१. शारीरिक त्रास होणे
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी आल्यावर मला सकाळपासून अकस्मात् सर्दी आणि अशक्तपणा यांचा तीव्र त्रास होत होता. मला दिवसभर सेवा करतांनाही तसाच त्रास सतत जाणवत होता आणि रडूही येत होते.
२. गुरुदेवांच्या कृपेने सकारात्मक विचार येऊन दिवसभर सेवा करता येणे
देवाच्या कृपेने माझ्या मनात ‘मला महोत्सवाच्या सेवेचा पूर्ण लाभ घ्यायचा आहे’, हा विचार येत होता. ‘संघर्ष करून देवाला अनुभवण्याची हीच संधी आहे’, असा सकारात्मक विचार गुरुदेवांनीच मला दिला. मला आसंदीवर बसणेही सहन होत नव्हते; पण केवळ गुरुदेवांच्या कृपेने मला दिवसभर सेवा करता आली.
३. महाप्रसाद घेण्यापूर्वी अन्नपूर्णादेवीला प्रार्थना केल्यामुळे ‘अन्नपूर्णादेवी प्रेमाने घास भरवत आहे’, असे जाणवणे
संध्याकाळी ७.३० वाजता मला वेदना अगदीच असह्य झाल्या. तेव्हा महाप्रसाद घेण्यापूर्वी मी अन्नपूर्णादेवीला ‘अन्नातील चैतन्य ग्रहण होऊन माझ्यातील सर्व नकारात्मकता आणि माझे त्रास नष्ट होऊ देत’, अशी प्रार्थना केली. प्रार्थना करतांना ‘माझ्यासमोर ठेवलेले जेवणाचे ताट संपूर्णपणे चैतन्याने भारित झाले आहे आणि त्यातून चैतन्याचे किरण प्रक्षेपित होत आहेत’, असे मला जाणवत होते. मला स्वतःला जेवणे कठीण जात होते. तेव्हा ‘अन्नपूर्णामाताच माझ्या बाजूला उभी आहे आणि ती मला एक एक घास प्रेमाने भरवत आहे’, असे मला जाणवले. त्यामुळे ‘मला चैतन्य मिळून पुढील सेवा करण्यासाठी बळ मिळत आहे’, असे माझ्या लक्षात आले. आणखी थोडा भात वाढून घेण्यासाठी मी पटलाकडे जाण्यास निघाले. तेव्हा अन्नपूर्णादेवी सूक्ष्मातून स्वतःच मला वाढण्यासाठी तिथे उभी असलेली मला दिसली. तिच्या प्रेमळ कृपादृष्टीने पुष्कळ कृतज्ञता वाटून माझी भावजागृती होत होती.
४. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या अस्तित्वामुळे नियोजन आणि सेवा होऊ शकणे
एक सेवा करतांना आढावा आणि सेवेचे नियोजन यांच्या बैठका होत असत. तेव्हा ४ बैठकांमध्ये ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव सर्वांमधे बसलेले आहेत’, असे मला जाणवत होते. केवळ त्यांच्याच कृपेने नियोजन आणि सेवा इत्यादी होऊ शकले.
‘केवळ सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेमुळे मला ही अनुभूती घेता आली, त्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. श्रेया गुब्याड, पुणे (१६.६.२०२३)