Chhattisgarh Ram Temple Reopened : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी बंद केलेले श्रीराममंदिर गुढीपाडव्यापासून सर्वांसाठी खुले !

२१ वर्षे बंद होते मंदिर !

रायपूर (छत्तीसगड) – श्रीरामजन्मभूमीत श्रीरामलल्ला ५०० वर्षांनी आरूढ झाल्यानंतर येथील सुकमा जिल्ह्यात दंडकारण्यात असलेल्या श्रीराममंदिराचा वनवासही संपला आहे. गेली २१ वर्षे येथील जे राममंदिर बंद होते, ते ९ एप्रिल २०२४ या दिवशी झालेल्या गुढीपाडव्याच्या मंगलपर्वावर चालू झाले. वर्ष २००३ मध्ये हे मंदिर नक्षलवाद्यांनी बंदुकीच्या धाकावर बंद करण्याचा आदेश दिला होता. आता मात्र केंद्रीय सुरक्षा दलाच्या सैनिकांनी या मंदिराची डागडुजी आणि स्वच्छता करून गावकर्‍यांसाठी ते उघडले आहे. सुकमा जिल्ह्यातील लखपाल आणि केरळपेंडा गावातील ही घटना आहे.

१. पाच दशकांपूर्वी या मंदिरात प्रभु श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.

२. पुढे या भागात नक्षलवाद्यांचा प्रभाव वाढल्यानंतर येथील पूजा-अर्चा हळूहळू बंद पडली. कालांतराने वर्ष २००३ मध्ये नक्षलवाद्यांनी हे मंदिर पूजेसाठी कायमचे बंद केले.

३. अलीकडे सुरक्षा सैनिकांनी या परिसरात मोठी कारवाई करत नक्षलवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्याने नक्षलवाद्यांचा वावर अल्प झाला आहे. सैनिकांच्या ७४ व्या तुकडीने येथे कारवाई केल्याने नक्षलवाद्यांच्या कारवायांवर लगाम लागला.

४. गेल्या महिन्यात १४ मार्चला या परिसरात गस्त घालतांना सैनिकांना हे मंदिर दिसले. जीर्णावस्थेत असलेले हे मंदिर आधी पुष्कळ पुरातन असल्याचा अनुमान लावला गेला. नंतर समजले की, वर्ष २००३ मध्ये नक्षलवाद्यांनी हे मंदिर कायमचे बंद केले होते, तसेच या मंदिराला हानीही पोचवली होती.

५. स्थानिक गावकर्‍यांची मागणी पूर्ण करत सैनिकांनी गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर हे मंदिर गावकर्‍यांसाठी खुले केले.

संपादकीय भूमिका

  • भ्रष्टाचारावर लगाम आणण्याच्या गोंडस नावाखाली नक्षलवाद्यांचा छुपा अजेंडा (धोरण) नेमका काय आहे ?, हेच अशा उदाहरणांतून लक्षात येते !
  • अयोध्येत श्रीरामलल्ला विराजमान झाल्यानंतर अशा घटना घडू लागल्या आहेत. यातून बाबरी उभारल्याने गेल्या ५०० वर्षांत जो-जो अनर्थ घडला, तो दूर करण्यासाठी हिंदूंना आध्यात्मिक पाठबळच मिळाले आहे, असेच म्हणता येईल !