रोगमुक्त आणि विषमुक्त शेतीसाठी ‘अग्निहोत्र’ हाच आधार !

आज ‘विश्व अग्निहोत्र दिन’ आहे. त्या निमित्ताने…

‘आजच्या धकाधकीच्या काळातील भौतिक सुविधांमुळे मनुष्याचे जीवन व्यस्त आणि गतिमान झाले आहे. या संघर्षामागे मनुष्य सुखी व्हावा, हा प्रमुख उद्देश आहे; परंतु शाश्वत सुख म्हणजे काय ? ते कशाने मिळवायचे ? याचे उपाय ठाऊक नसल्यामुळे सर्व अथक प्रयत्न विफल होतांना दिसतात. अधिकाधिक सुविधा साधने जमवत रहाणे, त्याच चाकोरीत फिरत रहाणे यातच सुख समाधान मानले जाते; परंतु एवढे म्हणजेच मानवी जीवन आहे काय ? तर त्याचे उत्तर ‘नाही’ असेच येते.

सभोवताली पाहिल्यास हवा पाण्यापासून ते विचारांपर्यंत प्रदूषण विकोपाला गेले आहे. त्यामुळे ढासळणारे निसर्गाचे संतुलन वेगाने पालटणारे हवामान, नवनवीन व्याधी आणि साथीचे रोग, वाढती अशांती सर्व काही भयसूचक स्थितीला पोचले आहे. सर्वत्र दिशाहीन मरगळ, औदासिन्य, नैराश्य आणि अगतिकता पसरल्याचे आढळते. आजच्या परस्परविरोधी अशा सांप्रदायिक रूढी, तसेच प्रगत तंत्र आणि विज्ञान यांच्याकडे या गोष्टीवरील ठोस असा उपाय नाही; म्हणून आता निसर्गाशी सुसंगत अशी जीवनपद्धत स्वीकारण्याचा आग्रह विचारवंत आणि वैज्ञानिक करत आहेत की, जी आजच्या काळाची आवश्यकता आहे.

शाश्वत सुख मिळवायचे कसे ? वास्तविक सुख ही वस्तू नाही, तर अवस्था आहे. ती चिरंतन टिकणार्‍या आनंदाची आंतरिक अनुभूती असते. ती अवस्था आणि अनुभूती मिळवण्याचा अधिकार प्राचीनतम अशा वेदांनी विश्वातील प्रत्येक व्यक्तीला दिला आहे. त्यासाठी आदर्श अशी जीवनपद्धत दिली आहे.

सनातनच्या ग्रंथाचे मुखपृष्ठ सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी
SanatanShop.com 
संपर्क : ९३२२३१५३१७

१. अग्निहोत्राविषयी…

वायुमंडळ शुद्धीसाठी यज्ञ करणे, यालाच ‘अग्निहोत्र’ असे म्हटले जाते. यज्ञ ही नित्य आचरणाची प्रक्रिया आहे. अग्निहोत्र आचरणाच्या विविध पद्धत सांगितल्या आहेत, ज्यात ‘श्रौत’ आणि ‘स्मार्त’ असे वर्गीकरण मांडले जाते, ज्याला सामान्य भाषेत ‘व्यक्तीगत’ आणि ‘समष्टीवत’ आचरण प्रक्रिया मानतात. सामान्यपणे अग्नीला नित्य आहुती समर्पित व्हावी, ही त्यातील प्रमुख कृती होय. ज्यामध्ये प्रत्येक घरात होणारा नित्य वैश्वदेव प्रयोग, तसेच शिवपुरी, अक्कलकोटवासी सद्गुरु गजानन महाराज यांनी विश्वाच्या कल्याणासाठी पुन्हा प्रस्थापित केलेला प्राचीनतम असा अग्निहोत्र साधना मार्ग, अशा विविध आचरण शैली अपेक्षित आहेत. वेदांचा भर अग्नी उपासनेवर असल्याने प्राचीन काळाप्रमाणे घराघरातून अग्निहोत्र संपन्न होणे, ही आजच्या काळाची आवश्यकता आणि युग संदेश आहे. अग्निहोत्र विधीने वातावरण निसर्गातील ऊर्जा चक्रे गतिमान होतात. अग्निहोत्र विधी आचरण करण्यास सोपा आणि अत्यंत अल्प व्यय (खर्च) लागणारा आहे.

अग्निहोत्रानुसार त्याचे प्रमुख ५ अनुभाग आहेत.

अ. सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्या स्थानिक वेळांचे अचूक पालन करणे.

आ. दशांगुली मापाचे ‘पिरॅमिड’सदृश तांबे किंवा मातीचे यज्ञ पात्र.

इ. देशी गायीच्या शेणापासून सिद्ध केलेल्या शुभा (गोवर्‍या).

ई. देशी गायीचे तूप.

उ. दोन चमचे अखंड तांदुळ.

इतकेच साहित्य यासाठी लागते.

२. अग्निहोत्र करण्याची पद्धत

स्वच्छ, शुचिर्भूत अशा ठिकाणी वैयक्तिक किंवा सामुदायिकपणे अग्निहोत्र आहुती दिली जाऊ शकते. यज्ञपात्रात गोवरीवर थोडे तूप घालून अग्नी प्रज्वलित करावा आणि सूर्योदयाची अथवा सूर्यास्ताची योग्य वेळ साधून प्रज्वलित अग्नीस तूप लावलेल्या तांदुळाच्या २ आहुती द्याव्यात. सूर्योदयाच्या वेळी ‘ॐ सूर्याय स्वाहा, सूर्याय इदं न मम् ।’, ‘ॐ प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं न मम् ।’ या मंत्रांचा उच्चार करावा, तर सूर्यास्ताच्या वेळी ‘ॐ अग्नये स्वाहा, अग्नये इदं न मम् ।’, ‘ॐ प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं न मम् ।’ याप्रमाणे उच्चार करावा. आहुती जळून जाईपर्यंत अग्नीज्वाळेकडे पहात तेथेच शांत बसून रहावे, त्यानंतर त्यात तयार होणारे भस्म वा विभूती आपल्या कपाळावर लावावे.

३. अग्निहोत्राचा परिणाम कसा होणार ?

सध्या ‘अग्निहोत्र चिकित्सा’ जगात पुढे येत आहे. प्राचीन वैदिक परंपरेनुसार आचरलेल्या अग्निहोत्राच्या वेळी ताम्रपत्राच्या (तांब्याच्या) सभोवती प्रचंड प्रमाणात ऊर्जा जमा होते. त्या वेळी तेथे चुंबकीय शक्तीसदृश क्षेत्र निर्माण होते, ज्यामुळे विघातक ऊर्जा निष्क्रिय होऊन पोषक ऊर्जा दृढावतात. परिणामी जी व्यक्ती अग्निहोत्र करते त्याच्याभोवती विधायक शक्तीचे क्षेत्र सिद्ध होते. अग्निहोत्र केले जाते, तेव्हा त्याचा धूर वातावरणातील हानिकारक ‘रेडिएशन’चे (किरणोत्सर्ग) कण गोळा करून सूक्ष्म स्तरावर त्यांच्या ‘रेडिओॲक्टिव्ह’ परिणामांचे निराकरण करतो. यात काहीही नष्ट केले जात नाही, केवळ रचनेत पालट केला जातो. ज्या वेळी अग्निहोत्र केले जाते, त्या वेळी त्यात केवळ अग्निहोत्राचीच ऊर्जा असते, असे नाही; तर अग्नीतून अतीसूक्ष्म ऊर्जा निर्माण होते आणि वेगाने वायुमंडळात प्रक्षेपित केली जाते. यासह आपल्या लक्षात येईल की, या अग्निहोत्रात ज्या द्रव्यांचा प्रयोग केला जातो, त्यांच्यातील औषधी गुणधर्मामुळे या चैतन्यप्रदायी होमाचे पूर्ण परिणाम प्राप्त होतात.

अपायकारक जिवाणूंना निष्क्रिय करण्याचे सामर्थ्य अग्निहोत्रात आहे. आपण अग्निहोत्रातील अग्नी समोर बसलो आणि हविद्रव्याच्या ज्वलनातून निघणारा धूर श्वासाने आत घेतला, तर तो पटकन फुफ्फुसात आणि रक्त प्रवाहात पसरतो. याचा रक्ताभिसरण क्रियेवर उत्कृष्ट परिणाम होतो आणि अग्निहोत्र भस्म सेवन केल्यास त्याहीपेक्षा अधिक चांगला परिणाम होतो.

वनस्पतींना वातावरणातील पोषणद्रव्य मिळतात, त्या सुखावतात आणि त्यांचे पोषण आणि वाढ उत्तम होते. सूर्य ऊर्जा आणतो आणि ऊर्जा घेतो, त्यामुळे प्रदूषण नाहीसे करण्यासाठी जी स्थिती आवश्यक असते, ती पोषक स्थिती आपोआप निर्माण होते.

४. शेतीमध्ये अग्निहोत्रीय वातावरणाचा उपयोग

सध्या शेतीमध्ये रासायनिक खते कीटकनाशक आणि तणनाशक यांचा अतिरेकी वापर वाढल्याने भूमीचे पोषणमूल्य संपुष्टात येत आहे. त्यातून कर्करोग, तसेच हृदयविकार यांसारखे अनेक आजार बळावत आहेत. प्रतिकारशक्ती न्यून झाल्याने मानसिक आणि शारीरिक उदासीनता पहावयास मिळत आहे. भूमीची सुपीकता वाढवण्यासाठी, तसेच विषमुक्त अन्नधन्य निर्माण करण्यासाठी अग्निहोत्राचा चांगला उपयोग होत असल्याचे अनुभव येत आहेत.

‘अल्प आणि दीर्घ मुदतीचे उत्पादन चक्र असलेल्या पिकांवरील सर्व प्रकारची कीड अन् रोग नियंत्रणासाठी उपयोग होतो. ज्वारी, गहू, बाजरी, मका, कांदा, टोमॅटो, कोबी, काकडी याचप्रमाणे केळी, आंबा, संत्री, लिंबू यांसारख्या फळांवरही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी अग्निहोत्रीय वातावरणाचा अधिकाधिक उपयोग होतो’, असे आढळून आले आहे. पाळीव जनावरांचे आरोग्य सुधारणे, तसेच दूध देणार्‍या जनावरांचे आरोग्य आणि दूध देण्याची क्षमता वाढवण्यासाठी अग्निहोत्र उपयोगी ठरते.

५. शेती, भूमी आणि जल यांसाठी अग्निहोत्र हा सर्वांत मोठा आधार !

अ. गांडुळांमुळे भूमीमध्ये खत निर्माण होऊन ते शेतीला पोषक होते. अग्निहोत्र भस्म १०० ग्रॅम आणि तुरटी १०० ग्रॅम हे २०० लिटर पाण्यात मिसळून सकाळच्या वेळी फवारल्यास भूमी भुसभुशीत होते.

आ. ओलसर भूमीत एका मासात एक वेळा हा उपचार केल्यास भूमीतील गांडुळांची संख्या वाढण्यास उपयोग होतो.

इ. जीवामृतामध्येही अग्निहोत्र भस्माचा वापर केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम तात्काळ दिसून येतात.

ई. १३ लिटर पाण्यात ५ ग्रॅम अग्निहोत्र भस्म टाकून पिकावर फवारणी केल्यास कीड नियंत्रण होते.

उ. भूमीखालील पिके हळद, आले, कांदा आणि लसूण यांची वाढ होण्यासाठी या भस्माचा वापर लाभदायक ठरतो.

ऊ. भूमीतील ऑक्सिजनची पातळी वाढण्यासाठी साहाय्य होते. यामुळे भूमीचे पोषण होते. विहीर अथवा कूपनलिकेच्या (बोअरच्या) पाण्यातील क्षार पातळी अधिक असल्यास ते न्यून करण्यासाठी अग्निहोत्र भस्माचा वापर केला जाऊ शकतो.

ए. प्रत्येक एकादशीला देशी गायीचे २ लिटर दूध हे ५ लिटर जैव रसायनात १० लिटर पाण्यासोबत मिसळून विहीर किंवा कूपनलिका (बोअर) यांमध्ये घातल्यास खारे पाणी गोड होते. हा प्रयोग किमान ६ मास सलग करावा. पाण्याचे स्रोत बळकट करण्यासाठी १०० ग्रॅम अग्निहोत्र भस्म आणि १० लिटर गोमूत्र हे १० लिटर पाण्यात मिसळून विहिरीत अथवा कूपनलिका यांमध्ये घातल्यास पाण्याचे स्रोत बळकट होतात. हा प्रयोग प्रत्येक अमावास्या आणि पौर्णिमेला किमान ६ मास सलग करावा.

रोगमुक्त आणि विषमुक्त शेतीसाठी अग्निहोत्र हा सर्वांत मोठा आधार ठरत आहे. त्याचे वैज्ञानिक दृष्टीने परीक्षण करून परिणामकारकता शोध, तसेच चिकित्सा होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने शास्त्रज्ञ विचारवंतांनी पुढे यावे हीच अपेक्षा !’

– रविंद्र दिगंबर देशमुख

(साभार : ‘अग्निसोम सेवा प्रतिष्ठान’ आणि त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, जानेवारी ते मार्च २०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक