गोव्यात शिवछत्रपती यांच्या पुतळ्यावर ११ ठिकाणी सामूहिक दुग्ध-जलाभिषेक !

फोंडा, २३ ऑगस्ट (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमामुळे आज हिंदूंची मंदिरे, हिंदु धर्म आणि परंपरा टिकून आहेत आणि यामुळे त्यांचा सदैव सन्मान झाला पाहिजे. या पार्श्वभूमीवर ‘छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे’ याविषयी गोमंतक भूमीत जागृती करण्यासाठी गोव्यातील समस्त शिवप्रेमींनी ‘श्री शिवछत्रपती सामूहिक दुग्ध-जलाभिषेक अभियान’ गेले काही दिवस गोवाभर राबवले आहे. या अभियानाच्या अंतर्गत फोंडा येथील शिवप्रेमींनी २३ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी फर्मागुडी येथील किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला दुग्ध-जलाभिषेक घातला. ‘श्री शिवछत्रपती सामूहिक दुग्ध-जलाभिषेक अभियान’ अंतर्गत गोव्यात करासवाडा-म्हापसा, डिचोली, कोरगाव, शिवोली, म्हापसा, कळंगुट, बेतुल, आमोणे, काणकोण आदी एकूण ११ ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अथवा पुतळा यांच्यावर दुग्ध-जलाभिषेक करण्यात आला.

।। हिंदूंचे दैवत शिवछत्रपतींना, श्री सप्तकोटेश्र्वर ते फर्मागुडी सामूहिक दुग्ध-जलाभिषेक अभियान ।।

(सौजन्य : Unique Goa अदभुत गोवा)

चिखली येथील पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर गोव्यात जनक्षोभ उसळला होता. पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांच्या विरोधात अनेक ठिकाणी तक्रारी प्रविष्ट झाल्यावर त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला. यानंतर करासवाडा, म्हापसा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. या वेळी संतप्त शिवप्रेमींनी विटंबना झालेल्या ठिकाणी नवीन पुतळ्याची स्थापना करून संपूर्ण गोवाभर ‘श्री शिवछत्रपती सामूहिक दुग्ध-जलाभिषेक अभियान’ राबवण्याचा संकल्प केला.

काणकोण

येथील सोहळ्यात श्री मल्लिकार्जुन देवस्थानचे अध्यक्ष श्री. विठोबा देसाई, श्री मारुति मंदिराचे अध्यक्ष श्री. प्रकाश फळ देसाई, काणकोणचे नगराध्यक्ष श्री. रमाकांत नाईक गावकर, नगरसेवक सर्वश्री हेमंतकुमार नाईक गावकर, शुभम् कोमरपंत, माजी नगरसेवक किशोर शेट देसाई, श्रीस्थळचे माजी सरपंच प्रशांत माली देसाई आणि शिवस्मारक समितीचे पदाधिकारी अन् शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी शिवस्मारक समिती काणकोणचे श्री. सम्राट भगत म्हणाले, ‘‘आमचे श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी नव्हे, तर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे महान दैवत आहे, हे समस्त जनांना दाखवून देण्यासाठी हा सोहळा आयोजित केलेला आहे. महाराजांनी आम्हाला सर्वांशी जवळीक साधायला शिकवले. त्यांची शिकवण जोपासली, तरच या भूमीत सामाजिक एकोपा नांदेल अन् आम्ही सर्व पंथीय येथे  गुण्यागोविंदाने राहू शकू.’’

आमोणे

छत्रपती शिवरायांचे अतुलनीय शौर्य, पराक्रम, राजनीती, कूटनीती, संघटन कौशल्य याविषयी शालेय स्तरावर जाणीव करून देणे आवश्यक आहे, असे आवाहन बजरंग दल डिचोलीचे श्री. सुबोध मोने यांनी केले. १९ ऑगस्टला आमोणे तारीर येथील छत्रपती शिवाजी महाराज दुग्ध जलाभिषेक सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण सर्वांनीच आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे विचार आमोणे गावचे सरपंच श्री. कृष्णा गावस यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या नात्याने व्यक्त केले. सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विधीवत् पूजन करण्यात आले.