महाराष्ट्र आणि कर्नाटक यांनंतर उत्तरप्रदेश तिसरे राज्य !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांनंतर आता उत्तरप्रदेशात कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहे. मार्चच्या शेवटी ढगांच्या हालचाली लक्षात घेता राजधानी लक्ष्मणपुरी येथे कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहे. ‘आयआयटी कानपूर’चे प्रा. मनिंद्र अग्रवाल यांनी या संबंधीची चाचणी याआधीच पूर्ण केली आहे. विमान उड्डाण मंत्रालयाने आयआयटीला अधिकाधिक उंचीवर विमान उडवण्याची अनुमती दिली आहे. यामुळे केवळ शेतीलाच साहाय्य होणार नाही, तर हवेची गुणवत्ता सुधारून वायूप्रदूषणावरही नियंत्रण मिळवता येऊ शकेल. वर्ष २०१७ पासून आयआयटी कानपूर कृत्रिम पावसाच्या क्षेत्रात कार्य करत आहे.
कृत्रिम पाऊस कसा पडणार ?
चाचणी सदस्य आणि आयआयटीचे सल्लागार दीपक सिन्हा म्हणाले की, ‘क्लाउड सीडिंग’ म्हणजेच कृत्रिम पाऊस ही हवामान पालटण्याची एक वैज्ञानिक पद्धत आहे. यांतर्गत पाऊस कृत्रिमरित्या तयार केला जातो. विमानांचा वापर करून सिल्व्हर आयोडाइड, मीठ आणि कोरडा बर्फ आकाशात आधीपासून असलेल्या ढगांमध्ये सोडला जातो. यालाच ‘क्लाऊड सीडिंग’ म्हणतात. ही पद्धत अल्प पावसाच्या प्रदेशात पाऊस देणे आणि वायूप्रदूषण अल्प करणे यांसह सिंचनासाठी वापरली जाऊ शकते.