प्रसिद्ध हॉलिवूड गायिका मेरी मिलबेन यांनी गायले भारताचे राष्ट्रगीत !

पंतप्रधान मोदी यांच्या पाया पडत घेतले आशीर्वाद !

वॉशिंग्टन (अमेरिका) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ४ दिवसांचा अमेरिका दौरा समाप्त झाला असून ते आता इजिप्तच्या दौर्‍यावर गेले आहेत. तत्पूर्वी अमेरिकेत पंतप्रधान मोदी यांनी रोनाल्ड रेगन सेंटरमध्ये अनिवासी भारतियांना संबोधित केले. या कार्यक्रमाच्या समारोपाच्या प्रसंगी हॉलिवूडमधली प्रसिद्ध गायिका मेरी मिलबेन यांनी मंचावरून भारतीय राष्ट्रगीत जन-गण-मन गायले.

राष्ट्रगीतानंतर मेरी यांनी मंचावर उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पायाला स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले. ‘पंतप्रधान मोदी यांच्या या कार्यक्रमात सहभागी होणे ही माझ्यासाठी पुष्कळ अभिमानास्पद गोष्ट आहे’, असे मेरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले.

भारतियांनी आत्मविश्‍वास परत मिळवला आहे ! – नरेंद्र मोदी

उपस्थिती भारतियांना संबोधित करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तुम्ही सर्वांनी अमेरिकेत ‘महान भारता’चे एक चित्र बनवले आहे. त्यासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन. मला अमेरिकेत हा जो काही सन्मान मिळत आहे, त्याचे श्रेय तुम्हालाच जाते. तुम्ही इथे केलेल्या श्रमामुळे आणि अमेरिकेच्या विकासात दिलेल्या योगदानामुळे मला हा सन्मान मिळत आहे. अमेरिकेत रहाणार्‍या भारतमातेच्या प्रत्येक लेकराचे मी आभार मानतो. भारत सध्या जी प्रगती करत आहे, त्यामागचे सर्वांत मोठे कारण म्हणजे भारतियांचा आत्मविश्‍वास. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीमुळे आपण हा आत्मविश्‍वास गमावला होता; परंतु नव्या भारताने तो आत्मविश्‍वास परत मिळवला आहे.