‘चंद्रयान-३’चे यशस्वी प्रक्षेपण !

‘चंद्रयान-३’

श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) – येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून १४ जुलैला दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी ‘चंद्रयान-३’चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. याद्वारे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (‘इस्रो’च्या) शास्त्रज्ञांच्या चंद्रावर भारताचे यान पाठवण्याच्या मोहिमेतील पहिला टप्पा साकार झाला. हे यान आता २३ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास चंद्रावर उतरणार असल्याची माहिती इस्रोच्या शास्त्रज्ञांकडून देण्यात आली. यापूर्वी वर्ष २०१९ मध्ये ‘चंद्रयान-२’ चंद्रावर उतरण्यास अपयशी ठरले होते. त्यानंतर पुन्हा एकदा ‘इस्रो’ने ‘चंद्रयान-३’चे प्रक्षेपण केले आहे.

‘चंद्रयान-३’ अंतराळात झेपावतानाचा क्षण !

‘चंद्रयान-३’ यशस्वी झाल्यास असे करणारा भारत जगातील चौथा देश ठरेल ! – ‘इस्रो’चे प्रमुख

‘चंद्रयान-३’च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर ‘इस्रो’चे प्रमुख एस्. सोमनाथ म्हणाले की, चंद्रयान-३ चा चंद्राच्या दिशेने प्रवास चालू झाला आहे.

या मोहिमेद्वारे भारताला स्वतःची अंतराळ शक्ती जगाला दाखवायची आहे. मोहीम यशस्वी झाल्यास अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर असे करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंदन !

फ्रान्सच्या दौर्‍यावर असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चंद्रयान-३’च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर ट्वीट करून ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.

त्यांनी म्हटले की, ‘चंद्रयान-३’ने भारताच्या अवकाश कार्यक्षेत्रात एक नवा अध्याय लिहिला आहे. प्रत्येक भारतियाची स्वप्ने पूर्ण करणारी ही कामगिरी आहे. ही कामगिरी म्हणजे आपल्या वैज्ञानिकांच्या निष्ठेचीच साक्ष आहे.

‘चंद्रयान-३’ नेमके काय आहे ?

‘चंद्रयान-३’ हे ‘चंद्रयान-२’चा पुढचा टप्पा आहे. हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून तेथील माती आणि वातावरण यांचा अभ्यास करणार आहे. वर्ष २०१९ मध्ये ‘चंद्रयान-२’ चंद्रावर सुलभपणे उतरण्यास अपयशी ठरले होते. त्याचे अवशेष अमेरिकेच्या अंतराळ संस्थेला ३ मासानंतर सापडले होते. आता ‘चंद्रयान-३’ चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या यानातून ‘लँडर’ आणि ‘रोव्हर’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बाहेर येतील. यातील ‘रोव्हर’ हा एक ६ चाकी रोबो आहे, जो लँडरच्या आत असेल, तो यान चंद्रावर उतरल्यावर बाहेर येईल. ते चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणार्‍या किरणांचा अभ्यास करतील. चंद्राचा पृष्ठभाग कसा आहे ?, हे शोधून काढतील, त्याद्वारे माती आणि धूळ यांचा अभ्यास केला जाईल.


केवळ १४ दिवसांचाच असेल चंद्रावरील अभ्यास !

चंद्रावर १४ दिवस रात्र असते आणि १४ दिवस प्रकाश असतो. जेव्हा येथे रात्र असते, तेव्हा तापमान उणे १०० अंश सेल्सिअसच्या खाली जाते. ‘चंद्रयान-३’चे लँडर आणि रोव्हर त्यांच्या ‘सोलर पॅनल’मधून ऊर्जा निर्माण करतील. त्यामुळे ते १४ दिवस वीजनिर्मिती करतील; मात्र नंतरच्या १४ रात्रीच्या वेळी वीजनिर्मिती प्रक्रिया बंद होईल. वीजनिर्मिती न झाल्यास इलेक्ट्रॉनिक उपकरणे कडाक्याच्या थंडीमुळे खराब होतील. त्यामुळे लँडर आणि रोव्हर केवळ पहिले १४ दिवस चंद्रावर राहून अभ्यास करू शकतील.

#ISRO के वैज्ञानिकों ने #TIRUPATI_BALAJI मंदिर में जा कर लिया आशीर्वाद !

इस समय वैज्ञानिक अपने साथ ‘ चंद्रयान-३’ की छोटी प्रतिकृति भी ले गए थे ।

पढें विस्तृत –https://t.co/VAqOMil27E#Sriharikota #IndiaOnMoon#Chandrayaan3 #NASA pic.twitter.com/z15rY7icvx

— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 14, 2023