बांगलादेश सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनची मागणी
ढाका (बांगलादेश) – ‘बांगलादेश सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन’चे अध्यक्ष एम्. मेहबूब उद्दीन यांनी भारताकडे माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांची बहीण शेख रेहाना यांना अटक करून ढाका येथे परत पाठवण्याची मागणी केली आहे. या वेळी विरोधी पक्ष नेत्या खालिदा झिया यांचे अनेक समर्थकही उपस्थित होते. ‘आम्हाला भारतातील लोकांशी चांगले संबंध निर्माण करायचे आहेत’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. (बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणांवर मौन बाळगणारे भारताशी चांगले संबंध कसे निर्माण करू शकतात ? – संपादक)
हिंदूंना लक्ष्य केले गेले ! – ‘जमात-ए-इस्लामी’ची स्वीकृती
बांगलादेशाच्या ‘जमात-ए-इस्लामी’ पक्षाने शेख हसीना यांच्या त्यागपत्रानंतर बांगलादेशामध्ये हिंदूंना लक्ष्य केले जात असल्याची स्वीकृती दिली आहे. हिंदु मंदिरांनाही लक्ष्य केले जात असल्याचेही त्यांनी मान्य केले.
हसीना सरकारमधील अनेक मंत्री बांगलादेश सोडून गेले !
बांगलादेशातील वृत्तपत्र ‘डेली स्टार’च्या वृत्तानुसार शेख हसीना यांच्या सरकारमध्ये शिक्षणमंत्री राहिलेले मोहिबुल हसन चौधरी आणि सहकारमंत्री महंमद ताजुल इस्लाम विमानाद्वारे देशाबाहेर गेले आहेत. तसेच माजी अर्थमंत्री अबुल हसन महमूद अली, क्रीडामंत्री नजमुल हसन पापोन आणि ढाका दक्षिण सिटी कॉर्पोरेशनचे महापौर शेख फझले नूर तपोश यांनीही देश सोडला आहे. दुसरीकडे बांगलादेशाचे माजी परराष्ट्रमंत्री आणि अवामी लीगचे नेते हसन महमूह यांना ढाका येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर कह्यात घेण्यात आले. ते देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात होते.
आम्हाला आंदोलकांवर गोळीबार करण्यास भाग पाडले गेले ! – बांगलादेश पोलीस संघ
बांगलादेश पोलीस सेवा असोसिएशनने, ‘आम्ही सिद्ध नसतांना आम्हाला अधिकार्यांनी आंदोलकांवर गोळीबार करण्यास भाग पाडले’, असा आरोप केला आहे. असोसिएशनने देशात संपही पुकारला आहे. त्याने म्हटले की, संसद कायदे बनवते, आम्ही केवळ त्यांची कार्यवाही करतो. आम्हाला वरिष्ठ अधिकारी आणि राजकारणी यांचे आदेश पाळावे लागतात, मग ते कायदेशीर असोत किंवा बेकायदेशीर.
५ ऑगस्ट या दिवशी देशातील ४५० हून अधिक पोलीस ठाण्यांवर आक्रमणे करण्यात आली. पंतप्रधान शेख हसीना यांच्या त्यागपत्रानंतर झालेल्या निदर्शनांमध्ये अनेक पोलीस अधिकारी मारले गेले. एका पोलीस अधिकार्याने ‘ढाका ट्रिब्युन’ला सांगितले की, किमान ५० पोलीस मारले गेले आहेत. ढाका वगळता देशातील बहुतांश पोलीस ठाण्यांमध्ये एकही पोलिस कर्मचारी उपस्थित नाही.
बांगलादेशाची ५४ सहस्र कोटी रुपयांची हानी !
बांगलादेशातील हिंसाचारामुळे गेल्या १५ दिवसांत ५४ सहस्र कोटी रुपयांची हानी झाली आहे. यामध्ये वस्त्रोद्योगाला सर्वाधिक १४ सहस्र ३०० कोटी रुपयांची हानी झाली आहे.
अवामी लीगच्या नेत्याचे हॉटेल जाळले : २४ जण ठार
बांगलादेशातील जोशोर येथील अवामी लीगच्या शाहिन चक्कलदार या नेत्याच्या आलिशान हॉटेलला दंगलखोरांनी लावलेल्या आगीमध्ये २४ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये इंडोनेशियातील एका व्यक्तीचाही समावेश आहे.
अवामी लीगचे २९ नेते आणि त्यांचे नातेवाइक यांची हत्या
अवामी लीग आणि त्याच्या सहयोगी पक्षांशी संबंधित किमान २९ नेते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांचे मृतदेह आढळले. यामध्ये अभिनेते शांतो खान आणि त्यांचे वडील सलीम खान यांचाही समावेश आहे. सलीम हे अवामी लीग पक्षाशी संबंधित होते.
दंगलखोरांनी अवामी लीगचे अनेक नेते आणि कार्यकर्ते यांची घरे आणि व्यावसायिक इमारती यांची तोडफोड करून लूटमारही केली. अशोकतळा येथील माजी नगरसेवक महंमद शाह आलम यांच्या ३ मजली घरालाही आग लावण्यात आली होती. या आगीत ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. ‘नाटोर-२’ मतदारसंघाचे खासदार शफीकुल इस्लाम शिमुल यांच्या घराला संतप्त जमावाने लावलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. खासदारांच्या ‘जन्नती पॅलेस’ नावाच्या घरातील अनेक खोल्या, सज्जा आणि छत यांवर मृतदेह आढळून आले. या घराशेजारीच असलेल्या त्यांच्या धाकट्या भावाची ५ मजली इमारत आणि खासदारंचे जुने घरही पेटवण्यात आले.
प्रसिद्ध हिंदु गायक राहुल आनंद यांचे १४० वर्ष जुने घर जाळले !
दंगलखोरांनी बांगलादेशामधील प्रसिद्ध हिंदु गायक राहुल आनंद यांच्या ढाका येथील १४० वर्षे जुन्या घराला आग लावून ते जाळले. आधी त्यांच्या घरातील वस्तूंची तोडफोड करण्यात आली. आक्रमणाच्या वेळी राहुल आनंद त्यांच्या परिवारासह घरात होते; मात्र सुदैवाने त्यांना दंगलखोरांच्या तावडीतून निसटण्यात यश आले. त्यांनी आता बांगलादेशामधील एका अज्ञातस्थळी आश्रय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.
राहुल आनंद यांनी या घरात जवळपास ३ सहस्रांपेक्षा अधिक संगीत वाद्ये जतन करून ठेवली होती. या वाद्यांचीही हानी झाली आहे. गेल्या वर्षी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी बांगलादेशाच्या दौर्यावर असतांना राहुल आनंद यांच्या घराला भेट दिली होती.
भारतीय दूतावासातील १९० कर्मचारी परतले
भारतीय दूतावासातील १९० कर्मचारी बांगलादेशातून परतले आहेत. त्यांच्यासाठी एअर इंडियाचे विमान पाठवण्यात आले होते. ढाकामध्ये अजूनही २० ते ३० कर्मचारी उपस्थित आहेत. त्यांनाही लवकरच भारतात आणण्यात येणार आहे.
नेपाळने सतर्कता वाढवली
नेपाळमधील पोलिसांनी सांगितले की, बांगलादेशातील परिस्थिती पहाता, आंतरराष्ट्रीय सीमा भागातून अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी गृह मंत्रालयाने सुरक्षा यंत्रणांना सीमेवर उच्च दक्षता ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
बांगलादेशातील परिस्थितीवर लक्ष ! – चीन
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशातील स्थितीवर म्हटले की, चीन बांगलादेशातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. बांगलादेश हा चीनचा एक मैत्रीपूर्ण शेजारी आणि सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदार आहे. आम्हाला पूर्ण आशा आहे की, लवकरच बांगलादेशात सामाजिक स्थिरता पुनर्स्थापित होईल.