वारकर्‍यांच्या बरोबरीने शहरातील विविध संस्था, संघटनांचे सदस्य सहभागी !

पुणेकर चालती लाडक्या दिवे घाटाची वाट !

पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गावरील वारकर्‍यांची परीक्षा पहाणारा टप्पा म्हणजे पुणे ते सासवड ! या आव्हानात्मक मार्गावर वारकर्‍यांच्या बरोबरीने शहरातील विविध संस्था, संघटनांचे सदस्य खांद्यावर भागवत धर्माची पताका घेऊन वारीच्या वाटेवर चालतात. ही संख्या वर्षानुवर्षे वाढत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात येते. पुणे ते सासवड पालखी तळ हे अंतर अनुमाने ३२ कि.मी.चे. याच मार्गात दिवे घाट येतो. साधारणतः ४ कि.मी. हा वळणा-वळणाचा रस्ता. अरबी समुद्र किनार्‍याला समांतर असलेल्या सह्याद्री पर्वत रांगाचा हा भाग ! समुद्र सपाटीपासून अनुमाने १ सहस्र मीटर (३ सहस्र २८० फूट) उंच आहे. ही अवघड वाट वारकर्‍यांच्या सोबत चालणार्‍या पुणेकर भाविकांची संख्या प्रतिवर्षी वाढत आहे. माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात विविध पदांवर कार्य करणार्‍या उत्साही तरुणांचा यात सहभाग असतो.

(सौजन्य :zee २४ तास)

याविषयी निरीक्षण नोंदवतांना ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या पुणे शाखेचे माजी अध्यक्ष आणि कार्यकारी विश्वस्त डॉ. संजय पाटील म्हणाले की, आळंदी ते पुणे आणि पुणे ते सासवड अशा २ टप्प्यांमध्ये वारी करणार्‍यांची संख्या वाढत आहे. त्यात पुण्यातील आधुनिक वैद्यांचाही मोठा सहभाग असतो. पुण्याहून सासवडकडे पालखीच्या समवेत चालतांना ऊर्जेचा अखंड प्रवाह जाणवतो. इतर वेळी एखादा कि.मी.ही चालण्यासाठी पाऊल न टाकणारे अनेक जण सहज ही वारी-वाट चालतात. ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या वतीने गेल्या १३ वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबवण्यात येत आहे.

वारीचे अभ्यासक प्रभाकर देशपांडे यांनी सांगितले की, पर्यावरण दिंडी, जलदिंडी, आयटी दिंडी, शिक्षक दिंडी, उद्योजक दिंडी अशा वेगवेगळ्या दिंड्या उत्साहाने सहभागी होतात. यात वेगवेगळ्या विद्यापिठाचे विद्यार्थीही येतात. कुणी आरोग्य जनजागर करत असतो, तर कुणी प्लास्टिकचे पर्यावरणावरील दुष्परिणाम सांगत असतात. पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्याच्या ओढीने निघालेल्या या वैष्णवांच्या मेळ्याला सहभागी होता आले, हीच मोठी भक्ती असल्याची भावना असते.