‘आदिपुरुष’ चित्रपटातील आक्षेपार्ह संवाद पुढील आठवड्याभरात पालटणार !

संवाद लेखक मनोज मुंतशीर यांची हिंदूंच्या विरोधापुढे माघार !

मनोज मुंतशीर शुक्ला

नवी देहली – ‘आदिपुरुष’ चित्रपटातील आक्षेपार्ह संवादांना देशभरात विरोध होऊ लागल्यानंतर चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर शुक्ला यांनी ट्वीट करत ‘पुढील एक आठवड्यात चित्रपटातील सर्व आक्षेपार्ह संवाद पालटण्यात येतील’, असे म्हटले आहे; मात्र तसे सांगण्यासह त्यांच्यावर होणारी टीका अयोग्य असल्याचाही प्रयत्न त्यांनी केला आहे. यापूर्वी मनोज मुंतशीर यांच्याकडून या संवादांचे समर्थन करण्यात येत होते. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा चित्रपट रामायणावर केवळ आधारित असल्याचे म्हटले होते, तसेच या चित्रपटाची कमाई १४० कोटी रुपये झाल्याचे सांगत लोकांना हा चित्रपट आवडल्याचा दावा केला होता.

१. मनोज मुंतशीर यांनी ट्वीटमध्ये असेही म्हटले आहे की, ३ घंट्यांंच्या चित्रपटात मी भगवान श्रीरामांसाठी ‘जय श्री राम’, ‘शिवोहम’, ‘राम सिया राम’ ही गाणीही लिहिली  आहेत; परंतु त्याकडे कुणी लक्ष दिले नाही. अवघ्या ३ मिनिटांच्या वादग्रस्त संवादामुळे मला ‘सनातनविरोधी’ म्हटले जात आहे.

२. या चित्रपटावर बंदी घालण्यासाठी हिंदु सेनेने देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. यामध्ये चित्रपटातील अनेक दृश्ये, संवाद आणि पात्रे काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

  • वास्तविक आक्षेपार्ह संवाद हटवले जाईपर्यंत या चित्रपटाचे प्रदर्शन रोखणे आवश्यक आहे. आजकाल बहुतांश चित्रपट ८-१५ दिवसांतच जुने होत असल्याने आक्षेपार्ह संवाद आठवड्याभरात काढण्याचे आश्‍वासन देणे, म्हणजे वेळ मारून नेण्यासारखे आहे ! ही हिंदूंच्या डोळ्यांत निवळ धूळफेक आहे !
  • दिग्दर्शकांनी, निर्मात्यांनी हिंदु धर्माच्या श्रद्धास्थानांवर आघात करणारे चित्रपट काढत रहायचे आणि हिंदूंनी त्यास विरोध करत रहायचा, हे कुठवर चालणार ? हे प्रकार रोखण्यासाठी आता १०० कोटी हिंदूंनी त्यांच्या श्रद्धास्थानांच्या होणार्‍या आघातांच्या विरोधात कठोर कायदा करण्यासाठी सरकारला भाग पाडले पाहिजे !