पुणे – झिका, डेंग्यू, चिकनगुनिया या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत असतांनाच आता शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. डेंग्यूसदृश्य रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने ‘प्लेटलेट्स’ची मागणीही वाढली आहे. परिणामी रक्त आणि प्लेटलेट्स मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना धावपळ करावी लागत असल्याची स्थिती आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रक्तदान शिबिरांची संख्या अल्प झाली आहे, तसेच रक्त आणि प्लेटलेट्सच्या मागणीत ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याचे विविध रक्तपेढी संचालकांनी सांगितले. सध्या सर्वाधिक तुटवडा ‘बी’ आणि ‘ए’ पॉझिटिव्ह रक्तगटाचा आहे. ससून रुग्णालयातील रक्तपेढीत ‘बी पॉझिटिव्ह’ रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे जवळपास १५ रुग्णांना ‘बी पॉझिटिव्ह’ रक्तगटाचे रक्त बाहेरून आणावे लागले आहे. अशीच स्थिती शहरातील खासगी रक्तपेढ्यांची झाल्याने रक्तदान करण्याचे आवाहन रक्तपेढ्यांनी केले आहे.
संसर्गजन्यरोग तज्ञ डॉ. परीक्षित प्रयाग यांनी सांगितले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. तसेच झिका विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी गर्भवती महिलांनी काळजी घेणे आवश्यक आहे.