श्रीविष्णुतत्त्वाची प्रचीती देणारे कलियुगातील दिव्य अवतारी रूप : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘आज वैशाख कृष्ण सप्तमी, म्हणजे साक्षात् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा या भूतलावरील अवतरणदिन ! हा दिवस श्री गुरूंचा जन्मोसव म्हणून प्रत्येक साधक आपल्या अंतर्मनात अत्यंत भक्तीभावाने साजरा करतो. श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा जन्मोत्सव म्हणजे साधकांसाठी ‘अमृताहूनी मधुर’, असे अनुपम अन् दिव्य पर्व असते. श्री गुरूंच्या जन्मोत्सवामुळे साधकांच्या अंतरंगात भावभक्तीची शीतल धारा प्रवाहित होऊन त्यांना आत्मानंद आणि आत्मशांती यांची अनुभूती येते. अशा या दैवी पर्व असलेल्या श्री गुरूंच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांचे माहात्म्य जाणून ते हृदयमंदिरात सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवूया.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

श्रीविष्णु म्हणजे अखिल जगताचा पालनकर्ता ! साक्षात् जगन्नियंता ! सृष्टीकार्यासाठी आदिपुरुष परमात्म्यापासून उत्पन्न झालेल्या त्रिदेवांपैकी एक ! ‘३३ कोटी देवता, ८८ सहस्र ऋषिमुनी, यक्ष, गंधर्व, किन्नर, एवढेच काय त्रिदेवांपैकी ब्रह्मदेव आणि महादेव हेसुद्धा ज्याच्या श्री चरणी शरणागत असतात’, असे हे दिव्य अन् सर्वश्रेष्ठ विष्णुरूप आहे. हाच तो आदिनारायण !

सप्तर्षींनी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना ‘कलियुगातील श्रीविष्णूचा अवतार’ म्हणून गौरवले आहे. त्या अवतारी गुरूंच्या महासागरासमान अफाट असलेल्या चरित्राचे वर्णन करण्याचा प्रयत्न हा त्या महासागरातील एका थेंबाप्रमाणेच आहे, तरी जन्मोत्सवाच्या निमित्ताने लाभलेल्या सुवर्णसंधीचा लाभ घेत श्री गुरुचरणी हे लेखरूपी कृतज्ञतापुष्प समर्पित करत आहे. 

श्रीविष्णूच्या दिव्य स्वरूपाचे वर्णन करतांना ‘श्रीविष्णुसहस्रनामा’मध्ये म्हटले आहे,

शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजम् ।
प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये ।।

अर्थ : ज्याने श्वेत वस्त्र धारण केले आहे, जो सर्व जगताला व्यापणारा विष्णु आहे, ज्याचे रूप चंद्रासमान अत्यंत प्रकाशमान आहे, ज्याच्या चार भुजा आहेत आणि ज्याचे मुखमंडल प्रसन्न, तेजोमय अन् करुणा यांनी भरलेले आहे, समस्त विघ्ने आणि बाधा यांपासून रक्षण होण्यासाठी या दिव्य श्रीविष्णुरूपाचे आम्ही ध्यान करतो.

श्रीविष्णूच्या कलियुगांतर्गत कलियुगातील या श्रीजयंतावताराचे, म्हणजेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्मरण करताच वरील श्लोकाचे वर्णन त्यांच्या संदर्भात तंतोतंत खरे ठरते. या वर्णनाद्वारे श्रीविष्णुस्वरूप गुरूंच्या अवतारत्वाचे आणि त्यांच्यातील विष्णुतत्त्वाचे अवलोकन करूया.

१. ‘श्री गुरूंचे तेजोमय रूप ही त्यांच्या अवतारत्वाची आणि त्यांच्यातील विष्णुतत्त्वाची प्रचीती आहे !

‘श्रीविष्णूचे मूळ आदिनारायण रूप; तसेच श्रीविष्णूची श्रीराम, श्रीकृष्ण आदी रूपे, यांचा वर्ण श्याम आणि नील असल्याचे वर्णन आढळते. कलियुगातील श्रीविष्णूच्या या श्रीजयंतावताराचे रूप त्याहून निराळे, म्हणजे ‘शुक्लाम्बरधरं विष्णुं…’ या श्लोकातील वर्णनाप्रमाणे आहे.  त्यांचा वर्ण गौर आणि चंद्रासारखाच प्रकाशमान आहे. ‘श्री गुरूंच्या अवतारी देहधारी रूपाचे तेज एवढे प्रचंड आहे की, ‘श्री गुरूंना पहाताच त्यांच्या जागी साधकांना केवळ प्रकाशच दिसतो. हीच श्री गुरूंच्या अवतारत्वाची आणि त्यांच्यातील विष्णुतत्त्वाची प्रचीती आहे. यावरून सिद्ध होते, ‘तोच जगन्नियंता श्रीविष्णु या कलियुगात श्रीजयंतावताराच्या रूपात अवतरला आहे’, हे त्रिवार सत्य आहे.’

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे शुभ्र वस्त्रांमधील सहज-साधे रूप पहातांना ‘शुक्लाम्बरधर’ श्रीविष्णूचेच स्मरण होते !

श्रीविष्णूचे वर्णन करतांना ‘शुक्लाम्बरधर’ म्हणजे ‘शुभ्र पांढरे वस्त्र धारण केलेला’, असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचीही नेहमीची वेशभूषा पांढरा पायजमा आणि पांढरी बंडी अथवा सदरा, अशीच आहे. त्यांच्या शुभ्र वस्त्रांमधील या रूपाला पहातांना ‘शुक्लाम्बरधर’ श्रीविष्णूचेच स्मरण होते. साधकांनी आतापर्यंत महर्षींच्या आज्ञेनुसार श्री गुरूंनी धारण केलेल्या विविध अवतारी रूपांचे दर्शन घेतले. श्रीराम, श्रीकृष्ण, श्रीविष्णु आणि श्री सत्यनारायण, या सर्व अवतारी रूपांच्या दर्शनाने साधकांना श्री गुरूंमधील अवतारत्व उलगडले. त्या दर्शनाने साधकांना जेवढे अवतारी तत्त्व लाभले, तेवढेच अवतारी तत्त्व त्यांच्या शुभ्र वस्त्रांमधील सहज-साध्या रूपातूनही लाभते. ‘श्री गुरूंच्या या शुभ्र वस्त्रातील सहज-साध्या रूपातही सर्व देवतातत्त्वे सामावलेली आहेत’, याची अनुभूती साधकांनी घेतली आहे. हे साधे रूपही साधकांना तेवढेच भावते; कारण कलियुगातील श्रीविष्णूचे रूप हे सहजरूप आहे.

३. करुणावत्सल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्मरण करताच साधकांच्या चेहर्‍यावर आपोआपच हास्य उमलते !

भगवान श्रीविष्णु आपल्या वात्सल्याने या जगताचे पालन करत आहे. ‘श्रीविष्णु’ म्हटले की, लगेच मनोहारी अन् करुणावत्सल असे प्रसन्न वदन डोळ्यांपुढे येऊन आपल्या मनाला आनंद होतो. त्याचप्रमाणे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे स्मरण करताच साधकांच्या चेहर्‍यावर आपोआपच हास्य खुलते. श्री गुरूंमध्ये एवढे वात्सल्य आहे की, त्यांना केवळ पाहिल्यानंतरच नव्हे, तर त्यांच्या स्मरणानेही साधकांच्या चेहर्‍यावर हास्य उमलते. आत्मचक्षूंनी पाहिलेले प्रसन्न वदन श्री गुरूंचे ते रूप साधकांच्या मनाला भावते. त्यांचे स्मरण होताच साधकांच्या अंतःकरणातील सर्व भाव प्रगट होतात. गुरूंच्या अपार वात्सल्याचा हाच पुरावा आहे. हेच ते श्रीविष्णुस्वरूप गुरूंचे परम प्रीतीमय प्रसन्न वदन रूप !

श्री गुरूंच्या प्रसन्न मूखकमलाकडे पहाताच अथवा केवळ त्यांचे स्मरण करताच आपल्या मनातील सर्व विचार थांबतात. आपल्या मनातील असंख्य विचारांचे वादळ शमून जाते. जणूकाही त्यांच्या स्मरणानेच सर्व विघ्ने दूर होतात. हे परम मंगलदायक श्री गुरूंच्या केवळ प्रसन्नवदन रूपाचेच माहात्म्य आहे. ‘श्रीविष्णुस्वरूप गुरुमाऊलीचे हे प्रसन्नवदन रूप सदैव आमच्या हृदयमंदिरात विराजमान असू दे,’ अशी त्यांच्या चरणकमली प्रार्थना !

४. श्रीविष्णूच्या चार भुजांमधील आयुधे

श्रीविष्णूचे स्मरण करताच आपल्याला त्याचे चतुर्भुज रूपात दर्शन होते. या ४ भुजांमधील आयुधांच्या कार्याची प्रचीती आता श्रीजयंतावताराच्या माध्यमातूनही येत आहे. या आयुधांचा भावार्थ पुढीलप्रमाणे असल्याचे लक्षात आले.

४ अ. पांचजन्य शंख

पांचजन्य शंख

भगवान श्रीविष्णूच्या चतुर्भुज रूपाकडे पहातांना सर्वप्रथम त्याने वरच्या हातात धारण केलेल्या शंखाचे स्मरण होते. भगवंताचे रूप प्रगट होतांना शंखध्वनी होतो. आधी ध्वनी कानावर पडतो आणि मग भगवंताचे दर्शन होते. ‘ज्याच्या ध्वनीच्या आवाजाने दैत्य पळून जातात’, असा शंखाचा सम्राट ‘पांचजन्य शंख’ श्रीविष्णूने धारण केला आहे.

४ अ १. भगवंताच्या इच्छेने लवकरच हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या रूपाने मंगलमय शंखनाद त्रैलोक्यात दुमदुमणार आहे ! : श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा जन्म केवळ धर्मसंस्थापनेच्या अवतारी कार्यासाठीच झाला आहे. धर्मसंस्थापनेचेच मूर्तीमंत रूप आपण ‘हिंदु राष्ट्रा’च्या रूपात प्रत्यक्ष अनुभवणार आहोत. श्री गुरूंनी हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्याचा शंखनाद केला आहे. या कार्याचा गौरव सर्वत्रचे संत, आध्यात्मिक अधिकारी, ऋषिमुनी आणि देवताही करत आहेत. विविध माध्यमांतून हिंदु राष्ट्र समीप आल्याची प्रचीती मिळत आहे. भगवंताच्या इच्छेने लवकरच हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या रूपाने हा मंगलमय शंखनाद त्रैलोक्यात दुमदुमणार आहे. याविषयी मनात तीळमात्रही संदेह न ठेवता श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांच्या अवतारी कार्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवूया.

४ आ. सुदर्शनचक्र

सुदर्शनचक्र

४ आ १. भगवंताच्या तेजाचा अंश असणारे तेजोमय ‘सुदर्शनचक्र’ विश्ववंद्य आहे ! : भगवान श्रीविष्णूने आपल्या चतुर्भुजांपैकी वरच्या उजव्या हातातील बोटात ‘सुदर्शनचक्र’ धारण केले आहे. काळाला संचलित करण्याची शक्ती भगवंताच्याच हातात आहे. सर्व गोष्टींवर भगवंताचे नियंत्रण आहे. हे चक्र जोपर्यंत भगवंताच्या हातात आहे, तोपर्यंत ‘सु-दर्शन’; म्हणजे हितकारी आणि कल्याणकारी दर्शन असते. एकदा ते त्याच्या हातातून सुटले की, विश्वासाठी विनाशकारी सिद्ध होते. भगवंताच्याच तेजाचा अंश असणारे हे तेजोमय ‘सुदर्शनचक्र’ विश्ववंद्य आहे.

४ आ २. भक्तांवर अखंड कृपा आणि चैतन्य यांचा वर्षाव करण्यासाठी हे सुदर्शनचक्र आता कलियुगातही कार्यरत आहे ! : श्रीविष्णूच्या हातातील चक्र हे असुरांसाठी मारक आणि भक्तांसाठी तारक आहे. हेच चक्र सतत भक्त अंबरिषासह राहून त्याचे रक्षण करत असे. त्याचप्रमाणे हे चक्र या कलियुगातही भगवंतावर दृढ निष्ठा आणि भक्ती असलेल्या समस्त श्रीविष्णुभक्तांचे रक्षण करणारच आहे. भक्तांवर अखंड कृपा आणि चैतन्य यांचा वर्षाव करण्यासाठीच हे सुदर्शनचक्र आताही कार्यरत आहे.

भगवंताचे काळावर नियंत्रण आहे. त्याचप्रमाणे ‘हिंदु राष्ट्र कधी आणायचे ?’, हेही भगवंतस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्याच हातात आहे. ‘ज्या क्षणी हिंदु राष्ट्रासाठी पूरक काळ बनावा’, अशी त्यांची इच्छा होईल, त्याच क्षणी भूतलावर हिंदु राष्ट्र स्थापन होईल. तोपर्यंत आपण सर्वांनी या सूक्ष्म सुदर्शनचक्रातून प्रक्षेपित होणारी गुरुकृपा आणि चैतन्य यांचा अखंड वर्षाव अनुभवूया.

४ इ. गदा

गदा

४ इ १. प्रत्येक भगवद्भक्त जिवाच्या समवेत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे गदारूपी कवच अखंडपणे कार्यरत आहे ! : भगवंताच्या हातात सदैव असणारे आयुध म्हणजे गदा. या गदेचे नाव ‘कौमोदकी’. मोद म्हणजे आनंद. ‘संपूर्ण जगाला राक्षसांच्या त्रासापासून वाचवून आनंद देणारी’, अशी ही श्रीविष्णूची ‘कौमोदकी गदा’ आहे. या अत्यंत तेजस्वी कौमोदकी गदेला भगवान श्रीविष्णूने आपल्या करकमलाच्या अग्रभागाने, म्हणजे बोटांनी अत्यंत प्रेमाने धारण केले आहे.

श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी शिकवलेल्या साधनेमुळे अखिल मानवजातीच्या सर्व दुःखांचे हरण होते आणि तिला आनंद मिळतो. श्री गुरूंनी शिकवलेल्या साधनेचे अभेद्य कवच वाईट शक्तींच्या त्रासांपासून रक्षण करणारे आहे. हे साधनेचे अभेद्य कवच साधकांसाठी वाईट शक्तींची आक्रमणे परतवून लावणार्‍या गदेप्रमाणेच कार्य करते. प्रत्येक भगवद्भक्त जिवाच्या समवेत श्रीविष्णुस्वरूप गुरूंचे हे गदारूपी कवच अखंडपणे कार्यरत आहे. त्याची आपण अनुभूती घेऊया.

४ ई. कमळ

कमळ

४ ई १. श्रीविष्णूच्या हातातील कमळाप्रमाणेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सर्व साधकांना करकमलामध्ये सांभाळले आहे ! : श्रीविष्णूने चतुर्थ हातात कमलपुष्प धरलेले आहे. त्याने ते इतके अलगदपणे धरलेले आहे की, त्याकडे पाहून आपल्या अंतःकरणातील भाव जागृत होतो.

श्रीविष्णूने आपल्या हातात धरलेल्या या कमळाप्रमाणेच श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सर्व साधकांना आपल्या करकमलामध्ये अगदी अलगदपणे धरलेले आहे. केवळ साधकांनाच नव्हे, तर जगतातील सर्व भगवद्परायण जिवांनाही त्यांनी असेच सांभाळून ठेवले आहे.

आतापर्यंत साधकांनी अशा अनेक अनुभूती घेतल्या आहेत की, त्यांना मोठमोठ्या कठीण प्रसंगांमधूनही आपोआप आणि सहजतेने मार्ग मिळाला आहे. त्यांचे भयंकर अपघातांमधून रक्षण झाले. साधकांचे प्रारब्ध खडतर असूनही त्याची त्यांना झळ लागली नाही. हे सर्व सहज अथवा योगायोगाने झाले नसून ही सर्व विष्णुस्वरूप गुरुदेवांची अपार कृपा आहे. विष्णुस्वरूप श्री गुरूंनी साधकांचे रक्षण करण्यासाठी त्यांना आपल्या करकमलांमध्ये सांभाळून ठेवले. ‘येणार्‍या भीषण आपत्काळातही श्री गुरु अशा प्रकारे सद्भक्तांचे रक्षण करतील’, यात कोणतीच शंका नाही. त्यामुळे साधकांना ‘आपत्काळ कधी आला आणि कधी गेला ?’, हेही कळणार नाही.

५. भगवान श्रीविष्णूची सहस्र नामे आहेत आणि अनंत कार्ये आहेत. त्याचप्रमाणे श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचीही अनंत कार्ये आहेत. त्यांचे वर्णन करणे अशक्य आहे.

‘श्रीविष्णुसहस्रनामा’तील वरील एकाच श्लोकाचे थोडेसे विश्लेषण करतांना जर एवढे सारे पैलू मिळाले असतील, तर ‘श्रीविष्णूच्या अनादि अनंत स्वरूपाला जाणणे आणि त्याचे वर्णन करणे’, ही अशक्यप्राय गोष्ट आहे. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांमध्ये श्रीविष्णूचे तत्त्व ओतप्रोत सामावले आहे’, याचीच ही प्रचीती होय. अशा सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या निमित्त त्यांच्या विष्णुमय अनादि अनंत स्वरूपाला कोटीशः वंदन !

६. प्रार्थना

‘अखिल विश्वाचे कल्याण आणि धर्मसंस्थापना यांसाठी या भूतलावर अवतरलेल्या हे नारायणस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवा, ‘आपले श्रीविष्णुरूपातील प्रसन्नवदन दिव्य रूप साधकांच्या चित्ती ठसू दे. ‘आपणच भक्तवत्सल, प्रीतीवत्सल अन् कृपावत्सल नारायण आहात’, यांवर सर्व साधकांची दृढ निष्ठा राहू दे. आपल्यात ओतप्रोत सामावलेल्या श्रीविष्णूच्या अवतारी तत्त्वाची प्रचीती घेत सर्व साधकांची श्रद्धा वृद्धींगत होऊ दे’, अशी आपल्या परम मोक्षदायी श्री चरणकमली प्रार्थना आहे.’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी (९.५.२०२३)