शिमला (हिमाचल प्रदेश) येथील जैन मंदिरात वस्त्रसंहिता लागू !

(वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)

शिमला (हिमाचल प्रदेश) – येथील जैन मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. यानुसार महिला आणि पुरुष यांना तोकडे कपडे घालून मंदिरात प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भातील फलक मंदिराबाहेर लावण्यात आला असून संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी उचलेले हे पाऊल आहे, असे म्हटले आहे.

या संदर्भात मंदिराचे पुजारी संजय जैन यांनी सांगितले की, आपले लोक संस्कृती विसरत चालले आहेत. त्यामुळेच महिला डोक्यावरून पदर घेत नाहीत. तोकडे कपडे घालून मंदिरात जाण्याची समस्या संपूर्ण देशात आहे. जेथे विश्‍वकल्याण आणि शांतता यांसाठी प्रार्थना केली जाते, तेथे मर्यादेचे पालन केले पाहिजे.

संपादकीय भूमिका 

देशभरातील सर्व मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणे आवश्यक आहे. मंदिर समिती, प्रशासन आणि भाविक यांनी यासाठी प्रयत्न करावेत !