‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ षष्ठम दिवस – मान्यवरांचे विचार
विद्याधिराज सभागृह, २१ जून (वार्ता.) – महाराष्ट्रातील शौर्याचे प्रतीक असलेल्या गड-दुर्गांवरील आक्रमण म्हणजे लँड जिहादचा प्रकार आहे. गड-दुर्गांमुळे छत्रपती शिवाजी महारांजांचे स्मरण होते. सध्याच्या स्थितीत तेथे मशीद, मजार, कबरी यांमुळे ‘ते मोगलांचे आहेत कि काय ?’, असे वाटते. पुरातत्व विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. हे महाराष्ट्रासह भारतातील सर्वच गड-दुर्गांच्या संदर्भात दिसून येते. ठाण्यातील दुर्गाडीवर दुर्गादेवीच्या मंदिर हे मशीद असल्याचा दावा करणे, रायगडमधील कुलाबा दुर्गावर पुरातत्व कार्यालयाजवळ बांधलेली मजार (मुसलमानाचे थडगे), मुंबईतील शिवडीगड, रायगड, सातार्यातील वंदनगड, जळगाव येथील पारोळा पेशवेकालीन दुर्ग यांवर झालेले इस्लामी अतिक्रमण हे हिंदूंमध्ये रूजलेल्या सेक्युलॅरिझमचा दुष्परिणाम आहे, असे वक्तव्य हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर यांनी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सहाव्या दिवशीच्या सत्रात केले.
ते पुढे म्हणाले की …
१. या विरोधात हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी कार्य केले. प्रतापगडावर अफजलखानाच्या कबरीभोवती उभारलेली मोठी वास्तू हटवण्यासाठी अनेक हिंदु संघटनांनी बराच काळ संघर्ष केला आणि अंतिमतः १० नोव्हेंबर २०२२ म्हणजे शिवप्रतापदिनीच तेथील अवैध काम उद्ध्वस्त करण्यात आले.
२. कोल्हापूरातील विशाळगडावरील बाजीप्रभु देशपाडे आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांची समाधी उपेक्षित, तर रेहमानबाबाचा दर्ग्यासाठी सरकारने ५ लाख रुपये दिले. ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’द्वारे याच्या विरोधात मोहीम चालू केली. हा दर्गा हटणार नाही, तोपर्यंत संघर्ष चालूच रहाणार आहे.
३. गड-दुर्गांवरील इस्लामी अतिक्रमण रोखण्यासाठी मार्च २०२३ मध्ये ‘महाराष्ट्र गड-दुर्ग संवर्धन मोर्चा’ काढून गड-दुर्ग संवर्धन समिती स्थापन करण्याची मागणी केली. त्यावेळी १ सहस्र ५०० शिवप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. या वेळी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उपस्थित राहून बैठकीचे आणि अतिक्रमण हटवण्याचे आश्वासन दिले.
४. गड-दुर्गांच्या रक्षणाची ही लढाई स्वाभिमान आणि इतिहास यांच्या रक्षणाची लढाई आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य, पराक्रम पुढील पिढ्यांना दाखवण्यासाठी गडांचे रक्षण होणे आवश्यक आहे. गड-दुर्गांवरून केवळ ‘हर हर महादेव’च्या घोषणा दुमदुमायला हव्यात आणि तेथे पुन्हा भगवा फडकला पाहिजे. यासाठी आपल्याला संघर्ष चालू ठेवावा लागणार आहे.