
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी शपथविधीपूर्वी घेतलेल्या एका सभेत ‘ट्रम्पिंग’ म्हणजे ‘हुकूमी’ घोषणा केल्या आहेत. ‘अमेरिकेत बेकायदेशीररित्या रहाणार्यांना हाकलणार, चीनला व्यवसाय देणार नाही, अमेरिकेची शक्ती वाढवणार, रशिया-युक्रेन युद्ध संपवणार आणि तिसरे महायुद्ध होऊ देणार नाही; शाळेत देशभक्ती वाढवणार आणि सैन्य अन् सरकार यांमधून कट्टरतावादी, साम्यवादी आदींना बाहेर काढणार’, अशा घोषणा त्यांनी केल्या आहेत. या सर्वच घोषणा महत्त्वाच्या आणि कौतुकास्पद आहेत. ‘नुकताच झालेला इस्रायल-हमास युद्धविराम हा अमेरिकेचा ऐतिहासिक विजय असून तो त्यांच्यामुळेच झाला’, असेही त्यांनी सांगितले. जगाला शांती हवीच आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या घोषणांचे सर्वत्र स्वागतच होणार; पण याला काही अपवादही असतील. डाव्यांना म्हणजे साम्यवाद्यांना या घोषणांच्या कार्यवाहीमुळे फटका बसणार आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या घोषणा फलद्रूप होऊ नयेत, म्हणून ते प्रयत्नरत राहू शकतात. त्यामुळे साम्यवादी शक्ती जगात अशांती निर्माण होण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
घुसखोरीची समस्या अमेरिकेप्रमाणे भारताला आणि युरोपलाही सतावत आहे. मध्यपूर्वेतील शरणार्थी मुसलमानांना आश्रय देऊन युरोपमधील देशांनी स्वतःचे हात पोळून घेतले आहेत, तर भारतात मुसलमानांच्या लांगूलचालनापोटी काही राजकीय पक्षांनी, तर काही दलालांनी पैशांसाठी बांगलादेशी घुसखोरांना ओळखपत्रे दिली आहेत. ट्रम्प सरकारप्रमाणे भारतानेही बांगलादेशींना हाकलण्यास प्रारंभ करायला हवा.
ट्रम्प यांच्या घोषणांमुळे अर्थव्यवस्थेला उभारी येण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीमुळे गडगडलेल्या अर्थव्यवस्थेला पाठोपाठच्या युद्धांमुळे फटका बसला होता. त्यातल्या त्यात भारताचीच अर्थव्यवस्था मोदी यांच्या काही धाेरणांमुळे सुस्थितीत होती. जो बायडेन यांच्या सत्ताकाळात ‘हिंडेनबर्ग’ या भारतद्वेष्ट्या आस्थापनाने अब्जाधीश भारतीय उद्योगपती अदानी यांच्यावर काही आरोप करून त्यांची कित्येक कोटींची हानी केली, तसेच भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला; पण ट्रम्प आता सत्तेवर येण्यापूर्वीच या आस्थापनाने गाशा गुंडाळला आहे. या सर्व सकारात्मक गोष्टी असल्या, तरी भारताने अमेरिकेशी सावधगिरीनेच पावले उचलणे श्रेयस्कर ठरेल !