विधान परिेषदेतून…
मुंबई, २८ जुलै (वार्ता.) – वर्ष २०१९ च्या पावसाळ्यात जुलै आणि ऑगस्ट मासांत कृष्णा खोर्यात अती पर्जन्यमानामुळे पूर परिस्थिती उद्भवली होती. सांगली आणि कोल्हापूर जिल्हे मोठ्या प्रमाणात बाधित झाले. या भागातील पूर नियंत्रणासाठी शासनाने सुचवलेल्या उपाययोजना कामांसाठी जागतिक बँक अर्थसाह्य करणार आहे. जागतिक बँकेच्या वतीने सिद्ध करण्यात आलेला प्राथमिक प्रकल्प अहवाल आणि उपाययोजना कामांचा प्रस्ताव केंद्रीय आर्थिक व्यवहार विभाग यांच्या संकेतस्थळावर अपलोड केला आहे, असे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत २७ जुलै या दिवशी सादर केले.
सौजन्य बीबील मराठी
ते म्हणाले की, भिमा आणि कृष्णा खोर्यात वर्ष २०१९ मध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीची कारणे शोधणे आणि भविष्यकालीन उपाययोजनात्मक अहवाल सिद्ध करण्यासाठी शासन जलसंपदा विभागाने २३ ऑगस्ट २०१९ या दिवशी नंदकुमार वडनेरे, निवृत्त प्रधान सचिव, जलसंपदा विभाग यांच्या अध्यक्षतेखाली जलक्षेत्रातील विश्लेषक गांधी तज्ञ समिती स्थापन केली. या कृष्णा पूर अभ्यास समितीने कृष्णा उपखोर्यांचा अभ्यास अहवाल २७ मे २०२० या दिवशी शासनास सादर केलेला आहे.
फडणवीस पुढे म्हणाले की, या समितीने सादर केलेल्या अहवालामध्ये अलमट्टी आणि हिप्परगी धरण हे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पूर परिस्थिती निर्माण होण्यासाठी अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यानंतरही कारणीभूत ठरत नसल्याचे नमूद केले आहे, तसेच अलमट्टी धरणातील पाणीसाठा उंची वाढवल्यानंतरही पाण्याचा फुगवटा कर्नाटक क्षेत्रात रहातो, असे नमूद केले आहे. शासनाच्या जलसंपदा विभागाने १२ ऑक्टोबर २०२१ या दिवशी कृष्णा पूर अभ्यास समितीने (वडनेरे समिती) २७ मे २०२० या दिवशी सादर केलेल्या अहवालातील १८ शिफारसींपैकी १० स्वीकृत ५ अंशतः स्वीकृत एका सुधारणेसह स्वीकृत आणि २ अस्वीकृत केल्या आहेत.