सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त पुणे येथे भव्य ‘सनातन गौरव दिंडी’ !

  • ९ सहस्र धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ झाले अद्वितीय क्षणांचे साक्षीदार !

  • भगवे ध्वज, टाळ-मृदुंग घेतलेले वारकरी, रणरागिणींची स्वसंरक्षण प्रात्यक्षिके, पारंपरिक वेशभूषा, नऊवारी साडी नेसलेल्या सुवासिनी दिंडीचे आकर्षण !

  • सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी !

  • सनातन हिंदु धर्माच्या उद्घोषाने पुण्यनगरी दुमदुमली !

धर्मध्वज पूजन करतांना डावीकडून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे श्री. सुनील रासने आणि पुणे येथील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराचे विश्वस्त श्री. राजेंद्र बलकवडे

पुणे, २१ एप्रिल (वार्ता.) – सनातन धर्माच्या प्रसारासाठी समर्पित असलेल्या सनातन संस्थेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव साजरा करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशवे यांच्या कार्यकर्तृत्वाने पावन झालेल्या, तसेच सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे येथे रविवार, २१ एप्रिल या दिवशी ‘सनातन गौरव दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत दिव्य, चैतन्यमय आणि भावस्पर्शी अशा या दिंडीचे ९ सहस्र जण साक्षीदार झाले. भिकारदास मारुति मंदिरापासून (महाराणा प्रताप उद्यानापासून) श्रीमती विमलबाई गरवारे प्रशाला, डेक्कन या मार्गावर झालेल्या दिंडीत सहभागी झालेल्या सर्वांनी चैतन्य अनुभवले. या दिंडीद्वारे अध्यात्म आणि साधना यांविषयी जनजागृती करण्यात आली. या दिंडीमध्ये सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, पू. (सौ.) मनीषा पाठक, पू. गजानन बळवंत साठे, पू. (सौ.) संगीता पाटील यांची वंदनीय उपस्थिती लाभली. दिंडीत विविध संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सनातन संस्थेचे हितचिंतक, जिज्ञासू आणि साधक उपस्थित होते.

सनातन गौरव दिंडीच्या ठिकाणी काढलेली सुंदर रांगोळी
सनातन गौरव दिंडीच्या प्रारंभी डावीकडून श्री. चेतन राजहंस, स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंचचे महामंत्री श्री. विद्याधर नारगोलकर, महाराष्ट्र गोसेवा अध्यक्ष श्री. शेखर मुंदडा, श्री संप्रदायच्या महिला अध्यक्ष सौ. सुरेखा गायकवाड, श्री. गायकवाड, श्री. सुनील घनवट, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री. सुनील रासने, श्रीमंत लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री. राजेंद्र बलकवडे, पतित पावन संघटना पुणेचे अध्यक्ष श्री. स्वप्नील नाईक आणि ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक श्री सुर्यकांत पाठक आदी मान्यवर मंडळी दिसत आहेत.

सनातन धर्माच्या निर्मूलनाची भाषा करणार्‍यांना हिंदूंनी संघटित होऊन उत्तर देण्याची आवश्यकता ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

या दिंडीविषयी बोलतांना सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस म्हणाले, ‘‘सनातन संस्था गेल्या २५ वर्षांपासून नि:स्वार्थपणे सनातन हिंदु धर्माची सेवा करत आहे. सनातन धर्मावर आलेल्या संकटांच्या विरोधात उभे ठाकणे, सनातन धर्मावरील आरोपांचे खंडण करणे, हिंदूंना धर्माचे शिक्षण देऊन धर्माचरण करण्यास उद्युक्त करणे, सर्वांना एकत्र करून धार्मिक एकतेसाठी आणि धर्मरक्षणासाठी सनातन संस्थेने सातत्याने काम केले आहे. आज कुणीही उठतो आणि सनातन धर्माला डेंग्यू-मलेरियाची उपमा देऊन सनातन धर्माच्या निर्मूलनाची भाषा करतो. त्याला हिंदूंनी संघटित होऊन उत्तर देण्याची आवश्यकता आहे. यासाठी सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने सहस्रो हिंदूंनी एकत्र येऊन ‘सनातन गौरव दिंडी’ काढली आहे.’’

सनातन गौरव दिंडी मार्गस्थ होतांना

उपस्थित संघटना, संस्था आणि संप्रदाय

चिंतामणी प्रासादिक दिंडी, तुकाराम महाराज पालखी सोहळा, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुरंदर विभाग, बोपगाव येथील श्री क्षेत्र कानिफनाथ गड मंदिर, जेजुरी कडेपठार येथील खंडोबा मंदिर, नवलेवाडी येथील प्रासादिक भजनी मंडळ, संतश्रेष्ठ सोपानदेव मंदिर भजनी मंडळ, माऊली वारकरी शिक्षण संस्था, आंबोडी गाव, दिवे येथील विठ्ठल मंदिर भजनी मंडळ, सोमेश्वर कारखाना कॉलनी महिला मंडळ, राऊतवाडी गाव येथील सावतामाळी भजनी मंडळ

डोक्यावर कलश घेऊन दिंडीत सहभागी झालेल्या सुवासिनी !

क्षणचित्रे

१. राष्ट्रपुरुष, क्रांतीकारक आणि संतांच्या वेशातील बालसाधकांचे पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

२. दिंडीमध्ये सर्वजण पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते. त्यामुळे सर्वत्र मांगल्याचे आणि उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.

३. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या फलकांनी समाजातील अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

दिंडीत भोर, शिरवळ, आळंदेवाडी, आळंदे, गोकवडी, नसरापूर, सासवड, हिवरे, निरा, मुरूम, वाघाळवाडी, दिवे, सोरतापवाडी, पवार वाडी, नवलेवाडी, दौंड तालुक्यातील पारगाव सालू मालू, केडगाव, शिरूर तालुक्यातील कोकडेवाडी, वडगाव मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे, उर्से, आढे, पिंपळ खुटे, मोई, देहू, जुन्नर, मंचर, राजगुरुनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, तसेच हडपसर शहर येथून मोठ्या संख्येने धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

धर्मप्रेमी आणि साधक यांनी हातात पकडलेल्या फलकांवरील वैशिष्ट्यपूर्ण मजकूर

१. २५ वर्षांत समाजाला १२७ संत देणारी सनातन संस्था !

२. सनातनच्या यशाचे गमक : देवतांची कृपा, संतांचे आशीर्वाद, हिंदुत्वनिष्ठांचा पाठिंबा !

३. सनातन संस्थेने सांगितलेला ‘गुरुकृपायोग’ म्हणजे कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग यांचा अपूर्व संगम !

४. हिंदु धर्मातील श्रद्धास्थानांचे वैचारिक संरक्षण करणारी सनातन संस्था !

उपस्थित मान्यवर : भोर तालुक्यातील शिंदे गावातील ‘माऊली विद्यार्थी सेवा ट्रस्ट शिंदे संचलित गुरुकुलधाम’चे ह.भ.प. उमेश महाराज शिंदे

दिंडीत सहभागी पालख्या 

दिंडीत सहभागी देवतांच्या पालख्या आणि भाविकजन !

या दिंडीत मोई गावातील विठ्ठल-रुक्मिणी यांची मूर्ती असलेली पालखी, श्री भवानीमाता पालखी, वाघाळवाडी येथील खंडोबा-म्हाळसा यांची पालखी, संत सोपान देव यांची पालखी, छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी, तसेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची पालखी यांचा समावेश होता. याच समवेत वैशिष्ट्यपूर्ण चित्ररथाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

सनातन गौरव दिंडीच्या मार्गावर झालेले भगवेमय वातावरण
सनातन गौरव दिंडीच्या मार्गावर झालेले भगवेमय वातावरण

विविध ठिकाणी दिंडीचे स्वागत, धर्मध्वज पूजन आणि पुष्पवृष्टी !

दिंडीच्या मार्गात १२ हून अधिक ठिकाणी धर्मप्रेमी, समाजातील विविध मान्यवर, प्रतिष्ठित यांच्या हस्ते दिंडीचे स्वागत करून धर्मध्वज पूजन करण्यात आले. दिंडीच्या मार्गावर अनेक ठिकाणी धर्मप्रेमींनी पुष्पवृष्टी केली.


शंखनाद करून भावपूर्ण वातावरणात धर्मध्वजाचे पूजन आणि दिंडी मार्गस्थ !

प्रारंभी पुणे येथील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराचे विश्वस्त श्री. राजेंद्र बलकवडे आणि श्रीमंत दगडूशेठ गणपति ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री. सुनील रासने यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन करण्यात आले. महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. शेखर मुंदडा यांनी श्रीफळ वाढवले. सुवासिनींनी देवतांच्या पालखीचे औक्षण केले. श्री. विजय चौधरी यांनी शंखनाद केल्यानंतर दिंडीला आरंभ झाला. यानंतर संत, सद्गुरु, साधक, धर्मप्रेमी, विविध संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या उपस्थितीत अत्यंत भावपूर्ण वातावरणात अन् जयघोषाच्या गजरात दिंडी मार्गस्थ झाली.


७० हून अधिक वैशिष्ट्यपूर्ण पथकांचा दिंडीत समावेश !

विरांगणा पथक
गरबा पथक
सनातन प्रभात पथक

चिंतामणी प्रासादिक वारकरी दिंडी पथक, ‘सनातन प्रभात’ पथक, केडगाव येथील स्वातंत्र्यवीर सावरकर युवा मंच पथक; आळंदेवाडी, भोर येथील कलश पथक; राजगुरुनगर येथील टाळ पथक; येरवडा येथील बजरंग दलाचे पथक; अंबोडी वारकरी शिक्षण पथक; इस्कॉनचे पथक अशी ७० हून अधिक पथके दिंडीत सहभागी झाली होती.