Chardham Yatra Huge Crowd : चारधाम यात्रेच्या दुसर्‍याच दिवशी यमुनोत्रीच्या चिंचोळ्या ४ कि.मी. मार्गावर प्रचंड गर्दी

सुदैवाने अपघात नाही !

यमुनोत्रीच्या चिंचोळ्या मार्गावर प्रचंड गर्दी !

डेहराडून (उत्तराखंड) : चारधाम यात्रेला १० मे या दिवशी प्रारंभ झाल्यावर दुसर्‍याच दिवशी २२ सहस्र भाविक केदारनाथ येथे पोचले, तर गंगोत्रीमध्ये ५ सहस्र २७७ भाविक पोचले. त्याच वेळी यमुनोत्रीच्या ५-६ फूट रुंदीच्या चिंचोळ्या ४ किलोमीटर मार्गावर ८ सहस्र भाविक पोचल्याने तेथे प्रचंड गर्दी निर्माण झाली.

वास्तविक या मार्गाची क्षमता एकावेळी १-२ सहस्र लोक प्रवास करण्याचीच आहे. अशा स्थितीत येथे चेंगराचेंगरी झाली नाही, हे सुदैव म्हटले जात आहे. प्रशासनाकडून गर्दीचे नियोजन झाले नसल्याचे यातून उघड झाले. या घटनेमुळे तिसर्‍या दिवशी म्हणजे १२ मे या दिवशी प्रशासनाने भाविकांना यमुनोत्रीला न जाण्याचे आवाहन केले.

(सौजन्य : Zee Bihar Jharkhand)

समुद्रसपाटीपासून १० सहस्र ७९७ फूट उंचीवर असलेल्या जानकी चट्टीपासून यमुनोत्री मंदिरापर्यंतचा हा मार्ग गर्दीने भरला होता. एका बाजूला डोंगर आणि दुसर्‍या बाजूला खोल खंदक. तसेच पाऊस आणि कडाक्याची थंडी. गर्दीत लहान मुले, वृद्ध, महिला आणि शेकडो खेचर होते. एक खेचरही भरकटले असते, तर सहस्रो लोकांचे जीव अडचणीत आले असते. ही स्थिती तब्बल २४ घंटे कायम राहिली. अखेर राज्य आपत्ती निवारण पथकाने परिस्थिती हाताळली. या गर्दीच्या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.