India Out Campaign Fail : बांगलादेशामध्ये विरोधी पक्षाची ‘इंडिया आऊट’ मोहीम अयशस्वी !

भारताच्या निर्यातीमध्ये पूर्वीच्या तुलनेत वाढ !  

ढाका (बांगलादेश) – मालदीवप्रमाणेच बांगलादेशात ‘इंडिया आऊट’ मोहीम राबवण्याचा ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ (बी.एन्.पी.) या विरोधी पक्षाचा प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरला. ‘बांगलादेश चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’चे महंमद अब्दुल वाहिद म्हणाले की, ‘इंडिया आऊट’ मोहिमेचा व्यवसायावर काहीही परिणाम झालेला नाही.

१. जागतिक बँकेच्या मते, वर्ष २०२१-२२ मध्ये बांगलादेशच्या एकूण आयातीपैकी १२ टक्के आयात भारतातून होती. ती आता १६ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

२. बांगलादेशातील भारतीय दूतावासाच्या म्हणण्यानुसार, कापूस, सूत आणि इतर दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंसारख्या औद्योगिक कच्च्या मालाची आयात गेल्या ३ वर्षांत झपाट्याने वाढली आहे.

३. बांगलादेशातील निवडणुकीपूर्वी भारतातून बेनापोल आणि पेट्रापोल बंदरांवर २०० ते २५० ट्रकची आवक होत होती; परंतु आता प्रतिदिन ४०० ते ४५० ट्रक मालाची आवक होत आहे.

४. ढाक्यातील चांदनी चौक आणि न्यू मार्केट हे भारतीय कपड्यांसाठी प्रसिद्ध आहेत. निवडणुकीनंतर भारतीय वस्तूंच्या विक्रीत वाढ झाल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.

बांगलादेशात भारतातून निर्यात होणार्‍या वस्तू  !

बांगलादेशातील लोक त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी भारतातून पाठवल्या जाणार्‍या वस्तूंवर अवलंबून असतात. यामध्ये भाजीपाला, तेल, सौंदर्य प्रसाधने, कपडे, मोबाईल आणि वाहन यांचा समावेश आहे. बांगलादेशातील मोठी लोकसंख्या भारतातून येणारे दागिने, ‘फॅशनेबल’ कपडे यांसारख्या महागड्या वस्तू खरेदी करतात.