श्रीराममंदिरासाठीच्या ४ दशकांच्या लढ्याचे श्रेय संत आणि धर्माभिमानी हिंदू यांनाच ! – विनोद बंसल, राष्ट्रीय प्रवक्ते, विहिंप

‘अयोध्येचे नाव घेताच प्रभु श्रीरामाची जन्मभूमी आणि त्यासाठी सतत संघर्ष करणार्‍या संघटनेचे नाव आपोआपच मनचक्षूसमोर उभे रहाते. ‘अयोध्या ही प्रभु श्रीरामाची जन्मभूमी आहे’, हे संपूर्ण जगाला ठाऊक आहे. जन्मभूमीवर असलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार करतांना अनुमाने २ सहस्र १०० वर्षांपूर्वी सम्राट विक्रमादित्य यांनी काळ्या कसोटी असलेल्या दगडाच्या ८४ खांबांवर भव्य मंदिर बांधले होते. ते मंदिर परकीय आक्रमक बाबरच्या आदेशानुसार त्याचा सेनापती मीर बाकी याने वर्ष १५२८ मध्ये उद्ध्वस्त केले. त्यातून निर्माण झालेल्या ढिगार्‍यातून मंदिराच्या पायावरच मशिदीसारखी रचना (ढाचा) बांधण्यात आली. वर्ष १९८३ ते वर्ष २०२३ पर्यंत विहिंपने मंदिरासाठी दिलेला लढ्याविषयी माहिती येथे देत आहे.

१. श्रीराममंदिर वाचवण्यासाठी १ लाख ७६ सहस्र रामभक्तांचे हौतात्म्य !

वर्ष १९८३ मध्ये हरिद्वारपासून रामेश्वरम्पर्यंत काढलेल्या रथयात्रेतील एक क्षण

हिंदु मंदिर नष्ट करण्यामागे हिंदु समाजाच्या श्रद्धेवर आघात करून त्यांना बळजोरीने मुसलमान बनवण्याची मानसिकता होती. प्रभु श्रीरामाच्या मंदिरावर बाबराने केलेल आक्रमण थांबवण्यासाठी सतत १५ दिवस लढा चालू होता. या १५ दिवसांत अनुमाने १ लाख ७६ सहस्र रामभक्तांनी हौतात्म्य पत्करले. शेवटी मोगल आक्रमकाने तोफांच्या साहाय्याने मंदिर उद्ध्वस्त केले. वर्ष १५२८ ते १९४९ या कालावधीत निरनिराळ्या वेळेस श्रीराममंदिरासाठी झालेल्या अनुमाने ७६ संघर्षांमध्ये लक्षावधी रामभक्तांनी प्राणांचे बलीदान दिले. आम्ही (हिंदु) कधी जिंकलो, तर कधी थांबलो; पण देवाच्या जन्मस्थानावरील आमचा हक्क कधीच सोडला नाही.

कधी राजा लढला, तर कधी जहागीरदार, कधी संत लढले, तर कधी सामान्य नागरिक. कधी मंदिरात, तर कधी चबुतर्‍यावर बांधलेल्या गोणपाटाच्या मंडपात श्रीराममूर्तीचे दर्शन घेतले. रामभक्तांच्या हृदयात वेदना होतीच; पण एक समाधानही होते की, काहीही झाले, तरी पवित्र जन्मभूमीच्या दर्शनाचे भाग्य लाभले आणि एक दिवस भव्य मंदिरही बांधले जाईल. अयोध्येला आलेला कोणताही भाविक ‘रामलला हम आयेंगे, मंदिर भव्य बनाऐंगे’, अशी तीव्र वेदना आणि मनात संकल्प घेऊन तेथून परत निघत असे.

२. श्रीरामजन्मभूमीसाठी अनेक वर्षे न्यायालयीन लढा !

असे असतांना वर्ष १८८५ मध्ये तत्कालीन ब्रिटीश सरकारच्या काळात न्यायालयाने श्रीरामजन्मभूमीच्या बाजूने निर्णय दिला होता. स्वतंत्र भारतात श्रीरामाच्या पूजेच्या अनुमतीसाठी अयोध्या येथील श्री. गोपाल सिंह विशारद यांनी जानेवारी १९५० मध्ये फैजाबादच्या (आताच्या अयोध्येच्या) जिल्हा न्यायालयात पहिला खटला प्रविष्ट केला होता. याला उच्च न्यायालयानेही दुजोरा दिला. दुसरा खटला रामानंद पंथाचे साधू परमहंस श्री रामचंद्र दास यांनी ५ डिसेंबर १९५० या िदवशी प्रविष्ट केला होता, जो ऑगस्ट १९९० मध्ये मागे घेण्यात आला. तिसरा खटला श्री पंच रामानंदी निर्मोही आखाड्याने डिसेंबर १९५९ मध्ये आणि चौथा खटला सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डानंतर डिसेंबर १९६१ मध्ये प्रविष्ट केला होता. त्यानंतर ५ वा खटला भगवान श्री रामलला विराजमान आणि स्थान श्रीरामजन्मभूमी यांच्याकडून जुलै १९८९ मध्ये प्रविष्ट करण्यात आला.

३. श्रीरामजन्मभूमीच्या मुक्तीसाठी माजी पंतप्रधान काँग्रेसचे गुलझारीलाल नंदा आणि दाऊ दयाल खन्ना यांचे आवाहन

श्री. विनोद बंसल

वर्ष १९४९ पासून श्रीरामजन्मभूमीविषयी सतत कायदेशीर कार्यवाही गोगलगायीच्या गतीने चालू राहिली; परंतु या प्रकरणाला खरे वळण तेव्हा आले, जेव्हा वर्ष १९६४ मध्ये जन्मलेल्या विश्व हिंदु परिषदेने १९ व्या वर्षात प्रवेश केला होता आणि तरुण अवस्थेत आंदोलनाची धुरा खांद्यावर घेतली. ६ मार्च १९८३ या दिवशी मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे झालेल्या एका हिंदु संमेलनामध्ये काशी आणि मथुरेसह श्रीरामजन्मभूमीच्या मुक्तीची हाक देणारे इतर कुणी नाही, तर देशाचे २ वेळा अंतरिम पंतप्रधान राहिलेले काँग्रेसचे गुलझारीलाल नंदा आणि राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दाऊ दयाल खन्ना होते. या संदर्भात या नेत्यांनी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना पत्रही लिहिले होते.

४. श्रीरामजन्मभूमीच्या मुक्तीसाठी विश्व हिंदु परिषदेची संपूर्ण देशभर यात्रा

वरील घटनेनंतर रामजन्मभूमीच्या मुक्तीसाठी एका मागून एक चळवळी उभ्या राहिल्या. तथापि या आंदोलनांची औपचारिक घोषणा होण्यापूर्वी विश्व हिंदु परिषदेने डिसेंबर १९८३ मध्ये देशव्यापी एकात्मता यज्ञाची एक अनोखी योजना आखली. त्या अंतर्गत ‘जाती-भाषा अनेक, सारा भारत एक’ या रामभावाने प्रेरित होऊन हरिद्वारपासून रामेश्वरम्पर्यंत, तसेच गंगासागरपासून सोमनाथपर्यंत संपूर्ण भारताला जोडण्यासाठी लहान-मोठ्या १०० यात्रांनी ५० सहस्रांहून अधिक किलोमीटरचे अंतर कापले.

५. फेब्रुवारी १९८६ मध्ये रामललाची बंदिवासातून सुटका

काँग्रेसचे गुलझारीलाल नंदा आणि ज्येष्ठ नेते दाऊ दयाल खन्ना यांचे आवाहन अन् एकात्मता यात्रेचा उत्साह यांमुळे श्रीरामजन्मभूमीच्या मुक्तीसाठी नवी ऊर्जा मिळाली. परिणामी २१ जुलै १९८४ या दिवशी अयोध्या येथील भागवताचार्य आश्रमामध्ये ‘श्रीरामजन्मभूमी मुक्ती यज्ञ समिती’ स्थापन करण्यात आली. या समितीत गोरक्ष पीठाधीश्वर पू. महंत अवैद्यनाथजी महाराज यांना अध्यक्ष आणि दाऊ दयाल खन्ना यांना महामंत्री बनवण्यात आले. श्रीराम आणि राष्ट्रावरील त्यांची भक्ती यांमुळे ते दोघे या पवित्र कार्याशी जोडले. त्यानंतर एकापाठोपाठ एक कार्यक्रम, चळवळी आणि संघटना निर्माण होत गेल्या, तसेच रामभक्तांचा ताफाही वाढत गेला. वर्ष १९८४ मध्ये  श्रीराम-जानकीच्या रथयात्रा आणि त्यांच्या सुरक्षेसाठी ‘बजरंग दल’ या नावाने तरुणांचा एक गट सिद्ध करण्यात आला. जन्मभूमीच्या टाळेबंदीच्या विरोधात मोहीम तीव्र करण्यासाठी ‘धर्मस्थळ रक्षा समिती’ची स्थापना करण्यात आली. ३१ ऑक्टोबर १९८५ या दिवशी उडुपी येथे झालेले धर्मसंसदेचे आवाहन आणि महंत रामचंद्रदास परमहंस यांची आत्मत्यागाची चेतावणी यांमुळे रामललाची १ फेब्रुवारी १९८६ या दिवशी बंदिवासातून सुटका झाली.

६. वर्ष १९९० मध्ये कारसेवेची घोषणा

वर्ष १९९० मध्ये काढण्यात आलेल्या कारसेवकांच्या आंदोलनाचे संग्रहित छायाचित्र

देवोत्थान एकादशीला (प्रबोधिनी एकादशीला), म्हणजे ९ नोव्हेंबर १९८९ या दिवशी देशातील ४ लाख गावांतून पुजलेल्या दगडांच्या साहाय्याने हरिजन बंधू श्री कामेश्वर चौपाल यांच्या हस्ते संतांच्या उपस्थितीत श्रीराममंदिराचा शिलान्यास झाला. त्यानंतर संतांच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाच्या बैठकीच्या निर्णयानुसार ३० ऑक्टोबर १९९० या दिवशी कारसेवेच्या घोषणेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. हे थांबवण्यासाठी केंद्रातील व्ही.पी. सिंग सरकार आणि राज्यातील मुलायमसिंह सरकार यांच्या चेतावण्या, लाठ्या आणि गोळ्या यांचा सामना करत लक्षावधी कारसेवक कोणत्याही मार्गाने, कोणत्याही वेषात अन् कोणत्याही मार्गाने ‘रामलला’चा जयघोष करू लागले. डोक्यावर भगवे फेटे बांधून ‘रामलला हम आयेंगे, वही मंदिर बनायेंगे’, अशा हृदयस्पर्शी आणि आकाशाला भेदणार्‍या घोषणा देत आम्ही अयोध्येला पोचलो. उत्साही रामभक्तांनी घुमटावर भगवा चढवला. तेव्हा आंदोलनाचे महानायक दिवंगत अशोक सिंघल हेही रक्तबंबाळ झाले होते.

७. रामजन्मभूमीच्या लढ्यात विविध अडथळे येणे आणि उपाययोजना निघणे

त्यानंतर भाजप नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा असो किंवा व्ही.पी. सिंग, चंद्रशेखर आणि पी.व्ही. नरसिंह राव यांच्याशी झालेली चर्चा असो, ६ डिसेंबर १९९२ या दिवशी बाबरी ढाचा पाडण्याचे प्रकरण असो किंवा सप्टेंबर २०१० मध्ये माननीय अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निवाडा, माननीय सर्वाेच्च न्यायालयाच्या सुनावणीत अडचणी निर्माण करण्यासाठी हिंदुद्रोही अन् देशद्रोही काँग्रेसवाल्यांनी न्यायालयावर केलेली सततची शाब्दिक आक्रमणे असोत किंवा ९ सप्टेंबर २०१९ चा ऐतिहासिक एकमताचा आदेश असो, एका पाठोपाठ एक अडथळे येतच राहिले, त्यावर उपाय निघत राहिले आणि संपूर्ण जग त्याकडे टक लावून पहात राहिले.

८. ‘श्रीरामजन्मभूमी निधी समर्पण अभियाना’च्या अंतर्गत ६५ कोटी हिंदूंशी संपर्क

सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाने चळवळी आणि कायदेशीर डावपेच संपुष्टात आले; पण १५ जानेवारी २०२१ पासून चालू झालेल्या ४४ दिवसांच्या ‘श्रीरामजन्मभूमी निधी समर्पण अभियाना’नेही जगभरातील जनजागृती मोहिमांमध्ये एक नवीन कीर्तीमान उच्चांक स्थापन केला. ‘कोविड’ महामारी संकटाच्या विक्राळ दंशानंतरही ‘हे श्रीराममंदिर माझे आहे. श्रीरामाचे आदर्श आणि जीवनमूल्ये माझी आहेत. रामराज्याकडे सर्व मिळून वाटचाल करू. आमच्या मार्गात कितीही अडथळे आले, तरी आम्ही ठाम राहू आणि संपूर्ण हिंदु समाजाला समवेत घेऊन काटेरी वाटेवर मात करू’, या भावनेने पुन्हा एकदा रामभक्त एकत्र आले. देशातील एकूण ६ लाख ५ सहस्र गावांपैकी ५ लाख २५ सहस्र गावांमधील १३ कोटींहून अधिक कुटुंबांतील ६५ कोटी हिंदूंशी संपर्क साधण्यासाठी १० लाख गटांद्वारे ४० लाख कार्यकर्ते एकत्र आले होते.

महामहीम राष्ट्रपतींपासून बहुतेक राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रीगण, प्रतिष्ठित व्यक्ती, समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर, वंदनीय संत यांच्या व्यतिरिक्त सर्व आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या बलवान अन् दुर्बल रामभक्त यांनी भक्ती आणि शक्ती यांहून अधिक निधी अर्पण केला. वर्ष २०२० मध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भूमीपूजनाचे दृश्यही आपण सर्वांनी पाहिले. या सर्वांची परिणती म्हणून आता २२ जानेवारी २०२४ या दिवशी रामलला पुन्हा त्यांच्या भव्य आणि दिव्य मूळ गर्भगृहात विराजमान होणार आहेत.

९. ‘हिंदु संघटित झाले, तर राष्ट्र्रही शक्तीशाली होईल’, हेच विश्व हिंदु परिषदेचे उद्दिष्ट

वर्ष १९८३ ते २०२३ पर्यंत, म्हणजे ४ दशके संपूर्ण जगाने विहिंपचे नियोजन, निर्मिती, संचालन आणि संकटमोचकच्या रूपात या आंदोलनातील योगदान प्रत्यक्षपणे पाहिले; परंतु तिने या सर्वांचे श्रेय स्वतःकडे न घेता वंदनीय संत अन् हिंदू यांना दिले. कधी ‘मार्गदर्शक मंडळ’, तर कधी ‘जन्मभूमी मुक्ती यज्ञ समिती’, कधी ‘मंदिर जीर्णोद्धार समिती’, तर कधी ‘श्रीरामजन्मभूमी ट्रस्ट’, कधी ‘श्रीरामजन्मभूमी मुक्ती संघर्ष समिती’ आणि आता ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’ अशा ठिकठिकाणी त्यांनी संतांचे मार्गदर्शन घेतले. याखेरीज त्यांना सदैव समोर ठेवून श्रेय दिले. विहिंपने प्रत्येक लहान-मोठ्या यशाचे श्रेय नेहमीच संत आणि हिंदु समाज यांना दिले. यासह विहिंप स्वत: अनासक्त भावाने मातृभूमीची सेवा, हिंदु समाजाचे प्रबोधन आणि संघटन या पवित्र कार्यात सक्रीय राहिली.

विहिंपचे एकच उद्दिष्ट होते की, हिंदु संघटित झाले, तर राष्ट्र्रही शक्तीशाली होईल. हिंदु समाजातील भेदभाव संपुष्टात आला, तर समाज समरस आणि आनंदी होईल. या काळात इतर अनेक संघर्षांसह विहिंपने रामसेतू आणि अमरनाथ यात्रेची सुरक्षा यांसाठी एक मोठी अन् निर्णायक लढाईही लढली. हा भाव विहिंपने भगवान हनुमानजींकडून शिकला. प्रभु श्रीरामाचे प्रत्येक अवघड काम त्यांनी सोपे केले; पण त्याचे श्रेय केवळ श्रीराम किंवा त्यांचे अन्य सहकारी यांना दिले.’

– श्री. विनोद बंसल, राष्ट्रीय प्रवक्ते, विश्व हिंदु परिषद. (१६.११.२०२३)