मुंबईतील रेल्‍वेस्‍थानकांवर अत्‍याधुनिक सीसीटीव्‍ही कॅमेरे लावणार !

प्रतीकात्मक छायाचित्र

मुंबई – रेल्‍वे प्रवाशांच्‍या सुरक्षिततेसह, रेल्‍वे स्‍थानकांतील गुन्‍हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने अद्ययावत सीसीटीव्‍ही कार्यान्‍वित करण्‍याचा निर्णय रेल्‍वे मंत्रालयाने घेतला आहे. ‘रेलटेल’च्‍या साहाय्‍यानेने प्रवासी सुरक्षिततेचे आधुनिकीकरण करण्‍यात येणार आहे.  या सुरक्षा प्रकल्‍पासाठी ‘निर्भया निधी’ वापरण्‍यात येणार आहे. मध्‍य रेल्‍वेच्‍या ३६४ रेल्‍वे स्‍थानकांवर चेहरा ओळखणार्‍या ३ सहस्र ६५२ कॅमेर्‍यासह ६ सहस्र १२२ सीसीटीव्‍ही कार्यान्‍वित करण्‍यात येणार आहेत.

मुंबई उपनगरीय रेल्‍वेतील सर्व स्‍थानकांवर चेहरा ओळखणारी यंत्रणा (एफ्.आर्.एस्.) असलेले कॅमेरे बसवण्‍यात येणार आहेत. हे तंत्रज्ञान गुन्‍हेगारांना पकडण्‍यात आणि गर्दीच्‍या नियोजनासाठी साहाय्‍य करणार आहे. मध्‍य रेल्‍वेवर ११७ स्‍थानके आहेत. सीसीटीव्‍ही कॅमेरे डेटाबेसमध्‍ये आरोपीचा चेहरा आणि अन्‍य माहिती संग्रहित केली आहे. अशी व्‍यक्‍ती स्‍थानकात येताच त्‍याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळणार आहे. हे कॅमेरे चेहर्‍याचे विविध भाग जसे की डोळ्‍यातील पडदा किंवा कपाळ ओळखू शकतात.

प्रतीक्षालय, तिकीट खिडकी आणि आरक्षण कार्यालय, स्‍थानक वाहनतळ, मुख्‍य प्रवेशद्वारासह प्रवासी ये-जा असलेल्‍या ठिकाणी, फलाट, पादचारी पूल, त्रिस्‍तरीय सुरक्षा या ठिकाणी हे कॅमेरे असतील. चेहरा ओळखण्‍याची यंत्रणा, व्‍हिडीओ अ‍ॅनालिटिक्‍स, व्‍हिडिओ मॅनेजमेंट सिस्‍टीम, फलाटासाठी बुलेट प्रकारातील कॅमेरे, स्‍थानकाच्‍या आतमध्‍ये डोम प्रकारातील कॅमेरे, संवेदनशील ठिकाणी ‘अल्‍ट्रा एच्.डी. फोर के’ कॅमेरे, वाहनतळांत ‘पॅन-टिल्‍ट-झूम’ हे ३६० अंशात फिरणारे कॅमेरे अशी स्‍थानकांवरील सीसीटीव्‍ही कॅमेरांची वैशिष्‍ट्ये असणार आहेत.