Gavaskar Tricolour Defaced : क्रिकेट सामन्याच्या वेळी राष्ट्रध्वजाची विटंबना झाल्यावरून सुनील गावस्कर यांनी घेतला आक्षेप !

समालोचनाच्या वेळी मूळ विषयाला बगल देऊन व्यक्त केल्या राष्ट्रभावना !

माजी जगप्रसिद्ध फलंदाज सुनील गावस्कर

कोलकाता (बंगाल) – माजी जगप्रसिद्ध फलंदाज सुनील गावस्कर यांनी क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेच्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याच्या वेळी भारतीय राष्ट्रध्वजाची विटंबना झाल्याचे लक्षात आणून दिले. सामन्याच्या मध्यंतराच्या वेळी समालोचन करत असतांना गावस्कर म्हणाले की, क्षमा करा; पण आता एका दृश्याने माझे मन विचलित झाले. गावस्कर म्हणाले, ‘‘आता मैदानावर काही लोक भारतीय राष्ट्रध्वजाची विटंबना करतांना मी पाहिले. त्यांच्या हातात असलेल्या राष्ट्रध्वजावर एका आस्थापनाचे विज्ञापन करण्यात आले होते. ते अत्यंत चुकीचे आहे. आता ते लोक दिसेनासे झाले आहेत; पण मी आशा करतो की, पोलिसांनी केवळ राष्ट्रध्वजच जप्त करू नये; पण संबंधितांना ‘असे पुन्हा करू नये’, अशी चेतावणीही द्यावी.’’

संपादकीय भूमिका

जागतिक स्तरावरील क्रिकेट सामन्यात अशा प्रकारची राष्ट्रनिष्ठा दाखवणे हे वाखाणण्यासारखेच आहे. याबद्दल गावस्कर यांचे अभिनंदन !