Mariyam Shiuna Apologized : भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यावरून मालदीवच्या माजी मंत्री मरियम यांनी मागितली क्षमा !

यापूर्वी मरियम यांनी पंतप्रधान मोदी यांचा केला आहे अपमान  

(डावीकडे) मालदीवच्या माजी मंत्री मरियम शियुना राष्ट्रपति मोहम्मद मुइज्जू सोबत व एम्.डी.पी.चे आक्षेपार्ह पोस्टर

माले (मालदीव) – मालदीवच्या माजी मंत्री मरियम शियुना यांनी सामाजिक माध्यमांतून विरोधी पक्ष ‘मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टी’चा (एम्.डी.पी.चा) ध्वज आणि भाजपचे निवडणूक चिन्ह यांच्याविषयी केलेल्या पोस्टवरून क्षमा मागितली आहे.

त्यांनी एम्.डी.पी.चे एक पोस्टर पोस्ट केले होते. त्यात भारताच्या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्रासारखे चिन्ह होते. तसेच त्यांनी लिहिले होते, ‘विरोधी पक्ष एम्.डी.पी.वर भारताचा दबाव आहे. अशा परिस्थितीत मालदीवने त्यांना टाळण्याची आवश्यकता आहे.’ या पोस्टमुळे सामाजिक माध्यमांतून वाद निर्माण झाला होता. या टीकेनंतर त्यांनी क्षमा मागितली.  याआधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौर्‍यावरून मरियम यांनी अपमानास्पद वक्तव्य केले होते. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला. या प्रकरणी  त्यांना मंत्रीपदावरून काढण्यात आले होते.

मरियम यांनी म्हटले की, माझ्या पोस्टमुळे झालेल्या कोणत्याही गोंधळ किंवा चिथावणीबद्दल मी मनापासून क्षमा मागते. ही पूर्ण घटना अनावधानाने झाली आणि त्यामुळे झालेल्या गैरसमजाबद्दल मी दिलगीर आहे, हे मी स्पष्ट करू इच्छिते. मालदीवने भारतासोबतच्या आमच्या परस्पर संबंधांना नेहमीच आदर आणि महत्त्व दिले आहेे. अशा परिस्थितीत भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी मी कोणतीही पोस्ट शेअर करतांना अधिक काळजी घेईन.