पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती यांना अटकपूर्व जामीन संमत !

कोरोना महामारीच्या काळामधील ‘अँटिजेन’ घोटाळा प्रकरण

डॉ. आशिष भारती

पुणे – कोरोना महामारीच्या काळामध्ये वारजे येथील कै. अरविंद बारटक्के रुग्णालयामध्ये कोरोना चाचणी (अँटिजेन) किट, अन्य वैद्यकीय साहित्य यांची खासगी रोगनिदान केंद्रचालकांना परस्पर विक्री केली. त्यातून ८० ते ९० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम्.जी. चव्हाण यांनी अटकपूर्व जामीन संमत केला आहे. या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात महापालिकेचे माजी आरोग्य अधिकारी सतीश कोळुसरे यांनी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती.

डॉ. आशिष भारती यांच्याकडून अधिवक्ता विजयसिंह ठोंबरे यांनी सांगितले की, हा गुन्हा नोंद करण्यापूर्वी सरकारची अनुमती घेणे आवश्यक होते; परंतु ती न घेतल्याने गुन्हा नोंद होऊ शकत नाही. महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि इतर अधिकारी यांनी चौकशी नेमून ‘कोरोना महामारीच्या काळामध्ये जे किट वाटले होते, त्यामध्ये केवळ अनियमितता आढळली आहे, कोणताही आर्थिक घोटाळा झाला नाही, असा युक्तीवाद केला, तसेच तक्रारदार सतीश कोळसुरे यांना पुणे महापालिकेतून बडतर्फ करत असतांना डॉ. भारती यांनी कोणतीही सहानुभूती दाखवली नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात खोटा गुन्हा नोंदवला असल्याचेही सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून ५० सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन संमत केला आहे.