे आश्वासन दिले.

चिंचवड येथील शाळेतील व्याख्यान

वैशिष्ट्यपूर्ण

१. ९ ऑगस्ट या दिवशी पुणे जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम, शिक्षण आयुक्त यांना, तसेच पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

२. बिबवेवाडी पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मनोजकुमार श्रीरंग लोंढे, तसेच पर्वती पोलीस ठाणे अंमलदार यांना निवेदन देण्यात आले.