हिंदूंच्या पुनरुत्थानासाठी आयोजित ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’मधील उद्बोधक विचार !

हिंदु धर्माच्या अस्तित्वासाठी राजकारणातील सातत्य आवश्यक ! – कु. रश्मी सामंत, हिंदुत्वनिष्ठ युवा नेत्या

बँकॉक (थायलंड) – ऑक्सफर्ड विद्यापिठात हिंदु असल्याने विद्यार्थी संघाचे अध्यक्षपद सोडावे लागलेल्या रश्मी सामंत याही ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’ला उपस्थित होत्या. युवा नेत्या असलेल्या सामंत या वेळी म्हणाल्या की, जगभरात १ अब्ज २० कोटी हिंदू असून ते १९० वेगवेगळ्या देशांत रहात आहेत. आपण प्रत्येक देशातील पहिल्या १० टक्के प्रतिष्ठित म्हणजेच देशहितासाठी परिणामकारक कार्य करणार्‍या समाजाचा भाग आहोत. आपण त्या-त्या देशातील अर्थव्यवस्था, शिक्षण आणि अन्य सर्व क्षेत्रांत आपले भरघोस योगदान देत आहोत. हिंदु धर्माच्या रक्षणासाठी राजकारण सातत्य अपरिहार्य आहे.

सौजन्य Organiser Weekly

सामंत पुढे म्हणाल्या की,

१. आपण इतिहासातही पुष्कळ उत्तुंग कार्य केले आहे. केवळ भारतातील स्वातंत्र्य संग्रामच नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णियांवरील अन्यायाच्या विरोधातील कार्य असो कि श्रीलंकेचा स्वातंत्र्य संग्राम असो. असे असले, तरी ज्या हिंदूंमुळे हे देश उभे राहिले, त्यांनाच बाजूला सारण्यात आले. मलेशियापासून फिजीपर्यंत तसेच त्रिनिदाद असो कि गयाना, देशांची ही सूची पुष्कळ मोठी आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश येथील राजकीय माघार आपल्यासाठी सर्वाधिक धक्कादायक गोष्ट आहे. या सर्व देशांची उदाहरणे पाहिली, तर आपल्याला लक्षात येईल की, राजकीय स्तरावर हिंदूंची पिछेहाट झाल्यास काय घडू शकते !

२. जगभरात आपल्याकडे अतुलनीय कौशल्य असलेले हिंदू आहेत. आपली एक निश्‍चित कार्यप्रणाली असून त्याआधारे अनेक हिंदु राजकीय क्षेत्रात सर्वोच्च पदांपर्यंत पोचलेही आहेत; परंतु एकदा त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली की, हिंदु प्रतिनिधित्वाविना पुष्कळ काळ तसाच लोटला जातो. त्यामुळे त्या-त्या देशातील हिंदु समाजाची स्थिती बिकट होत जाते. त्यामुळेच राजकीय स्तरावर आपली कार्यप्रणाली असणे अत्यंत आवश्यक आहे.

राजकारण हे हिंदूंसाठी अपरिहार्य आहे, हे जाणा ! – रश्मी सामंत

रश्मी सामंत

राजकारणाविषयी असलेली उदासीनता ही हिंदूंमध्ये सामान्य आहे. यातून महाभारताच्या काळात अगदी अर्जुनसुद्धा सुटलेला नाही. युद्धाच्या ऐन मोक्यावर अर्जुन त्याच्या हातातील शस्त्रे खाली ठेवणार होता. त्याला वाटले की, राजकारण हे अप्रासंगिक आहे. त्याच्या मनात याविषयी भ्रम निर्माण झाला. भगवान श्रीकृष्णाने त्याला उपदेश केल्यावरच त्याचा भ्रम दूर होऊन तो युद्ध करण्यास पुन्हा तयार झाला. यातून आपणही बोध घेतला पाहिजे आणि राजकारण हे अपरिहार्य असल्याचे लक्षात घेतले पाहिजे.

प्राचीन संस्कृतीचे आचरण केले, तरच आपले भविष्य उज्ज्वल ! – मीनाक्षी शरण, हिंदुत्वनिष्ठ

मीनाक्षी शरण

हिंदूंच्या परंपरा आणि चालीरिती यांच्या विरोधात कार्यरत कथानकांना हिंदूंनी बळी पडता कामा नये. हिंदु धर्मात कुठेही असमानतेची भावना नाही. धर्मात ब्रह्मापासून अगदी गवताच्या एका गंजीपर्यंत सर्वांना पूजण्यात येते. स्त्रियांना शक्तीच्या (देवीच्या) रूपात पूजले जाते. हुंड्यासारख्या सामाजिक अनिष्ट रूढींना आपण समाजातून हद्दपार केले पाहिजे. प्राचीन संस्कृतीचे आचरण केले, तरच आपले भविष्य उज्ज्वल होईल, असे वक्तव्य ‘अयोध्या फाऊंडेशन’च्या संस्थापिका मीनाक्षी शरण यांनी येथे झालेल्या ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’च्या एका परिसंवादात बोलतांना केले.