आजमितीला अनेक पालक पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालत असल्याने विद्यार्थ्यांना २५ डिसेंबर ते १ जानेवारी अशी सुटी मिळते. वर्षाचा शेवट असल्याने शिल्लक सुट्या संपवण्याच्या हेतूने नोकरी करणारे पालकसुद्धा या कालावधीत सुट्या घेऊन सहलीचे नियोजन करतात. यानिमित्ताने पर्यटन तर होतेच, तसेच नेहमीच्या धकाधकीच्या जीवनाला बाजूला करून वेगळे जीवन जगतांना कुटुंबासाठीही वेळ दिला जातो. या सुटीचा उपयोग अनेकदा पालक केवळ मौजमजेसाठी करतात. त्यासाठी रिसॉर्ट, वॉटर पार्क किंवा थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा बेत आखला जातो. ज्यांच्या घरात शाळकरी मुले आहेत, अशांनी सुट्यांचे नियोजन करतांना पर्यटनासह मुलांच्या ज्ञानात कशी भर पडेल ? आणि या ज्ञानाचा उपयोग त्यांना शिक्षणातही कसा होईल ?, याचाही विचार करायला हवा. आपल्या अद्वितीय पराक्रमाने, इच्छाशक्तीने आणि चातुर्याने इतिहास घडवणारे भारतातील महापराक्रमी राजे-महाराजे इतिहासाच्या पुस्तकातून मुलांना ज्ञात होतात. त्यांच्या पराक्रमांची साक्ष देणार्या गड-दुर्गांची माहिती मिळते; मात्र ते जवळून अनुभवण्यासाठी, त्यांच्या पराक्रमाच्या आणि बलीदानाच्या खुणा डोळ्यांनी पहाण्यासाठी, त्यांचे अद्वितीय शौर्य प्रत्यक्ष न्याहाळण्यासाठी मुलांना अशा ठिकाणी घेऊन जाण्यासाठी हीच नामी संधी असते. त्या दृष्टीने गड-दुर्ग दर्शनाचा समावेश सुट्यांच्या नियोजनात करायला हवा.
महाराष्ट्र ही साधू-संतांची आणि अवतारांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आध्यात्मिक भूमी म्हणूनही ओळख आहे. त्यांच्या वास्तव्याने आणि सहवासाने पुलकित झालेली अनेक स्थाने महाराष्ट्रात आहेत. या चैतन्यमय ठिकाणी मुलांना नेऊन त्यांच्यासह स्वतःही तेथील सात्त्विकतेचा लाभ घ्यायला हवा. अष्टविनायक, विविध शक्तीपीठे, ज्योतिर्लिंग या भूमीत वसली आहेत. या प्रत्येक क्षेत्राचा वेगळा इतिहास दूरचित्रवाहिनींवरील मालिका, ग्रंथ आणि सामाजिक माध्यमे आदींच्या माध्यमातून आपण जाणलेला असतो. तो जवळून जाणून घेण्यासाठी आणि तेथील शक्ती अन् चैतन्य अनुभवण्यासाठी अशा ठिकाणी कुटुंबासह जायला हवे. स्वातंत्र्यासाठी प्राणाचे बलीदान करणारे क्रांतीकारक, विचारवंत, समाजसुधारक यांच्या स्मारकांना भेटी देऊन त्यांचे कार्य जाणून घेण्यासाठी सुटीचा उपयोग करता येईल. सुट्यांचे नियोजन करताना पालकांनी या गोष्टीही लक्षात घेऊया !
– श्री. जगन घाणेकर, मुंबई