सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षकांची भरती व्हावी, यासाठी १६ जूनला धरणे आंदोलन !

खासदार विनायक राऊत (डावीकडून तिसरे) यांची पत्रकार परिषद

सावंतवाडी – १५ जूनपासून शाळा चालू होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची हानी होऊ नये, यासाठी शिक्षकांच्या रिक्त जागांवर जिल्ह्यातील शिक्षणशास्त्र पदविकाधारक (डी.एड्., बी.एड्.) बेरोजगारांची जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून मानधनावर भरती करावी. शिक्षकांच्या रिक्त पदांविषयी १५ जून या दिवशी विद्यार्थ्यांसह गटविकास अधिकार्‍यांच्या दालनासमोर निदर्शने केली जातील, तर १६ जून या दिवशी जिल्हा परिषद कार्यालय आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार राऊत यांनी दिली आहे.

खासदार विनायक राऊत यांची शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांच्यावर टीका

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतील शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांची होत असलेल्या हानीपेक्षा मद्यविषयक धोरणाची अधिक काळजी आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी नाही, तर सिंधुदुर्गासाठी मद्यविषयक धोरणाची मागणी केली, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंत्री केसरकर यांनी, ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात मद्यावरील करातून सवलत मिळावी. त्यामुळे गोवा राज्यातून होणारी मद्याची अवैध वाहतूक आणि विक्री थांबेल’, अशी मागणी केली होती.

या सूत्राला अनुसरून खासदार विनायक राऊत पत्रकारांना म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतील प्राथमिक शाळांतील शिक्षकांचे स्थानांतर करतांना जिल्ह्यात रिक्त होणार्‍या जागा भरण्यासाठी मंत्री केसरकर यांनी निर्णय घेतला नाही. जिल्ह्यात शिक्षकांची एकूण १ सहस्र ९४० पदे रिक्त आहेत. राज्यातील शिक्षकांचा विचार करतांना सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांवर झालेला अन्याय सहन करणार नाही. शैक्षणिकदृष्ट्या या दोन्ही जिल्ह्यांचा चांगला इतिहास असतांना स्थानांतर झालेल्या ४५३ शिक्षकांना सोडले. यामध्ये एकट्या सांगली जिल्ह्यातील १८० शिक्षक आहेत. नोकरभरती करतांना ती ‘कोकण नोकरभरती मंडळा’च्या माध्यमातून करावी आणि यासाठी नवीन मंडळ स्थापन करावे.’’