मिशनरी शाळांचे नरक !

मध्यप्रदेशमधील देवास येथील २ ख्रिस्ती मिशनरी शाळांमध्ये हिंदूंच्या अनुसूचित जाती आणि जमाती यांमधील विद्यार्थ्यांना ख्रिस्ती प्रार्थना करण्यास शिकवून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जात होता. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांनी सामाजिक माध्यमांतून हा प्रकार उघडकीस आणला होता. केडगाव (जिल्हा पुणे) येथील एका मिशनरी केंद्राने जुलै २०२२ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत २ हिंदु अनुसूचित जमातीतील अल्पवयीन मुलींना शिक्षणाचे आमीष दाखवून त्यांचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केले. या मुलींना ‘येशूचे रक्त आहे’, असे सांगून ‘वाईन’ प्यायला दिली. त्याला त्यांनी विरोध केल्यानंतर त्यांना सार्वजनिक स्वच्छतागृहे स्वच्छ करायला लावणे यांसह अन्य अत्याचार त्यांच्यावर करण्यात आले. या मुलींच्या नातेवाइकांनाही मुलींना भेटू दिले नाही.

कर्नाटकातील बेंगळुरू येथील एका मिशनरी शाळेत रक्षाबंधनाच्या दुसर्‍या दिवशी शाळेत गेलेल्या मुलांना हातातील राखी काढून कचराकुंडीत टाकण्यास सांगण्यात आले होते. याच शाळेत ‘फ्रेंडशिप डे’ (मैत्री दिवस) मात्र उत्साहाने साजरा केला जातो. उत्तरप्रदेशातील बरेली येथील एका मिशनरी शाळेतही असाच प्रकार घडला होता. येथेही मुलांच्या हातातील राख्या कापण्यात आल्या होत्या. मध्यप्रदेश राज्यातील विदिशा जिल्ह्यातील गंजबासोडा शहरातील एका शाळेत ८ विद्यार्थ्यांचे धर्मांतर केल्याचा आरोप थेट करण्यात आला होता. मध्यप्रदेशातील खंडवा येथील एका मिशनरी शाळेत तर चक्क प्रार्थना सभेच्या वेळी विद्यार्थ्यांना कलमा शिकवण्यात आला होता. कर्नाटकातील दावणगिरे येथील ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून चालवल्या जाणार्‍या एका शाळेत हिंदु मुलांना गोमांस खायला दिले जात असल्याची धक्कादायक माहिती ‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’ने नोव्हेंबर २०२३ मध्ये उघडकीस आणली होती. गाझियाबादच्या एका मिशनरी शाळेत एका विद्यार्थ्याने बाकावर ‘जय श्रीराम’ लिहिले; म्हणून शिक्षिकेने विद्यार्थ्याच्या चेहर्‍यावर द्रव ओतले. यानंतर विद्यार्थी तब्बल पाऊण घंटा खोलीत बसून रडत होता. त्यानंतर त्या शिक्षिकेने त्याचे थिनरसारख्या रसायनाने तोंड धुतले. हा प्रकार नोव्हेंबर २०२३ मध्ये घडला. डिसेंबर २०२३ मध्ये राजस्थानच्या बारन जिल्ह्यातील अंता येथील एका मिशनरी शाळेतील ८ विद्यार्थ्यांनी ‘भारतमाता की जय’च्या घोषणा दिल्या; म्हणून त्यांना ७ दिवसांसाठी शाळेतून निलंबित करण्यात आले. यापूर्वीही यापेक्षा भयावह आणि निंदास्पद घटना मिशनरी शाळांतून घडल्या आहेत. मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पालक मुलांना मिशनरी शाळांमध्ये घालतात; मात्र मिशनरी शाळांचे खरे स्वरूप जाणून पालकांनी मुलांना नरकासमान मिशनरी शाळांत घालायचे का ? याचा निर्णय घ्यायला हवा !

– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.