गोव्याला भविष्यात ‘योग भूमी’ म्हणून ओळखले जाईल ! – मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तपोलोक योगक्षेत्राचे उद्घाटन

तपोलोक योगक्षेत्रात उभारलेली भगवान परशुरामाची मूर्ती

पणजी – गोवा मनोरंजन संस्थेजवळील पादचारी पूल (आर्च ब्रीज) ते मिरामार समुद्रकिनार्‍यावरील महावीर बालोद्यान या नवीन विकसित पदमार्गाचे २१ जून या दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘गोव्याला भविष्यात ‘योग भूमी’ म्हणून ओळखले जाणार आहे. योगसारख्या प्राचीन ज्ञानशाखेला चालना देण्यासाठी राज्य वचनबद्ध आहे. या तपोलोक योगक्षेत्राचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून अजून बरेच काम शिल्लक आहे.’’

गोवा पायाभूत सुविधा विकास महामंडळाशी सलग्न ‘इमेजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड’कडून मिरामार समुद्रकिनारा ते यूथ हॉस्टेल आणि कला अकादमी या मांडवी नदीच्या किनारपट्टीची डागडुजी आणि संरक्षण प्रकल्पांतर्गत हा पादचारी मार्गाचा प्रकल्प निर्माण करण्यात आला आहे. या मार्गाचा उद्घाटन समारंभ आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुहूर्तावर करण्यात आला. हा योग समर्पित प्रकल्पाचा पहिला टप्पा आहे. या नियोजित तपोलोक योग क्षेत्राची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे असतील. सिंह द्वार, योग सेतू, योग स्तंभ, योग दालन, योग मंडळ, योग पथ, प्राणायाम क्षेत्र, अष्टांग योग क्षेत्र आणि गोमंतभूमी जनक ‘परशुराम’ची मूर्ती ! अष्टांग योग क्षेत्र अजून पूर्ण व्हायचे आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी एकूण  ३३ कोटी ६८ लाख रुपये खर्च येणार आहे.

या कार्यक्रमाला महसूलमंत्री आतानासियो मोन्सेरात, गोवा आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे,  पणजी शहर महानगरपालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.