विदर्भ, रायगड आणि पश्चिम महाराष्ट्रातील कारसेवकांचे अनुभव !

…आणि राममंदिर स्थापना अन् रामराज्य यांची मुहूर्तमेढ रोवली गेली !

मी पहिल्या आणि दुसर्‍या अशा दोन्ही कारसेवेमध्ये १५ जणांच्या समुहाने गेलो होतो. नागपूर येथून बसने मध्यप्रदेशच्या सीमेपर्यंत गेलो आणि त्यानंतर पुढे अयोध्येपर्यंत १५ दिवस पायी जावे लागले. या कालावधीत अनेक घरांमध्ये आमची रहाण्याची आणि जेवणाची व्यवस्था मनापासून केली. आमच्या मागे सतत पोलीसही लागलेले होते. त्यामुळे आम्हाला लपूनछपून जावे लागत होते. त्या वेळी अनेक गावे, नद्या, नाले आम्ही रात्रीच्या अंधारातही पार करत होतो. काळाराम मंदिर येथे आमची रहाण्याची व्यवस्था केली होती. लाखो कारसेवक या मोहिमेत सहभागी झाले. मिळेल ती वस्तू घेऊन सर्व कारसेवक ढाच्यावर चढले आणि घुमट तोडले गेले. कारसेवकांनी नंतर लगेच सर्व ढिगारा हटवला. या आंदोलनात अनेक कारसेवकांचे मृत्यूही झाले. मृत कारसेवकांची मृत्यूसंख्या कळू नये, यासाठी तत्कालीन सरकारने काही मृतदेहांना दगड बांधून शरयू नदीत फेकून दिले होते. कारसेवा झाल्यानंतर आम्ही सगळे परतीच्या प्रवासाला निघालो, तेव्हा अडचणी आल्या नाहीत. ढाचा पाडला गेला, तेव्हाच राममंदिर स्थापनेची आणि रामराज्याची मुहूर्तमेढ तिथे रोवली गेली.

– श्री. आशुतोष क्षीरसागर, आकाशनगर, नागपूर.


कारसेवेच्या अगोदर आणि नंतर धर्मांधांकडून आक्रमण होऊनही श्रीरामाच्या कृपेने सुखरूप राहू शकलो !

६ डिसेंबर १९९२ च्या कारसेवेच्या अगोदर म्हणजे ३० नोव्हेंबर १९९२ या दिवशी झाशी रेल्वे स्थानकाच्या पुढे रेल्वे अल्प वेगाने धावत असतांना धर्मांधांनी मला शोधून काढून पुलावरून खाली टाकण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी आमच्या समवेत उपस्थित असणारे अन्य कारसेवक श्री. आणि सौ. फुटाणे, श्री. आणि सौ. कुलकर्णी, तसेच अन्य यांनी मला गराडा घालून त्यांच्यामध्ये घेतले ! आमच्यात बाचाबाची झाली; मात्र त्यांनी मला धर्मांधांच्या स्वाधीन केले नाही. पुढे ४-५ दिवस त्या परिसरात होतो. कारसेवा चालू होताच, दोन दिवस बाबरीचा ढाचा पाडण्याच्या सेवेत सहभागी होतो. यानंतर ढाचा भुईसपाट झाल्यावर तेथे मिळालेल्या देवतांची स्थापना करण्याची संधी मिळाली. त्या वेळी अहोरात्र सेवा करूनही थकवा जाणवला नाही. प्रभु श्रीराम यांनीच सर्व करवून घेतले. परतीच्या प्रवासात लखनऊ आणि बाराबंकी येथे मुसलमानांनी पुन्हा आम्हाला घेरून मारण्याचा प्रयत्न केला, गोळीबार केला; मात्र केवळ श्री गुरुकृपेने मी सुरक्षित राहिलो. १२ डिसेंबर १९९२ या दिवशी माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. प्रभाकर प्रभावळकर यांनी मला गावातून फिरवले. ‘आमचा कारसेवक सुखरूप परत आला’, असे सांगत त्यांनी अनेकांना मला भेटवले.

– श्री. विश्वास पाटील, मलकापूर, जिल्हा कोल्हापूर


याहून सौभाग्याचा क्षण तो कोणता ?

प्रत्येकाच्या आयुष्यात एक संस्मरणीय घटना घडते किंवा त्याच्या सुकृत कर्मामुळे त्याने त्याचा अनुभव घेतलेला असतो. अशीच एक अविस्मरणीय आठवण मी जपून ठेवली आणि तो क्षण मी माझ्या आयुष्यात अनुभवला. अयोध्येची दुसरी कारसेवा होय. अयोध्येत ६ डिसेंबर १९९२ चा सुवर्ण दिवस उजाडला. भक्तीमय वातावरण आणि आनंदाचा दिवस तो मी कधीही विसरू शकत नाही. शरयू नदीमध्ये स्नान करून प.पू. रामचंद्रदास महाराजांच्या आखाड्यात प्रभूंचे दर्शन घेऊन महाप्रसाद ग्रहण करत असतांना दूरूनच प्रत्यक्ष विवादित ढाचा समोर उभा होता. कार्यक्रमस्थळी आम्ही पोचलो. तिथे व्यासपिठावर सुश्री उमा भारती, अशोकजी सिंघल, साध्वी ॠतंभरा देवी, विनय कटियार इतर मंडळींचे क्रांतीमय उद्बोधन चालू होते. त्यांच्याकडून आम्हाला सूचना मिळत होत्या की, कुणीही गोंधळ करू नये. प्रतिकात्मक कारसेवा चालू होईल. कारसेवकांनी आपापल्या जागेवर बसून रहावे आणि कायदा-सुव्यवस्था राखावी. ‘तो कलंक धुवून काढायचा’, असा प्रण (निश्चय) प्रत्येक कारसेवकाने केला होता. कारसेवकांच्या मनात रामक्रांतीचा संचार होऊ लागला आणि बघता बघता ढाचा ध्वस्त झाला. कित्येक कारसेवक घायाळ झाले होते. तो क्षण जणू काही प्रभु श्रीरामाने वध केल्यानंतर रावण कोसळला, तसाच हा क्षण होता. तो अविस्मरणीय क्षण आम्ही अनुभवला. श्रीरामाच्या जयघोषाने आकाश दुमदुमले होते. तिथे कारसेवकांनी शीघ्रतेने तात्पुरत्या स्वरूपातील बांधकाम पूर्ण करून श्रीरामजन्मभूमी स्थळी श्री रामललाला विराजमान केले. ते पाहून आनंदाश्रू यायला लागले. अयोध्येत श्रीरामजन्मभूमी धर्मयुद्धात अनेक रामभक्तांनी बलीदान दिले. त्या दिवंगत कारसेवकांना आता आनंद झाला असेल. येत्या २२ जानेवारीला प्रभु श्रीरामचंद्रांच्या जन्मस्थळी भव्य दिव्य मंदिरात पंतप्रधानांच्या हस्ते श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या अविस्मरणीय सोहळ्याचा मी साक्षीदार आहे. याहून सौभाग्याचा क्षण तो कोणता ?

– श्री. प्रकाश दामोदरराव खानझोडे, नंदनवन कॉलनी, नागपूर.


कारसेवा करतांना घायाळ झालो; मात्र कलंक पुसल्याचा आनंद होता !

६ डिसेंबर १९९२ मध्ये थंडीचे दिवस होते. अयोध्यानगरीत सकाळी ७.३० वाजता हनुमान गढी येथे दर्शन घेऊन तेथेच प्रतिज्ञा केली होती, ‘आज हा कलंक कायमस्वरूपी पुसायचा, मरण आले तरी चालेल; पण बाबरी ढाचा पाताळात गाडून टाकायचा आणि त्यानंतरच परत जायचे.’ सकाळी ८.३० नंतर कारसेवकांचे जथ्थे घोषणा देत रामकथा कुंज मंचासमोरील मैदानात जमा होऊ लागले. जवळपास दीड लाख कारसेवक त्या मैदानात जमा झाले होते. मैदान पुष्कळ मोठे आणि बाबरी ढाचापासून २०० गज अंतरावर होते.काही कारसेवकांचे जथ्थे हे ढाच्याच्या चहूबाजूंनी जाऊन थांबले. कारसेवकांनी सकाळी १०.३० वाजता ढाच्याला सगळ्या बाजूंनी वेढा घातला होता. बाबरीला पोलीस, निमलष्करी दलांचा कडेकोट पहारा होता. या वेळी देश-विदेशातील अनेक पत्रकार परिसराचे चित्रीकरण करत होते. सकाळी ११.३० वाजता भाजपचे मुरली मनोहर जोशी, श्री. अडवाणी, सुश्री उमा भारती हे कारसेवेची सिद्धता पहाण्यासाठी आले. सकाळी ११ वाजता कारसेवकांनी सुरक्षारक्षक आणि पोलीस यांचे कडे तोडून विवादित ढाच्याजवळ प्रवेश केला. कारसेवकांच्या संख्येपुढे पोलीस काही करू शकले नाहीत. कारसेवकांनी बाबरीवर ताबा मिळवला आणि त्यातील ५-६ कारसेवक घुमटावर चढले. इकडे सुश्री उमा भारती यांनी हनुमान चालीसा पठण करण्यास सामूहिकरित्या प्रारंभ केला. काही बजरंगी कारसेवकांनी टोपली, फावडे, पहारी, कुदळ हे साहित्य आणले होते. कारसेवकांनी ढाच्यावर चढून श्रीरामाचा जयजयकार करत कार्यास प्रारंभ केला. दुपारी दीड ते सायंकाळी साडेसहा पर्यंत तीनही घुमट भुईसपाट करण्यात आले. हे घुमट पाडत असतांना अनेक कारसेवक घायाळ झाले होते, तर काही कारसेवक ढिगार्‍यात पडले. माझा पाय मोडला होता, तरी वेदना नव्हती. अपमानाचा कलंक पुसून टाकल्याचा आनंद होता.

– श्री. ग्यानबा म्हाळंगे, अंबाजोगाई (जिल्हा बीड), महाराष्ट्र


कारसेवेसाठी गेलेल्या कै. स्मिता विजय वर्तक यांच्या चातुर्यामुळे अन्य कारसेवकांची अटक टळणे !

माझ्या सासूबाई कै. स्मिता विजय वर्तक या त्यांच्या गावातील म्हणजे नागोठणे येथील हिंदुत्वनिष्ठांसमवेत कारसेवेसाठी गेल्या होत्या. त्यांच्यात नेतृत्वगुण, संघटनकौशल्य, दूरदृष्टी असे अनेक गुण होते. त्या कारसेवेसाठी त्यांच्या गटासमवेत अयोध्या येथे पोचल्या. तत्कालीन उत्तरप्रदेश सरकारचे पोलीस काही ना काही कारण काढून कारसेवकांना पकडत होते आणि अटक करत होते. तेथे गेल्यावर त्यांच्या गटाची झडती घेण्यासाठी अचानक पोलीस आले आणि त्यांचे साहित्य पाहू लागले. त्या वेळी त्यांच्यासमवेत असलेल्या एका हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याजवळ स्वसंरक्षणार्थ घेतलेले एक शस्त्र होते. याची कुणालाच कल्पना नव्हती. पोलीस झडती घेत असल्याचे पाहून त्यांनी त्याविषयी माझ्या सासूबाईंना सांगितले. काही क्षणांचाच अवधी त्यांच्याजवळ होता. तेव्हा माझ्या सासूबाईंनी मोठ्या चतुराईने ते शस्त्र प्रसाधनगृहात लपवले आणि नंतर पोलीस सर्वांची झडती घेऊन निघून गेले. त्यामुळे त्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याची आणि समवेत सर्वांची अटक टळली अन् ते त्यांची कारसेवा पूर्ण करू शकले.

– सौ. रूपाली अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.


कारसेवेला जातांना ‘आलो तर तुझा नाहीतर रामाचा’, असे कुटुंबियांना सांगितले !

प्रभु रामचंद्रांच्या कृपेने बाबरी ढाचा भुईसपाट झाला, त्या वेळी कारसेवेला जाता आले. मी रहात असलेली आमची सगळी वस्ती आम्हाला निरोप देण्यासाठी आमच्या सोबत अर्ध्या वाटेपर्यंत आली होती. श्रीरामाच्या घोषणेने परिसर दणाणून गेला होता. सर्वांचा भाव बघून डोळ्यांत भावाश्रू वहात होते. आधीच्या कारसेवकांचे बलीदान पाहून आई पुष्कळ रडत होती. त्या वेळी आईला एकच वाक्य म्हणालो ‘‘आलो तर तुझा, नाहीतर रामाचा’’ अयोध्येत आज प्रभु रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. हा दिवस केवळ कारसेवकांच्याच नाही, तर संपूर्ण हिंदूंसाठी आनंदाचा क्षण आहे; पण आता आपले दायित्व आणखी वाढले आहे. ते म्हणजे आता रामराज्य म्हणजेच हिंदु राष्ट्र आणण्यासाठी जनजागृती करून हिंदूंना संघटित करणे आवश्यक आहे.

– श्री. दीपक आगवणे, पुणे



रत्नागिरी जिल्ह्यातील कारसेवकांचे मनोगत !

त्या सोनेरी क्षणांचे साक्षीदार होणार, हे आमचे परम भाग्यच !

सौ. सुनीता भावे

मी वर्ष १९९० मध्ये श्रीरामजन्मभूमी मुक्त करण्यासाठी रत्नागिरीतून ट्रकमधून मुंबईला आले. आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातून एकूण ७ महिला जाणार होतो. सर्वांच्या मनात ‘अयोध्येचे दर्शन केव्हा होईल ?’, हा एकच विचार होता. मुंबईमध्ये एका सभागृहात सर्व बंधूभगिनींची ओळख झाली. पुढील प्रवासासाठी आम्ही एकजुटीने रेल्वेत चढलो; माणिकपूरला पोलिसांनी अडवले. पुरुषमंडळींना लाठ्यांचा मारही खावा लागला. सर्वांना गाडीतून उतरावे लागले. त्या दिवशी रात्री आम्ही रस्त्यावरच झोपलो. मुलायमसिंह सरकारचा कारसेवेला कट्टर विरोध आणि त्यामुळे पक्का बंदोबस्त होता. पोलिसांनी आमच्याकडील काठ्या निशाणे काढून घेतली आणि आम्हाला सोडून दिले. सुमारे ५००० कारसेवकांना एका ठिकाणी डांबून ठेवण्यात आले. माणिकपूरहून काही तरुण मंडळी फैजाबादला लपत छपत गेली; पण त्यांना पुढे जाता आले नाही; कारण सर्व मार्गांवर पोलिसांचे कडे होते. त्या वेळी आमच्यासमवेत डॉ. तात्यासाहेब नातू, बाळासाहेब माने, ताई थत्ते इ. नेतेमंडळीही होती. आम्हालाही पुढे जायचे होते; पण ते शक्य नव्हते. कोठारी बंधूंचे कार्य केले ते खरोखरच धडाडीचे होते. त्यासाठी आम्ही सर्व रामभक्त त्यांचे शतशः ऋणी आहोत. त्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार ‘आम्ही माघारी परतावे’, असे ठरले. मनात खिन्नता होतीच; पण मंदिर झाल्यावर आपण सर्वजण मिळून अयोध्येला जाऊ रामप्रभुंचे दर्शन घेऊन कृतार्थ होऊ असे ठरवले. आता ३३ वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटला आहे. २२ जानेवारीला सर्व संकल्पना मूर्त रूप येणार आणि आम्ही त्या सोनेरी क्षणांचे साक्षीदार असणार, हे आमचे परम भाग्यच आहे !

– सौ. सुनीता शशिकांत भावे, रत्नागिरी


श्रीरामाचे छोटे मंदिर रातोरात उभारले !

श्री संतोष करेकर यांचे परिचय पत्र

अयोध्येला जाण्यापूर्वी राजापूरला मारुति मंदिरमध्ये बैठक झाली. तेथे दुपारी जेवण करून रत्नागिरीला ट्रकने गेलो. रत्नागिरीला पतित पावन मंदिरात सर्व कारसेवकांची एकत्रित बैठक झाली. तेथूनच मुंबईचा प्रवास ट्रकने चालू झाला. मुंबईला संघाच्या कार्यालयात रात्रीचे भोजन झाले. त्यानंतर अयोध्येला जाण्याचे नियोजन चालू झाले. कारसेवकांना ओळखपत्र आणि परिचय कार्ड देण्यात आले. तेथून रात्री रेल्वेने अयोध्येचा प्रवास चालू झाला. प्रत्येक स्थानकावर कारसेवक चढत होते. रत्नागिरी जिल्ह्याचे आम्ही  महिला आणि पुरुष मिळून ६० कारसेवक होतो. राजापूरचे आमचे मित्र गोखले, नाटे गावचे ठाकूर, तळवडे गावचे सुहास सप्रे, राजापूरचे दिलीप नाटेकर असा आमचा गट होता. सगळे आम्ही एका डब्यात होतो. जेवणाच्या वेळेला आम्हाला प्रत्येक स्थानकावर विश्व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते पोळी-भाजी आणून द्यायचे. असा प्रवास चालू असतांना नैनीताल शहरामध्ये आमची रेल्वे थांबवण्यात आली. त्या वेळी तपासणी चालू होती. पोलिसांनी आम्हाला पकडून पोलीस ठाण्यात नेले. नंतर एका तंबाखूच्या गोडावूनमध्ये आम्हाला बंद करून ठेवण्यात आले. तिसर्‍या दिवशी स्थानिक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सोडवले. तेथून सुटल्यावर चोर वाटेने ट्रकमधून अयोध्येच्या सीमेपर्यंत (बॉर्डरपर्यंत) नेले. तिथून पुढे पायवाटेने चालत अयोध्या गाठली. त्या वेळी तेथील स्थानिक कार्यकर्त्यांनी आमची निवास आणि खाण्याची व्यवस्था केली होती. सकाळी ९ वाजता अयोध्येत पुढे जायचे आहे. त्या वेळी सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. कारसेवकही भरपूर होते. लोखंडी गंज तोडून कारसेवक ढाचावर चढले. कुणी वरून तोडत होते, कुणी खालून तोडत होते. हा.. हा.. म्हणता ढाचा भुईसपाट झाला होता. त्यानंतर सत्यनारायणाची पूजा करण्यात आली आणि श्रीरामाचे छोटे मंदिर रातोरात बांधण्यात आले. या वेळी या प्रसंगात मी प्रत्यक्ष होतो, हे माझे भाग्य ! ढाचा पाडल्यानंतर अयोध्येतील सगळी माणसे हातावर दिवे, मेणबत्ती घेऊन नाचत होते. सकाळी ६ वाजता संचारबंदी लावण्यात आली. मग तेथील स्थानिक कार्यकर्त्यांनी आम्हाला रेल्वेमध्ये बसवून दिले. चौथ्या दिवशी आम्ही मुंबईला आणि २ दिवसांनी मुंबई-येरडव बसने घरी आलो.

– कारसेवक श्री. संतोष दिगंबर कारेकर
मु.पो. रायपाटण, ता. राजापूर, जि. रत्नागिरी.