AP Assembly Election Results : आंध्रप्रदेशमध्ये हिंदुद्वेषी वाय.एस्.आर्.ला सत्ताच्युत करत तेलुगू देसम् पक्ष सत्तेत !

  • चंद्राबाबू नायडू घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ  

  • सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाचा पराभव  

तेलुगू देसम् पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू

अमरावती – आंध्रप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर मतमोजणी चालू असून या वेळी सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेसला खाली खेचत चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम् पक्षाने (टीडीपीने) बाजी मारली आहे. टीडीपी पक्षाने मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षापेक्षा अनेक जागांवर आघाडी घेतली आहे. १७५ जागांच्या विधानसभेमध्ये तेलुगू देसम् पक्षाने १५८ जागांवर आघाडी घेतली आहे. चंद्राबाबू नायडू हे ९ जून या दिवशी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, अशी घोषणा तेलुगू देसम् पक्षाने केली आहे. चंद्राबाबू नायडू हे चौथ्यांदा आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री होणार आहेत. वर्ष १९९५ ते २००४ या कालावधीत त्यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते.

१. वर्ष २०१९ मध्ये तेलुगू देसम् पक्षाला वाय.एस्.आर्. काँग्रेसने पराभूत केले होते. या वेळी टीडीपीने पवन कल्याण यांचा जनसेना पक्ष आणि भाजप यांच्याशी युती केली होती. त्याचा लाभही तेलुगू देसम् पक्षाला झाला आहे.

२. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने १९ ते ५९ या वयोगटातील महिलांसाठी प्रतीमहिना १ सहस्र ५०० रुपये पेन्शन देण्याचे घोषित केले होते. त्यासह २० लाख नोकर्‍या उपलब्ध करू आणि बेरोजगारांना महिना ३ सहस्र रुपये देऊ, अशी घोेषणा केली होती.

कारागृहातून मुख्यमंत्रीपदाकडे वाटचाल !

कॉर्पोरेट घोटाळ्याच्या प्रकरणात चंद्राबाबू नायडू यांना कारागृहात पाठवण्यात आले होते. त्यानंतर ते जामिनावर बाहेर आले. त्यांना वर्ष २०२३ मध्ये अटक करण्यात आली आणि त्यानंतर २ महिने ते कारागृहात होते. सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाने सूडाचे राजकारण करून चंद्राबाबू नायडू यांना कारागृहात टाकले, अशी टीका टीडीपीने केली होती. कारागृहातून बाहेर आल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा सत्तेत येण्याचा चंग बांधला. ते भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडले होते. कारागृहातून बाहेर येताच त्यांनी पुन्हा भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये प्रवेश केला. त्यांनी घतेलेल्या या निर्णयाचा त्यांना लाभ झाला.