पदाची लालसा का ? 

तानाजी सावंत, सुधीर मुनगंटीवार आणि छगन भुजबळ

महाराष्ट्रामध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये महायुतीला भरघोस यश मिळाले. त्यातही भाजपला अधिक जागा मिळाल्या. त्यानुसार मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेले, नवीन आमदारांना मंत्रीपद देण्यात आले, तर काही जुन्या आमदारांना मंत्रीपद नाकारले, तसेच ज्यांना मंत्रीपद दिले, त्यांनाही ते अडीच वर्षांसाठीच दिलेले आहे. या निर्णयामुळे काही जुन्या मंत्र्यांनी अप्रसन्नता व्यक्त केली आहे. एवढेच नाही, तर काही मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची अप्रसन्नता व्यक्त करण्यासाठी आक्रमक भूमिकाही घेतली. कार्यकर्ते अशी भूमिका घेत असतांना त्यांचे प्रमुख त्यांना ‘असे करू नका’, हे सांगत नव्हते, याचे आश्चर्य वाटते. हे सर्व पाहिल्यानंतर सामान्य जनतेला प्रश्न पडतो की, आमदारांना मंत्रीपदच का हवे ? जनतेची सेवा करण्यासाठी जनतेने त्यांना निवडून दिलेले आहे, तर मंत्रीपद मिळाल्यानंतरच जनतेची सेवा करता येते, असे नाही. अर्थात् हा विचार सामान्य जनतेचा आहे.

भाजपने मंत्रीपद अडीच वर्षांसाठी देण्यामागे त्या त्या मंत्र्यांची फलनिष्पत्ती बघून पुढील निर्णय घेतला जाणार आहे, हे स्पष्ट केले आहे, तसेच ‘जुन्या मंत्र्यांना पक्षातच महत्त्वाचे दायित्व देण्यात येणार आहे’, असेही सांगितले आहे. खरेतर हा निर्णय योग्यच म्हणावा लागेल; कारण नवीनांना नवीन दायित्व दिल्यास अनेक जण यातून घडतील, जुन्यांना अनुभव आहे, तर त्यांनी आपल्या अनुभवाचा लाभ नवीनांना देऊन त्यांना घडवणे आवश्यक आहे. केवळ आपणच मंत्रीपदाला चिकटून रहाण्याची इच्छा व्यक्त करण्याऐवजी ‘सर्वांनाच कामे करण्याची संधी मिळावी’, असा व्यापक विचार व्हायला हवा. आतापर्यंतच्या म्हणजेच तत्कालीन काँग्रेसच्या शासनकर्त्यांनी घराणेशाही, मंत्रीपदाची आसक्ती, भ्रष्टाचार करणे, स्वतःचे वर्चस्व कायम ठेवणे त्यासाठी वाटेल त्या स्तरावरील राजकारण करणे, हेच केले आहे. त्या पठडीतील मंत्र्यांना भाजपने घेतलेली भूमिका पचनी पडणे कठीणच आहे.

धर्मशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा जन्म धर्म (धार्मिकता, नैतिक मूल्ये), अर्थ (आर्थिक मूल्ये), काम (आनंद, प्रेम, मानसिक मूल्ये) आणि मोक्ष (आत्मसाक्षात्कार) या ४ पुरुषार्थांचे आचरण करण्यासाठी झालेला आहे. प्रत्येकाने जीवनामध्ये आपली इतिकर्तव्ये करतांना आणि झाल्यानंतर मोक्षप्राप्तीचा मार्ग अवलंबणे आवश्यक आहे; परंतु हिंदूंना धर्मशिक्षण न मिळाल्याने या विचारापर्यंत त्यांना पोचताच येत नाही, हे दुर्दैवी आहे. प्रत्येकाला पद, मान-सन्मान, प्रतिष्ठा, पैसा यांचाच हव्यास आहे. पूर्वीच्या राजांप्रमाणे मुलगा हाताशी आल्यानंतर राजा वानप्रस्थाश्रम स्वीकारत असे. ती वृत्ती निर्माण व्हायला हवी. येथे स्थुलातून वानप्रस्थाश्रमात जावे लागत नसले, तरी किमान नवीनांना काम करण्याची संधी देण्यापर्यंतचे पाऊल तरी उचलावे, जेणेकरून त्यातूनच नवीन पिढी निर्माण होऊन राष्ट्राचा विकास होईल !

– वैद्या सुश्री माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.