मुंबई – बोगस आणि चढ्या दराने बियाण्यांची विक्री केल्यास, तसेच खरेदीची अनावश्यक सक्ती केल्यास त्या विरोधात कृषी तक्रार व्हॉट्सॲप हेल्पलाईनच्या ९८२२४४६६५५ या क्रमांकावर तक्रार करता येणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी खरीप हंगामापूर्वी राज्यातील कृषी क्षेत्राचा आढावा घेतला. तक्रार करणार्याचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे.
राज्यात कुठेही कृषी निविष्ठा विक्रेते शेतकर्यांना विशिष्ट आस्थापनांचे बियाणे किंवा खत घेण्याची सक्ती करत असतील, बी-बियाणे, खते किंवा कीटकनाशकांची चढ्यादराने विक्री करत असतील, अनावश्यक वस्तू खरेदी करण्याची सक्ती करत असतील किंवा शेतकर्यांच्या अन्य काही तक्रारी असतील, तर याविषयी वरील क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. तक्रारीमध्ये संबंधित विक्रेत्याच्या दुकानाचे नाव, ठिकाण, तालुका, जिल्हा यांसह उपलब्ध असलेल्या पुरावे वरील व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावेत. या प्रत्येक तक्रारीची तातडीने नोंद घेतली जाईल. त्याविषयी निश्चिती करून कारवाईही केली जाईल, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.