गुहागर येथील होमिओपॅथी वैद्य शिवाजी मानकर ‘वैद्यरत्न’ पुरस्काराने सन्मानित !
चिपळूण – गेली ३७ वर्षे निष्ठापूर्वक होमिओपॅथी सेवा करून सहस्रो रुग्णांना व्याधीमुक्त केले आहे. होमिओपॅथीचे महत्त्व लोकांमध्ये पोचले आहे. होमिओपॅथीविषयी ही सकारात्मक भावना आणि या पॅथीचा विश्वास रुग्णांमध्ये निर्माण करण्यात जे काही यश मिळाले, त्याला मिळालेली पोचपावती म्हणजे हा ‘वैद्यरत्न’ पुरस्कार आहे, असे उद्गार होमिओपॅथी वैद्य शिवाजी मानकर यांनी काढले. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील होमिओपॅथी वैद्यांचा मेळावा गुहागर येथे पार पडला. या वेळी वैद्य शिवाजी मानकर यांना ‘वैद्यरत्न’ पुरस्कार आणि मानपत्र देऊन गौरवण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
वैद्य शिवाजी मानकर पुढे म्हणाले की,
१. मागील ३७ वर्षे केवळ आणि केवळ होमिओपॅथीची सेवा (प्रॅक्टिस) केली. जिल्ह्यात अशी सेवा करणारे अपवादानेच होते. त्यामुळे होमिओपॅथी उपचारांबद्दल रुग्णांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे आव्हान होते.
२. या सेवेमुळे जुनाट आजार बरे होऊ शकतात, हा विश्वास रुग्णांना मिळाला आहे. सध्या पुढील पिढी या पॅथीकडे वळत आहे.
३. आयुर्वेद आणि होमिओपॅथी यात सेवा करणारे उपलब्ध साधनसामुग्रीच्या आधारे सेवा करतात; मात्र नवीन पिढीने संशोधनाची कास धरली पाहिजे.
४. मागील १० वर्षे मी यावर संशोधन करत आहे. जिल्ह्यात होमिओपॅथीद्वारे अद्ययावत उपचार आणि संशोधन यासाठी विशेष केंद्र उभारणार आहे. या द्वारे या पॅथीचा प्रसार करून अधिकाधिक रुग्णसेवा साध्य करण्याचा मानस आहे.
५. रुग्ण बरा करणे, हे कोणत्याही पॅथीचे प्रमुख उद्दिष्ट असते, हे लक्षात घेता होमिओपॅथी अथवा आयुर्वेद पूरक (कॉम्प्लिमेंटरी) म्हणून वापरण्यात शहरातील डॉक्टरांचा कल असतो; मात्र फार अल्प डॉक्टर असे करतात.
वैद्य शिवाजी मानकर यांच्या निष्ठापूर्वक कार्याच्या सेवेची दखल !भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असणार्या कोकणात होमिओपॅथीचे बीज वैद्य मानकर यांनी रूजवले. दुर्धर आणि जुनाट आजारांनी जर्जर झालेल्या रुग्णांवर उपचार करून अनेकांना व्याधीमुक्त केले. कोरोनाकाळात होमिओपॅथीच्या पद्धतीने उपचार करणारे कोकणातील पहिले कोविड केंद्र त्यांनी सहकार्यांच्या साहाय्याने चालवले. होमिओपॅथी उपचार करणारे भारतातील ते दुसरे कोविड केंद्र होते. यासह गेल्या ३७ वर्षांत केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. |