महाराष्ट्रातील लोकांनी स्वभाषाभिमान जोपासायला हवा !

१ मे २०२४ या दिवशी ‘मराठी राजभाषा दिन’ आहे. त्या निमित्ताने…

१. मराठीच्या उदासीनतेविषयी महाराष्ट्राच्या दोन्ही राजधान्यांची दुर्दशा !

 १ अ. मुंबई : येथे दूध विकणारे उत्तर भारतीय लोक शेकडो वर्षांपासून मुंबईत रहात आहेत. ते हिंदीतूनच बोलतात आणि मुंबईकर मराठी त्यांच्याशी मोडक्या-तोडक्या हिंदीतून बोलतात.

१ आ. नागपूर : येथे मी पाहिले, कित्येक मराठी भाषिक हिंदीतून बोलतात; पण पिढ्यान्‌पिढ्या राहिलेले अमराठी मराठीतून बोलणार नाहीत. बंगाली मिठाईवाला मराठीतून बोलणार नाही. नागपूरमधून निवडून आलेले हिंदी भाषिक खासदार अन् आमदार मराठीतून बोलत नाहीत.

२. महाराष्ट्रीय लोकांनी स्वभाषेचा अभिमान जोपासला नाही !

मराठी लोकांमध्ये स्वभाषेविषयी प्रेम निर्माण न होणे, याचा दोष मूळ महाराष्ट्राकडेच जातो. महाराष्ट्रात केवळ जातीयतेचे विष भिनले; भाषेचा अभिमान वृद्धींगत केला गेला नाही. महाराष्ट्रीय लोकांनी स्वभाषेचा अभिमान जोपासला नाही, ही अप्रिय; पण सत्य घटना आहे.

३. स्वभाषेचे लाभ

स्वभाषेने संस्कृती, शिक्षण, बौद्धिक श्रेणी आणि सर्वसामान्य ज्ञान वाढते, तसेच चौकसपणा येतो, साहित्याची वृद्धी होते, हे लाभ काय आम्हास ठाऊक नाहीत ?
– प्रा. ना.ल. वैद्य
(साभार : स्मरणिका, बृहन्महाराष्ट्र महामंडळाचे ४५ वे अ.भा. अधिवेशन ग्वाल्हेर (१२ आणि १३ मे १९९०))