DMK Minister Threatens PM : (म्हणे) ‘मी मंत्री नसतो, तर पंतप्रधान मोदी यांचे तुकडे केले असते !’ – द्रमुक सरकारचे मंत्री टी.एम्. अंबरसन

तमिळनाडूतील द्रमुक सरकारचे मंत्री टी.एम्. अंबरसन यांचे विधान !

(द्रमुक – द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ)

पंतप्रधान मोदी आणि द्रमुक सरकारचे मंत्री टी.एम्. अंबरसन

चेन्नई (तमिळनाडू) : मी मंत्री असल्यामुळे सध्या शांतता राखली आहे. मी मंत्री नसतो, तर मी पंतप्रधान मोदी यांचे तुकडे केले असते, असे विधान तमिळनाडूतील द्रमुक सरकारमधील ग्रामीण उद्योग मंत्री टी.एम्. अंबरसन यांनी केल्याचा त्यांचा काही दिवसांपूर्वीचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्त्याने देहलीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्यामध्ये अंबरसन यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

व्हिडिओमध्ये मंत्री अंबरसन पुढे म्हणत आहेत की, आमचे अनेक पंतप्रधान झाले आहेत, कुणीही असे बोलत नव्हते. मोदी आम्हाला संपवण्याची गोष्ट करतात; पण मी तुम्हाला एक गोष्ट आठवण करून देतो की, द्रमुक ही सामान्य संघटना नाही. अनेक बलीदान आणि रक्तपात यांनंतर ती बांधली गेली. जे द्रमुकला उद्ध्वस्त करण्याचे बोलले, ते उद्ध्वस्त झाले. ही संघटना कायम राहील, हे लक्षात ठेवा !

‘इंडी’ आघाडीचे धोरण असेच आहे ! – भाजपची टीका

भाजपचे माहिती आणि तंत्रज्ञान शाखेचे प्रमुख अमित मालवीय यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत लिहिले की,

‘इंडी’ आघाडीचे धोरण यापेक्षा अधिक स्पष्ट असू शकत नाही. सनातन धर्म आणि त्यावर विश्‍वास ठेवणार्‍यांचा नाश करणे हा त्यांचा उद्देश आहे.

संपादकीय भूमिका

या विधानाचा विरोधी पक्षांतील एकाही राजकारण्याने निषेध केलेला नाही किंवा अंबरसन यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलेली नाही. या उलट जर भाजपच्या एखाद्या मंत्र्याने विरोधी पक्षाच्या नेत्याच्या विरोधात असे विधान चुकून जरी केले असते, तर याच लोकांनी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आकांडतांडव केला असता !