Dhar Bhojshala Survey : भोजशाळेविषयी सर्वेक्षणाला इंदूर उच्च न्यायालयाकडून २ महिने मुदतवाढ !

इंदूर (मध्यप्रदेश) – धार येथील भोजशाळेत चालू असलेल्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या सर्वेक्षणाविषयी नुकतीच मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपिठात सुनावणी झाली. या वेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचा अर्ज स्वीकारून उच्च न्यायालयाने सर्वेक्षणासाठी २ महिन्यांची मुदत वाढवली आहे, तसेच सर्वेक्षणाविषयी आक्षेप घेणारी याचिकाही उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

न्यायालयाने पुरातत्व विभागाला भोजशाळेच्या सर्वेक्षणाविषयी अंतिम अहवाल ४ जुलैपूर्वी सादर करण्यास सांगितले आहे. हा अहवाल उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपिठात सादर करावा लागणार आहे.

सर्वेक्षण थांबवण्याची याचिका फेटाळली

मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपिठाने भोजशाळेचे सर्वेक्षण थांबवण्याची मागणी करणारी मुसलमान पक्षाची याचिका फेटाळून लावली. खंडपिठाने मुसलमानांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यास सांगितले.