दोन पुरुष आणि एक स्‍त्री यांचे एकत्र छायाचित्र काढतांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्‍याप्रमाणे स्‍त्रीने दोन पुरुषांच्‍या बाजूला उभे न रहाता मध्‍यभागी उभे रहाणे योग्‍य

हिंदु धर्माने जीवनातील प्रत्‍येक गोष्‍ट अध्‍यात्‍मशास्‍त्रानुसार करायला शिकवली असणे आणि स्‍त्रीने पुरुषाच्‍या डावीकडे रहायला हवे कि उजवीकडे, याचाही विचार त्‍याने केला असणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

‘अध्‍यात्‍मशास्‍त्रानुसार स्‍त्री ही शक्‍तीस्‍वरूप आणि पुरुष हा शिवस्‍वरूप आहे. पती-पत्नीची जोडी असल्‍यास हिंदु धर्माने पत्नीने पतीच्‍या डावीकडे रहायचे कि उजवीकडे याचा नियम त्‍यांच्‍या कार्यानुसार पुढीलप्रमाणे घालून दिला आहे.

१. कोणतेही कार्य करायचे असल्‍यास

अशा वेळी ‘पत्नी पतीच्‍या उजवीकडे असावी’, असे सांगितले आहे. याचे कारण म्‍हणजे स्‍त्री ही शक्‍तीस्‍वरूप असल्‍याने ती पतीच्‍या उजवीकडे असल्‍यास पतीच्‍या कार्याला बळ पुरवते. पत्नी उजवीकडे असल्‍याने ती पतीच्‍या उजव्‍या बाजूला कार्यरत असणार्‍या सूर्यनाडीला शक्‍ती पुरवून साहाय्‍य करते. यासाठीच पती एखादा धार्मिक विधी करत असतांना हिंदु धर्माने पत्नीला त्‍याच्‍या उजव्‍या हाताला आपला उजवा हात लावण्‍यास किंवा दर्भाने स्‍पर्श करण्‍यास सांगितले आहे.

२. कोणतेही कार्य करत नसल्‍यास

अशा वेळी ‘पत्नी पतीच्‍या डावीकडे असावी’, असे सांगितले आहे. याचे कारण म्‍हणजे कोणतेही कार्य करायचे नसल्‍याने पत्नीमधील शक्‍तीची आवश्‍यकता नसते. त्‍यामुळे तिच्‍यातील शक्‍ती अकार्यरत स्‍थितीत ठेवण्‍यासाठी तिला पतीच्‍या डावीकडे रहाण्‍यास सांगितले आहे. व्‍यक्‍तीची डावी बाजू ही चंद्रनाडीशी संबंधित आहे. अकार्यरतता आणि शीतलता हे तिचे गुण आहेत.

संत, थोर व्‍यक्‍ती, वयाने मोठ्या असलेल्‍या व्‍यक्‍ती यांचा आशीर्वाद घेतांना, देवळात दर्शन घेतांना पत्नीला पतीच्‍या डावीकडे रहाण्‍यास सांगितले आहे.

३. स्‍त्री आणि पुरुष यांचे छायाचित्र काढतांनाही ‘स्‍त्रीने कुठे उभे रहायचे ?’, याचा स्‍पंदनांच्‍या दृष्‍टीने विचार करणे आवश्‍यक !

छायाचित्र काढतांनाही पत्नी पतीच्‍या डावीकडे हवी. वर दिलेल्‍या प्रसंगामध्‍ये छायाचित्र काढतांना दोन पुरुषांच्‍या नंतर एखाद्या स्‍त्रीला उभे केल्‍यास ते आध्‍यात्मिकदृष्‍ट्या योग्‍य जाणवले नाही; कारण तेव्‍हा स्‍त्री कार्यरत स्‍थितीत रहाते. याउलट छायाचित्र काढतांना दोन पुरुषांच्‍या मध्‍यभागी स्‍त्रीला उभे केल्‍यास ते योग्‍य वाटते; कारण तेव्‍हा दोन पुरुषांतील शिवतत्त्व स्‍त्रीमधील शक्‍तीला नियंत्रित करत असते. त्‍यामुळे तसे छायाचित्र काढल्‍यावर ते आध्‍यात्मिकदृष्‍ट्या योग्‍य जाणवले. एक स्‍त्री आणि एक पुरुष यांचे छायाचित्र काढायचे असल्‍यास स्‍त्री पुरुषाच्‍या डावीकडे हवी.

हिंदु धर्माने ‘जीवनातील प्रत्‍येक बारिकसारीक गोष्‍ट करायची कशी ?’, याचा अध्‍यात्‍मशास्‍त्रानुसार विचार केला आहे आणि त्‍याचे शास्‍त्र सांगितले आहे. त्‍यासाठी आचारधर्म सांगितला आहे. यावरून हिंदु धर्म किती श्रेष्‍ठ आहे, हे लक्षात येते.’

१. दोन साधकांच्‍या बाजूला साधिकेला उभे केल्‍यावर साधकाचे मन अस्‍थिर होणे आणि साधिकेला २ साधकांच्‍या मध्‍ये उभे केल्‍यावर साधकाच्‍या मनाला स्‍थिरता जाणवणे

श्री. राम होनप

‘१.११.२०१८ या दिवशी तीन ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधकांची आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के झाल्‍याचे घोषित करण्‍यात आले. या कार्यक्रमानंतर छायाचित्र काढण्‍यासाठी श्री. निषाद देशमुख, मी आणि माझ्‍या बाजूला कु. मधुरा भोसले या क्रमाने उभे होतो. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी हा क्रम पालटून प्रथम श्री. निषाद, मध्‍यभागी कु. मधुरा आणि नंतर मला उभे रहाण्‍यास सांगितले.

यापूर्वीच्‍या क्रमामध्‍ये निषाद, मी आणि माझ्‍या बाजूला मधुरा उभी होती. त्‍या वेळी माझ्‍या मनाला अस्‍वस्‍थता जाणवून त्रासदायक वाटत होते. जेव्‍हा परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी सांगितलेल्‍या क्रमानुसार, म्‍हणजे निषाद, मधुरा आणि मी असे उभे केले, तेव्‍हा माझे मन आपोआप शांत आणि स्‍थिर झाले होते. असे घडण्‍यामागील अध्‍यात्‍मशास्‍त्र पुढीलप्रमाणे आहे.

२. दोन पुरुषांच्‍या मध्‍यभागी स्‍त्री उभी रहाणे, हे आध्‍यात्मिकदृष्‍ट्या अधिक पूरक असणे

स्‍त्री ही शक्‍तीशी संबंधित असून पुरुष हा पुरुष तत्त्वाशी संबंधित आहे. स्‍त्री शक्‍ती ही पुरुषाच्‍या कार्याला साथ देते आणि पुरुषातील ईश्‍वरी तत्त्व स्‍त्री शक्‍तीला नियंत्रित करत असते, म्‍हणजे दोन्‍ही एकमेकांना पूरक असतात. जेव्‍हा काही कारणास्‍तव दोन पुरुषांच्‍या मध्‍यभागी स्‍त्री उभी रहाते, त्‍या वेळी ही पूरकता दोन पुरुषांच्‍या बाजूला स्‍त्री उभी रहाण्‍याच्‍या तुलनेत अधिक असते.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्‍त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.११.२०१८)

सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.