Houston Protest : ह्युस्‍टन (अमेरिका) येथे बांगलादेशातील हिंदूंवरील अत्‍याचारांच्‍या विरोधात निदर्शने

अमेरिकी सरकारकडे कारवाई करण्‍याची केली मागणी

ह्युस्‍टन (अमेरिका) – बांगलादेशात हिंदूंवर होणार्‍या हिंसाचाराच्‍या विरोधात येथील ‘शुगर लँड सिटी हॉल’मध्‍ये ११ ऑगस्‍टला सकाळी ३०० हून अधिक अमेरिकी, भारतीय आणि बांगलादेशी वंशाच्‍या हिंदूंनी निदर्शने केली. बांगलादेशातील अल्‍पसंख्‍य समुदायावरील हिंसाचाराच्‍या विरोधात त्‍वरित आणि निर्णायक कारवाई करण्‍याचे आवाहन त्‍यांनी राष्‍ट्राध्‍यक्ष जो बायडेन यांना केले. तसेच त्‍यांनी प्रशासनाकडून हिंदूंना संरक्षण देण्‍याची मागणी केली.

१. ‘ग्‍लोबल व्‍हॉईस फॉर बांगलादेश’ या संघटनेने ‘बांगलादेशातील हिंदूंना वाचवा’ या शीर्षकाने येथे शांततापूर्ण निदर्शनाचे आयोजन केले होते. निषेधात सहभागी झालेल्‍या लोकांनी बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचार आणि अत्‍याचार थांबवण्‍याची मागणी करणारे फलकांवर संदेश लिहिले.

२. या वेळी ‘हिंदूंचा नरसंहार थांबवा’, ‘आता उभे ठाका’, ‘हिंदूंचे जगणे महत्त्वाचे’, ‘आम्‍ही पलायन करणार नाही, लपणार नाही’ अशा घोषणाही देण्‍यात आल्‍या.

३. या वेळी विश्‍व हिंदु परिषद आणि ‘हिंदु अ‍ॅक्‍शन’ या संघटनेचे प्रतिनिधी अचलेश अमर यांनी उपस्‍थितांना संबोधित करतांना म्‍हटले की, आम्‍ही बांगलादेशातील आमच्‍या बंधू आणि भगिनी यांच्‍या पाठीशी उभे आहोत. आम्‍ही बांगलादेशी सरकारला दोषींना तात्‍काळ न्‍याय मिळवून देण्‍याची आणि तेथील सर्व नागरिकांची सुरक्षा सुनिश्‍चित करण्‍याची मागणी करतो.