धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळेचे ४० टक्के सर्वेक्षण पूर्ण

आतापर्यंत सर्वेक्षणातून अनेक मूर्ती, स्तंभ आणि हिंदूंची धार्मिक चिन्हे असलेल्या कलाकृती सापडल्या !

भोजशाळा

धार (मध्यप्रदेश) – येथे असलेल्या भोजशाळेत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षणाचे काम चालू आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत सर्वेक्षणाचे ४० टक्के काम करतांना येथे अनेक हिंदु कलाकृती सापडल्या आहेत.

१. सर्वेक्षण पथकात १५ अधिकारी आणि २५ कामगार यांचा समावेश आहे. १७ एप्रिलला भोजशाळेच्या आवाराबाहेरील गर्भगृहासमोरील हवन कुंडाजवळ सर्वेक्षणाचे काम चालू होते. या पथकाने येथील अकाल कुईया आणि दर्गा भागातही सर्वेक्षण केले.

२. हिंदु पक्षाने म्हटले आहे की, सर्वेक्षणाच्या १५ व्या दिवशी गर्भगृहाच्या मागील भागात ३ पायर्‍या दिसल्या, तर १९ व्या दिवशी भिंतीत गाडलेले गोमुख सापडले आहे. दर्ग्याच्या शेजारी असलेल्या भिंतीत ते गाडले गेले होते. कोणत्याही मंदिरात अभिषेकाचे पाणी गोमुखातून बाहेर पडते. पश्‍चिम भागात एक भिंत आणि खांब यांसारखी रचना सापडली आहे, ज्याचा पाया एक सहस्र वर्षे प्राचीन आहे. येथे मधोमध एक तलाव आहे, त्याची स्वच्छता करतांना अनेक अवशेष सापडले आहेत. मंदिराच्या मध्यभागी यज्ञशाळा आहे.

३. हिंदु पक्षाकडून गोपाल शर्मा म्हणाले की, गर्भगृह, भोजशाळेच्या उत्तर आणि दक्षिण दिशा येथे सर्वेक्षण करण्यात आले आहे. असे काही अवशेष येथे सापडले आहेत, जे भोजशाळेवरील आक्रमणाची कथा सांगतात. सभागृह कसा पाडला गेला ? ते यातून समोर येते. येथे असे अवशेष सापडले असून हा अन्वेषणाचा विषय आहे. या अन्वेषणातून सत्य बाहेर येईल आणि ही भोजशाळा असल्याचे सिद्ध होईल. भोजशाळा आणि तिच्या ५० मीटर परिघात अनुमाने ४० टक्के काम झाले आहे. सर्वेक्षण पूर्ण होण्यास अजून वेळ लागेल असे वाटते. त्यामुळे पुरातत्व विभाग न्यायालयाकडे सर्वेक्षणाचे दिवस वाढवण्याची मागणी करू शकते.

४. सर्वेक्षणात काहीही निष्पन्न झाले नसल्याचे मुसलमान पक्षाचे अब्दुल समद यांचे म्हणणे आहे. २ दिवसांपूर्वी सभागृहामध्ये भगवान गौतम बुद्धांची मूर्ती सापडल्याचा दावा त्यांनी केला.