पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या अमेरिका दौर्‍याचे आर्थिक दृष्‍टीकोनातून महत्त्व !

‘भारत आणि अमेरिका यांच्‍यामधील व्‍यापार हा १७० अब्‍ज डॉलर्स (१३ लाख ९३ सहस्र कोटी रुपयांहून अधिक) एवढ्या प्रचंड प्रमाणावर असून तो अधिक वाढण्‍याची शक्‍यता आहे. अमेरिका आणि चीन यांच्‍यामध्‍ये तणावपूर्ण संबंध असूनही दोघांमधील व्‍यापार हा ७०० अब्‍ज डॉलर्स (५७ लाख ३८४ सहस्र कोटी रुपयांहून अधिक) एवढा आहे. भारत आणि अमेरिका हे लोकशाहीप्रधान अन् मित्र देश आहेत. त्‍यामुळे या दोन्‍ही देशांमधील व्‍यापार हा निश्‍चितपणे ५००  अब्‍ज डॉलर्सपर्यंत (४० लाख ९८ सहस्र कोटी रुपयांहून अधिक) घेऊन जाता येऊ शकतो. हा दृष्‍टीकोन ठेवून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच अमेरिकेतील मुख्‍य उद्योगपतींशी संवाद साधला. त्‍या दृष्‍टीकोनातून भारत हे भविष्‍यातील परकीय गुंतवणुकीसाठी किती उत्तम स्‍थान आहे, हे त्‍यांना पटवून देणे अतिशय महत्त्वाचे होते. हे उद्दिष्‍ट मोदी यांच्‍या अमेरिका भेटीमधून पूर्ण होत असल्‍याचे दिसून येते.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा हा अनेक दृष्‍टीकोनातून ऐतिहासिक असा आहे. या दौर्‍याचे सामरिक, आर्थिक आणि व्‍यापारी दृष्‍टीकोनातूही पुष्‍कळ महत्त्व आहे. एकूणच अमेरिका आणि भारत यांचे जागतिक राजकारणातील महत्त्व पहाता परस्‍परांची मैत्री अन् सहकार्य यांची अतिशय आवश्‍यकता आहे. कोरोना महामारीनंतर अमेरिका आणि युरोपीय देश यांना चीनवरील परावलंबित्‍व न्‍यून करायचे आहे. त्‍याचा पर्याय म्‍हणून ते भारताकडे पहात आहे. त्‍या दृष्‍टीकोनातून पंतप्रधान मोदी यांच्‍या भेटीच्‍या वेळी अशा महत्त्वपूर्ण करारांवर स्‍वाक्षर्‍या झाल्‍या आहेत की, ज्‍या वस्‍तू भारतात बनवल्‍या जातील. उदा. अमेरिकेची ‘जेई’ या ‘जनरल इलेक्‍ट्रिकल’ आस्‍थापनाने भारताच्‍या ‘एच्.ए.एल्.’ (हिंदुस्‍थान एरोनॉटिकल लिमिटेड) समवेत ‘जेट इंजिन’च्‍या निर्मितीच्‍या संदर्भात महत्त्वपूर्ण करार केला आहे. त्‍यामुळे भारतामध्‍ये अनेक नोकर्‍या निर्माण होणार आहेत. भारतात परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येणार आहे. त्‍यामुळे व्‍यापारी दृष्‍टीकोनातूनही याला तेवढेच महत्त्व आहे.’

– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, आंतरराष्‍ट्रीय धोरणांचे विश्‍लेषक (२२.६.२०२३)

(साभार : फेसबुक)