Tajikistan Hijab Ban : मुसलमानबहुल ताजिकिस्‍तानने हिजाबवर घातली बंदी !

(हिजाब म्‍हणजे मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्‍याचे वस्‍त्र)

दुशान्‍बे (ताजिकिस्‍तान) – सोव्‍हिएत रशियातून स्‍वतंत्र झालेल्‍या मुसलमानबहुल ताजिकिस्‍तान देशाने हिजाबवर औपचारिक बंदी घातली आहे. या संदर्भात संसदेच्‍या वरिष्‍ठ सभागृहाने १९ जून या दिवशी एक विधेयक संमत केले. या बंदीचे उल्लंघन करणार्‍यांकडून दंड वसूल केला जाणार आहे.

गेली अनेक वर्षे ताजिकिस्‍तानमध्‍ये हिजाबवर अघोषित बंदी आहे. आता संसदेत विधेयक संमत झाल्‍यामुळे त्‍याला सरकार मान्‍यता मिळाली आहे. देशात मोठी दाढी ठेवण्‍यावरही अघोषित बंदी आहे. वर्ष २००७ मध्‍ये शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्‍यांसाठी इस्‍लामी पोशाख आणि पाश्‍चात्‍य-शैलीतील मिनीस्‍कर्ट या दोन्‍हींवर बंदी घातली अन् नंतर सर्व सार्वजनिक संस्‍थांमध्‍ये ही बंदी लागू केली.

संपादकीय भूमिका

इस्‍लामी देशामध्‍ये हिजाबवर बंदी घालता येऊ शकते, तर धर्मनिरपेक्ष भारतात का नाही ?