आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे यांना मानसपूजा करतांना आलेल्‍या विविध अनुभूती

[WPI_DISPLAY_SHARE_ICONS]

‘सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा (पू. अण्‍णा) यांनी सांगितल्‍याप्रमाणे मी नियमित मानसपूजेला आरंभ केल्‍यावर मला आलेल्‍या अनुभूती सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि पू. रमानंदअण्‍णा यांच्‍या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण करते.

पू. रमानंद गौडा

१. मानसपूजा करतांना पू. रमानंदअण्‍णा यांचा सूक्ष्मातून आवाज ऐकू येणे आणि त्‍याच वेळी मानसपूजाही चालू रहाणे

एक दिवस मी मानसपूजा चालू केली. त्‍या वेळी मला सूक्ष्मातून पू. रमानंदअण्‍णा यांचा आवाज ऐकू आला. पू. अण्‍णा कन्‍नड आणि हिंदी भाषेमध्‍ये बोलत होते. ‘ते प्रार्थना सांगत होते आणि त्‍याच वेळी माझी मानसपूजाही होत होती’, असे मी अनुभवले.

२. मानसपूजा चालू असतांना परात्‍पर गुरु डॉक्‍टर यांच्‍या मुखातून सूक्ष्मातून गुरुपादुकांची महती ऐकू येणे

सौ. मधुवंती पिंगळे

२ अ. गुरुदेवांना ‘त्‍यांच्‍या कोणत्‍या रूपाची पूजा करू ?’, असे विचारल्‍यावर त्‍यांनी त्‍यांच्‍या निर्गुण तत्त्वाची, म्‍हणजे गुरुपादुकांची पूजा करण्‍यास सांगणे अणि त्‍यानंतर हृदयमंदिरात गुरुपादुकांची स्‍थापना होत असल्‍याचे जाणवणे : एक दिवस मी मानसपूजा करत असतांना गुुरुदेवांना सूक्ष्मातून विचारले, ‘गुरुदेव, आज मी कृष्‍ण, राम आणि विष्‍णु यांपैकी आपल्‍या कोणत्‍या रूपाची पूजा करू ?’ त्‍या वेळी गुरुदेवांनी मला सूक्ष्मातून सांगितले, ‘मी निर्गुण निराकार आहे. आज तू माझ्‍या निर्गुण तत्त्वाची, म्‍हणजे गुरुपादुकांची पूजा कर.’ त्‍यानंतर ‘माझ्‍या हृदयमंदिरात गुरुपादुकांची स्‍थापना होत आहे’, असे मला जाणवले.

२ आ. आश्रम आणि सेवाकेंद्रे यांमध्‍ये गुरुपादुकांची स्‍थापना झालेली असल्‍याने त्‍या क्षेत्रातील सर्व साधकांना गुरुपादुकांच्‍या माध्‍यमातून ऊर्जा मिळत असल्‍याचे गुरुदेवांनी सांगणे : त्‍या वेळी गुरुदेव मला सूक्ष्मातून म्‍हणाले, ‘या गुुरुपादुकांच्‍या माध्‍यमातून माझे निर्गुण तत्त्व कार्यरत आहे. सर्वत्रच्‍या साधकांना या माध्‍यमातून साधना आणि सेवा करण्‍यासाठी ऊर्जा मिळते. जे आश्रम आणि सेवाकेंद्रे यांमध्‍ये गुरुपादुकांची स्‍थापना झालेली आहे, त्‍या क्षेत्रांतील सर्व साधकांना या गुरुपादुकांच्‍या माध्‍यमातून ऊर्जा मिळत आहे.’ त्‍या वेळी एकीकडे माझी मानसपूजा होत होती आणि त्‍याच वेळी गुरुदेवांच्‍या मुखातून गुरुपादुकांची महती ऐकू येत होती. तेव्‍हा मला गुरुदेवांविषयी पुष्‍कळ कृतज्ञता वाटून माझी भावजागृतीही झाली.

३. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघी सभागृहामध्‍ये न येता तेथेच असलेल्‍या पू. अण्‍णा यांच्‍या कक्षाकडे जात असल्‍याचे सूक्ष्मातून दिसणे

एकदा मी सकाळी मानसपूजेसाठी प्रार्थना केल्‍यावर मला सूक्ष्मातून पुढील दृश्‍य दिसले – ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ हे तिघे रथातून मंगळुरू येथेे येत आहेत. सभागृहामध्‍येे तीनही मोक्षगुरूंच्‍या पूजनाची सिद्धता केली आहे. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताई आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजलीताई या दोघी प्रवेशद्वारातून आत आल्‍या आणि त्‍या सभागृहामध्‍ये न येता तेथेच असलेल्‍या पू. अण्‍णा यांच्‍या कक्षाकडे जात आहेत.’ ‘पू. अण्‍णा यांचा कक्ष म्‍हणजे नेहमीच गुरुकार्य आणि साधकांची साधना यांच्‍यासाठीचा ऊर्जास्रोत आहे’, असे मला जाणवते.

४. ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति सौ. बिंदाताई आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजलीकाकू यांना साष्‍टांग नमस्‍कार करूया’, असे मनात येताच तीनही मोक्षगुरूंचे चरण एकरूप होऊन त्‍या ठिकाणी शिवपिंडी दिसणे 

काही वेळाने श्रीसत्‌शक्‍ति सौ. बिंदाताई आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजलीताई सभागृहामध्‍ये येऊन आसनस्‍थ झाल्‍या. प्रथम मी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची मानसपूजा करण्‍यास आरंभ केला. त्‍या वेळी त्‍यांच्‍या चरणांच्‍या ठिकाणी मला शिवपिंडी दिसू लागली आणि त्‍या शिवपिंडीवर अभिषेक होऊ लागला. त्‍यानंतर श्रीसत्‌शक्‍ति सौ. बिंदाताई यांच्‍या चरणांची पूजा करत असतांना त्‍या ठिकाणी मला अकस्‍मात् कोल्‍हापूरच्‍या अंबाबाईच्‍या चरणांचे दर्शन झाले. किरणोत्‍सवाच्‍या वेळी सूर्यकिरणांनी महालक्ष्मीच्‍या चरणांना स्‍पर्श केल्‍यावर तिचे चरण जसे प्रकाशमान दिसू लागतात, तसे त्‍यांचे चरण मला प्रकाशमान दिसू लागले. त्‍यानंतर मी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजलीताई यांच्‍या चरणांची पूजा केली. तेव्‍हा ‘तीनही मोक्षगुरूंना साष्‍टांग नमस्‍कार करूया’, असे माझ्‍या मनात आले आणि ‘सर्वांत आधी कुणाला नमस्‍कार करूया ?’, असा विचार मनात येताच तीनही मोक्षगुरूंचे चरण एकरूप झाले आणि मला पुन्‍हा त्‍या ठिकाणी शिवपिंडीचे दर्शन झाले. मी त्‍या शिवपिंडीला भावपूर्ण साष्‍टांंग नमस्‍कार केला. गुरुदेवांच्‍या निर्गुण निराकार रूपाच्‍या दर्शनाने माझ्‍या मनात कृतज्ञताभाव जागृत होऊन माझी भावजागृती झाली.

‘गुरुदेव, माझी काहीच पात्रता नसतांनाही आपण या अज्ञानी जिवाला आपल्‍या अस्‍तित्‍वाची अनुभूती दिली, त्‍याबद्दल आपल्‍या चरणी मी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे, मंगळुरू कर्नाटक. (१५.१२.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
[WPI_DISPLAY_SHARE_ICONS][RELATED_ARTICLES]