S T Hasan : (म्हणे) ‘मशिदींवरील भोंगे काढणार्‍यांनी कावड यात्रेतील ‘डीजे’ बंद करावेत !’ – समाजवादी पक्षाचे नेते एस्.टी. हसन

समाजवादी पक्षाचे नेते एस्.टी. हसन यांचा कांगावा

(डीजे म्हणजे मोठी ध्वीक्षेपक यंत्रणा)

समाजवादी पक्षाचे नेते एस्.टी. हसन

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी खासदार डॉ. एस्.टी.हसन यांनी कावड यात्रेविषयी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, मशिदीतून अजानचा (मुसलमानांना मोठ्या आवाजात नमाजासाठी आमंत्रित करण्याचा) आवाज निर्धारित ६० डेसिबल्सच्या वर जाताच पोलीस मशिदीवरील भोंगे काढून घेतात; परंतु दुसरीकडे कावड यात्रेच्या वेळी ‘डीजे’ बिनदिक्कत वाजवले जातात. मशिदींवरून भोंगे काढणार्‍यांनी कावड यात्रेतील ‘डीजे’ही बंद करावेत, अशी मागणी हसन यांनी केली. (वर्षातून एकदा कावड यात्रेनिमित्त ‘डीजे’ वाजवल्याने होणारे ध्वनिप्रदूषण मशिदींवरील भोंग्यांमुळे होणार्‍या ध्वनिप्रदूषणाच्या तुलनेत फारच नगण्य आहे, हे समाजवादी पक्षाच्या नेते लक्षात घेतील का ? – संपादक)

मोहरमच्या काळात राज्य सरकारने शस्त्रांवर बंदी घातली आहे. सरकारच्या या आदेशामुळे हसन संतापले आहेत. ते म्हणाले की, जर निर्बंध लादायचे असतील, तर ते सर्वांवर समानपणे लादले पाहिजेत. सर्व धार्मिक मिरवणुकांमध्ये शस्त्रांवर बंदी घालावी; मग आमचा आक्षेप नसेल, मोहरमच्या काळात अशा निर्बंधांची काय आवश्यकता होती ? मोहरमच्या मिरवणुकीत अनेक वर्षांपासून मुसलमान त्यांची कला दाखवत आहेत. (सरकार राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने असा निर्णय घेत असते, हे हसन यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींना माहीत नाही का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • ‘मशिदींत प्रतिदिन ५ वेळा ध्वनिक्षेपकाचा वापर केला जातो, तर कावड यात्रा वर्षातून एकदाच असते’, हे  हसन यांच्या लक्षात येत नाही असे नाही; पण ते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, हे जाणा !
  • कावड यात्रा केवळ उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये असते, तर मशिदींवरील भोंगे देशाच्या कानाकोपर्‍यांत वाजतात. त्यामुळे त्यांची तुलनाच होऊ शकत नाही, हे हसन यांना कुणीतरी सांगितले पाहिजे !